व्हॉट्सअॅप हे आता आपल्यापैकी अनेकांच्या जगण्यातील एक अविभाज्य घटक झाला आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री ते मिटेपर्यंत आपली नजर असंख्य वेळा मोबाईल आणि त्यातही व्हॉटसअॅपवर असते. सोशल मिडियाचे हे माध्यम सगळ्या सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचे दिसते. दिवसागणिक कंपनीनेही आपल्या फिचर्समध्ये अनेक बदल केले आहेत. युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यासाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. यामध्ये आता आणखी एक भर पडली असून याद्वारे आपण व्हॉट्सअॅपद्वारे कलेक्ट करत असलेल्या डेटाबाबत माहीती दिली जाणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपने आपले एक डेटा पोर्टेबिलीटी टूल विकसित केले आहे. त्याचे नाव रिक्वेस्ट अकाऊंट इन्फो असे ठेवण्यात आले असून युजर आपल्या पूर्ण डेटाची कॉपी डाऊनलोड करु शकणार आहे. यामध्ये अकाऊंटची माहिती, सेटींग्ज, कॉन्टॅक्ट, प्रोफाईल फोटो आणि वेगवेगळ्या ग्रुपची माहिती मिळू शकेल. हे फिचर सध्या अँड्रॉईडवरील व्हॉट्सअॅपच्या बीटा v2.18.128 व्हर्जनवर उपलब्ध होईल. पुढच्या टप्प्यात हे फिचर अपडेट होईल आणि सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होईल.

यामध्ये व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेजेस डाऊनलोड करता येणार नाहीत. कारण आता व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना चॅट हिस्ट्री ई-मेलवर एक्सपोर्ट करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देते. व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकच्या एका नियमासाठी हे करण्यात आले आहे. फेसबुकवर आता युरोपियन डेटा प्रायव्हसी लॉमधील जनरल डेटा रेग्युलेशनचे पालन करण्याचा दबाव आहे. याअंतर्गत सोशल मिडियाच्या युजर्ससाठी डेटा पोर्टीबिलीटी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. तसेच युर्जसच्या मागणीनुसार त्यांचा डेटा डिलीट करता येईल. हा कायदा २५ मेपासून लागू होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.