28 September 2020

News Flash

ई-सिगारेट म्हणजे नेमके काय? हे आहेत धोके

मळमळणे, पोटात दुखणे, डोळ्याला जळजळ होणे असे धोके असतात, तर अतिप्रमाणात घेतल्यानंतर रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, काही जणांना आकडी येण्यासारखेही त्रास होण्याची शक्यता.

‘सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ई-सिगारेटचा वापर करा,’ असा अपप्रचार अनेकदा केला जातो. मात्र ई-सिगारेटही आरोग्यासाठी हानिकारकच आहे. केंद्र सरकारने नुकताच ई-सिगारेटचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात घोषणा केली. ई-सिगारेट म्हणजे काय, तिची लोकप्रियता कोणत्या मुद्दय़ावर वाढली, या सिगारेटबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांचे आक्षेप काय आहेत, याबद्दल थोडेसे जाणून घेऊ या.

ई-सिगारेट म्हणजे काय ?

जिचा सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. फरक असा, की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.

ई -धूम्रपान म्हणजे?
द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.

आणखी वाचा : ई-सिगारेटवर देशभरात बंदी, एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद

ई धूम्रपानाचे शरीरावरील परिणाम
निकोटिनयुक्त विद्युत उपकरणांमध्ये निकोटिनपासून वाफ निघत असल्याने याला व्हेपिंग म्हटले जाते. ई सिगारेटमध्ये ई ज्यूस असून यात प्रोपेलीन ग्लायकॉल, व्हेजिटेबल ग्लिसरीन आणि निकोटिन यांचे मिश्रण असते. निकोटिन कितीही प्रमाणात शरीरात घेतले तरी त्याचे दुष्परिणाम नक्कीच आहेत. कमी प्रमाणात घेतले तरी मळमळणे, पोटात दुखणे, डोळ्याला जळजळ होणे असे धोके असतात, तर अतिप्रमाणात घेतल्यानंतर रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, काही जणांना आकडी येण्यासारखेही त्रास होण्याची शक्यता असते. ई सिगारेट आणि सिगारेटचे प्रत्यक्ष माणसांवर केलेल्या अभ्यासांची संख्या मोजकीच असली तरी प्राणी किंवा अन्य घटकांवर केलेल्या अभ्यासातून ई सिगारेटमधील ई ज्यूसमुळे श्वसनयंत्रणा पोखरत जाते. भविष्यात सीओपीडी, ब्रॉन्कायटिस यांसारखे श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता असते. ई सिगारेटचे फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर गंभीर परिणाम होतात, तसेच यामुळे डीएनएसुद्धा बाधित होतात. श्वसननलिकेवरील आवरणावर परिणाम होऊन विविध घातक घटकांपासून संरक्षण करण्याची क्षमता कमी होते. अशा रुग्णांमध्ये न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांचे कार्य बिघडते. तसेच निकोटिनसह ई सिगारेटमध्ये असलेल्या अन्य घटकांमुळे कर्करोग होण्याचीही शक्यता असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 1:13 pm

Web Title: what is in an e cigarette e cigarettes how they work benefits and risks nck 90
Next Stories
1 Xiaomi Mi Band 4 : वीस दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह दर्जेदार फीचर्स, किंमत…
2 iphone 11 च्या प्री-बुकिंगला कधीपासून होणार सुरूवात?
3 बजाजच्या ‘पावरपुल बाइक’च्या किंमतीत बदल, ही आहे नवी किंमत
Just Now!
X