व्हॉट्सअॅप हा आता आपल्या सगळ्यांच्याच जगण्यातील एक अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहायचा प्रयत्न करत असतो. ही कंपनीही आपल्या युजर्सना सतत काहीतरी नवीन देऊन खूश करण्याचा प्रयत्न करत असते. कधी स्टेटसचे फिचर आणून तर कधी आणखी काही व्हॉट्सअॅप आपल्या फीचर्समध्ये नवनवीन बदल करायचा प्रयत्न करत असते. नुकतेच कंपनीने एक खास फीचर आपल्या युजर्ससाठी लाँच केले आहे. यामध्ये तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये काही बोलत असाल आणि तुम्हाला एखाद्या मेसेजवर ग्रुपमध्ये न बोलता विशिष्ट व्यक्तीशी वैयक्तिक संवाद साधायचा असेल तरीही तो पर्याय आता उपलब्ध आहे. ग्रुपमध्ये बोलता बोलता तुम्ही तुम्हाला हव्या त्या ग्रुपमधील सदस्याला वैयक्तिक मेसेज करु शकणार आहात.

यामध्ये तुम्हाला ग्रुपमध्ये आलेल्या विशिष्ट मेसेजवर दिर्घ क्लिक केल्यानंतर काही पर्याय दिसतील. त्यातील मोअर या पर्यायावर गेल्यावर त्यामध्ये मेसेज टू असा पर्याय दिसेल. यामध्ये त्या विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा उल्लेख असेल. त्यावर क्लिक करुन रिप्लाय देण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला हे फिचर अँड्रॉईडवर लाँच करण्यात आले असून त्यानंतर ते आयफोन युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यासोबतच कंपनीने फोटो आणि व्हिडियोमध्ये स्टीकर अॅड करणे, स्टेटस प्रीव्ह्यूसाठी काही फीचर आणली आहेत. या फिचर्समुळे युजर्सचा या अॅप्लिकेशनचा वापर आणखी सोपा होणार आहे.