फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने फेक मेसेज किंवा अफवा पसरवणारे मेसेज पाठवणाऱ्यांसोबतच आता प्रमोशनल मेसेज पाठवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बल्क मेसेज पाठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु केली असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपने म्हटलं आहे. 15 सेकंदात 100 किंवा त्याहून अधिक मेसेज पाठवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हा निर्णय सध्या केवळ WhatsApp Business वापरकर्त्यांसाठीच आहे. 7 डिसेंबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे.

याशिवाय, जे WhatsApp Business युजर्स नवीन अकाउंट बनवून पाच मिनिटांच्या आत बल्क मेसेज करतात त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. नवीन खाते तयार केल्याच्या 5 मिनिटांत मोठ्या प्रमाणात संदेश पाठविणे किंवा प्रविष्ट करणे यावर कारवाई केली जाईल. कंपनी ते अकाउंट्स बंदही करु शकते. तसंच, काही मिनीटात डझनभर ग्रुप तयार करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

गेल्या वर्षापासूनच WhatsApp नवनव्या फीचर्सद्वारे फेक न्यूज आणि अफवा पसरवणाऱ्या मेसेजेसवर लगाम लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी खोट्या मेसेजमुळे मॉब लिंचिंगच्या अनेक घटना समोर आल्यानंतर सरकारने WhatsApp ला इशारा देताना नवीन पॉलिसी बनवण्यास सांगितलं होतं.