महिन्याला सहा आकडी पगार, आवडत्या व्यक्तीशी लग्न, घर-गाडी अशी प्रत्येक गोष्ट जवळ असणाऱ्या ‘मिलेनिअल’ म्हणजे आजच्या काळातल्या नव्या पिढीला स्वत:चं लग्न टिकवण्यासाठी मात्र ‘मॅरेज कोच’चा आधार घ्यावा लागतोय. आपल्या आवडत्या प्रियकर-प्रेयसीशी लग्न होऊनही दररोजच्या ताणतणावात आणि धावपळीत जोडीदारासोबत ‘नांदा सौख्य भरे’ हे वाक्य त्यांच्यासाठी स्वप्नवत ठरलं आहे. याची अनेक कारणं आहेत, पण त्यातलं सर्वात महत्वाचं आहे, जोडीदारासोबत वेळच व्यतीत न करणं.

नवविवाहितांमध्ये घटस्फोट घेणा-यांचं प्रमाण २०१०पर्यंत चार टक्के होतं, ते २०१९मध्ये १४ टक्क्यांच्यावर गेलं आहे! सध्याच्या इन्स्टंट फूडच्या जमान्यात तरुण-तरुणींची लग्नंसुद्धा इन्स्टंट जुळतात आणि नवलाईचे दिवस संपल्यावर सुरू होतात नवरा-बायकोमधील भांडणं. अनेकदा ही भांडणं इतकी टोकाला जातात की, लग्नाची प्रेमळ बेडी तुटून विभक्त होण्यावाचून पर्याय राहत नाही. आजच्या काळातील‘मिलेनिअल कपल्स’ची मानसिकता आणि गरज ओळखून “मी, लग्न आणि ….!” या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, लग्नसंबंधाचा संपूर्ण प्रवास सहा टप्प्यांत सांगणारी मराठी-हिंदी गाणी, मुलाखत आणि प्रश्नोत्तरांतून संवाद साधत या कार्यक्रमातून ठाणेकरांना ‘नांदा सौख्यभरे’चं गोडगुपीत उलगडणार आहे.

जुन्या पिढीतलं लग्न आणि नव्या पिढीतलं लग्न यातला फरक समजावून सांगताना भारतातील एकमेव ‘मॅरेज कोच’ असलेल्या ‘ठाणेकर’ लीना परांजपे म्हणाल्या,“विवाह ही एक पवित्र संस्था आहे, असं पूर्वी मानलं जायचं. पण आता जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा पूर्णपणे बदलल्या आहेत. यामुळे काहीजणांची लग्नं अपयशी ठरत आहेत, तर बहुतेकांचा लग्न टिकवण्यासाठी काही ना काही संघर्ष सुरु असतो.सध्याच्या काळात जोडीदाराकडून फक्त जवळीक अपेक्षित नसते, तर लग्नानंतरही एकमेकांची वैयक्तिक वाढ आणि विकास शक्य होईल, हीसुद्धा अपेक्षा असते. दुर्दैवाने, बदलत्या जीवनशैलीमुळे आपलं नातं टिकवण्यासाठी आजची जोडपी एकमेकांना अत्यंत कमी वेळ देतात आणि त्यामुळे त्यांचे नाते टिकवण्याचे प्रयत्नही अपुरे पडतायत.”

“विवाहविषयक समुपदेशकाचं म्हणजे मॅरेज काऊन्सिलिंगचं काम पॅसिव्ह आहे, तर विवाह प्रशिक्षक म्हणजे मॅरेज कोचिंगचं काम एक्टिव्ह आहे. ज्याप्रमाणे क्रिकेट टीमचे प्रशिक्षक खेळाडूंसोबत राहून त्यांच्याकडून नियमित सराव करवून घेतात, त्याप्रमाणे मॅरेज कोचसुद्धा आवश्यकता भासल्यास जोडप्यांसोबत प्रत्यक्ष राहून त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांना थेट सूचना देतात”, असंही लीना परांजपे यांनी सांगितलं.

“जोडीदाराशी प्रभावी संवाद कसा साधावा, नात्यातील समस्यांचं मूळ कारण कसं ओळखावं आणि नातेसंबंधांतील समस्या सोडवण्यासाठी त्वरित कोणती उपाययोजना करावी हे तीन प्रमुख मुद्दे “मी, लग्न आणि ….!” या कार्यक्रमातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे”, असं ‘मॅरेज कोच’ लीना परांजपे यांनी आवर्जून सांगितलं. शनिवार २९ जून रोजी घंटाळी येथील सहयोग मंदिरमध्ये संध्याकाळी पाच ते सात या वेळेत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.