सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने Watch Party नावाचं एक नवं फिचर आणलं आहे. सर्वप्रथम गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने हे फिचर आणलं होतं पण काही ठरावीक युजर्सनाच याचा वापर करता येत होता. मात्र, आता हे फिचर सर्व फेसबुक ग्रुप्समध्ये वापरता येईल अशी घोषणा फेसबुकने केली आहे.

या फिचरद्वारे फेसबुक युजर्स रिअल टाइममध्ये एकत्र व्हिडीओ पाहू शकतात. एकदा Watch Party सुरू झाल्यानंतर युजर्स एकत्र लाइव्ह अथवा रेकॉर्डेड व्हिडीओ पाहू शकतील, त्यासोबतच व्हिडीओ पाहताना युजर्स एकमेकांशी संवादही(कमेंट अथवा रिएक्ट) साधू शकतील असं फेसबुकने म्हटलं आहे. एका ब्लॉगपोस्टमध्ये फेसबुकने याबाबत माहिती दिली आहे. या नव्या फिचरमुळे व्हिडीओ पाहण्याचा आनंद द्विगुणीत होईल आणि हा मजेदार अनुभव असेल अशी आशा फेसबुकने व्यक्त केली आहे. यासाठी ज्या ग्रुपसोबत हा व्हिडीओ पाहायचा असेल त्या ग्रुपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अॅड व्हिडीओ नावाचा एक नवा पर्याय दिसेल. ग्रुपव्यतिरिक्त इतर फ्रेंड्ससोबतही Watch Party फिचर वापरता यावं यासाठी चाचणी सुरू आहे, येत्या काही दिवसांमध्ये पेजद्वारे यावर काही तोडगा काढता येतो का याचेदेखील प्रयत्न सुरू असल्याचं फेसबुकने सांगितलं.

फेसबुकचं हे फिचर म्हणजे व्हिडीओ प्रमोट करण्यासाठीचं आणखी एक पाऊल असून या फिचरद्वारे फेसबुक व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म यु ट्यूबला टक्कर देण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं जात आहे.