दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर झोपायची अनेकांना सवय असते. मात्र ही सवय त्यांना महागात पडू शकते. जेवल्यानंतर किंवा नाष्ता केल्यानंतर लगेच झोपल्यास ते आरोग्यास हानिकारक असते. पोटात काही गेल्यानंतर अनेकांना आळस येतो. झोपून जावेसे वाटते. मात्र असे कितीही वाटले तरी तसे करु नका त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पण तुम्हाला जर अशी सवय असेल तर आरोग्याच्या कोणत्या अडचणी येऊ शकतात ते पलक अग्रवाल यांनी सांगितलेली कारणे…

पचनक्रियेत अडचणी

जेवल्या जेवल्या लगेचच झोपायला गेल्यास खाल्लेल्या अन्नाचे योग्यपद्धतीने पचन होत नाही. यामुळे शरीरात एकप्रकारचे आम्ल तयार होते. पोटात तयार झालेले हे आम्ल झोपल्यामुळे छातीत जाते. त्यानंतर ते घशापर्यंत येते. त्यामुळे सतत ढेकरही येत राहतात. त्यामुळे अशा स्थितीत झोपणे आरोग्यासाठी हानिकारक असते.

वजनवाढ

तुम्ही जितके अन्न खाता त्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न करण्याची आवश्यकता असते. तसे केल्यास शरीराचे कार्य उत्तम राहण्यास मदत होते. मात्र तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपलात तर या कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे तुमच्या शरीरावरील चरबी वाढत जाते आणि नकळत तुमचे वजन वेगाने वाढते.

अॅसिडीटी

जेवण झाल्यावर लगेच झोपल्याने पोटात आम्ल निर्माण होते. ही अॅसिडीटी जास्त प्रमाणात झाली की त्याचा शरीराला त्रास होतो आणि चांगली झोपही होत नाही.

हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता

अन्नाचे योग्य पद्धतीने पचन न झाल्याने एकूणच पचनक्रिया बिघडते. तसेच अशाप्रकारे झोपल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे जेवल्यानंतर साधारण दीड ते दोन तासांनी झोपायला हरकत नाही. तेही मधल्या काळात काहीतरी व्यायाम करायला हवा.