लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून आपल्या युजर्सना चॅटिंगचा दर्जेदार अनुभव देण्यासाठी नवनवीन फीचर्स लाँच केले जातात. आता कंपनी लवकरच अजून एक नवीन फीचर आणायच्या तयारीत आहे. यामुळे एखादा मेसेज शोधणं सोपं होणार आहे. ‘सर्च बाय डेट’ (Search By Date) या नावाचं फीचर कंपनी लवकरच आणण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज सर्च करण्याचा पर्याय आधीपासून उपलब्ध आहे. पण, त्यात सर्च ऑप्शनमध्ये जाऊन काही शब्द लिहावे लागतात. ज्या शब्दांचा मेसेजमध्ये वापर करण्यात आला आहे, त्यांचा वापर करुन मेसेज सर्च करावे लागतात. पण आता लवकरच तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत.


‘सर्च बाय डेट’ या फीचरद्वारे युजर्सना तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत. याबाबतची माहिती WABetaInfoच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. मात्र, अद्याप व्हॉट्सअ‍ॅपकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या फीचरवर कंपनीकडून टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग झाल्यानंतर हे फीचर सर्वप्रथम आयफोन युजर्ससाठी उपलब्ध केलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे फीचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध केलं जाईल, असं सांगितलं जात आहे. हे फीचर म्हणजे एक कॅलेंडरचा आयकॉन असेल. यावर टॅप करुन युजर्स त्यांना पाहिजे त्या तारखेचे मेसेज शोधू शकतात. याशिवाय कंपनी मल्टिमीडिया सपोर्ट, क्यूआर कोड स्कॅनर, ऑटोमॅटिक मेसेज डिलीट आणि इन अ‍ॅप ब्राउजर यासारखे फीचर्सही लवकरच आणणार आहे. पण, अद्याप या फीचर्सच्या लाँचिंगबाबत माहिती मिळालेली नाही.