15 December 2018

News Flash

Women’s day 2018 : मी तीच महिला आहे !

महिलादिनानिमित्त काही निवडक कविता

प्रेम , त्याग आणि कर्तव्य
सगळ्यात माझा नंबर पहिला आहे
म्हणून तर नाळेनी उदरात सांभाळते,
लेकरांनो , मी माता , मी महिला आहे !

देशाच्या हरएक जवानाने
देशासाठी जीव ओवाळून टाकलाय
कुठला क्षण शेवटचा हे ठावे नाही ,
अशा पुत्र , पिता , भर्तार , बंधूंचा मृत्यू ….. मी आयुष्यभर पाहिला आहे !

आज वंदन करता तुम्ही शिव—शंभूंना ,
मी दोघांचाही विरह वर्षानुवर्षे साहिला आहे !
उघड्या बोडक्या काटकांचं सैन्य जमवलं ,
त्या शिव—शंभूंची मी जिजाऊ , महिला आहे !

पोटचा पोर बांधला पाठीवर
सुटले भरधाव शत्रूच्या मागावर
माझ्यासारख्या झाशीच्या रक्तांवर
स्वतंत्र भारत उभा राहिला आहे!

मी थांबले नाही पृथ्वीवर गाजवून
मी सोडलं अंतराळ पण हलवून
मी कवींचीच नाही तर खरीही
कल्पना , मीच विल्यम्स महिला आहे !

मी युद्धात गमावलं कुंकू
अन् लाथ मारली बहुराष्ट्रीय नोकरीला
सैन्यात झाले दाखल , बंदूक उचलण्यासाठी
माझ्याही प्राणांची आहुती घे देशा,
मी प्राण तुला वाहिला आहे!

आरक्षणांच्या कुबड्या आत्ता दिल्यात मला
मी कधी थांबले होते इतकी युगं ?
मीच कुंती , मीच द्रौपदी अन् मीच उत्तरा
त्यागाला ना जिच्या सीमा , मी तीच महिला आहे !

– उदय गंगाधर सप्रे

————-

आईच्या मायेचा दर्या असते स्त्री
पतीच्या संसारात भार्या असते स्त्री
घरच्या प्रगतीची मशाल असते स्त्री
विचारांच्या दुनियेत विशाल असते स्त्री

सुजाणपण असलेली मूर्ती आहे स्त्री
नम्रता व संवेदनशीलतेची पूर्ती आहे स्त्री
सकल चराचराची नवसंजीवनी आहे स्त्री
त्याग अर्पण करणारी मनस्विनी आहे स्त्री

अलौकिक शोधणारी प्रेमिका असते स्त्री
अद्वैतत्व जाणणारी देविका असते स्त्री
प्रत्येक नाते आपुलकीने बांधत असते स्त्री
सासरला गुण्यागोविंदाने नांदत असते स्त्री

दोन्ही घराला वरदान ठरते स्त्री
यशाच्या प्रवासात योगदान देते स्त्री
संस्कृती सौंदर्याची खाण असते स्त्री
माहेरच्या मंडळींची प्राण असते स्त्री

“प्रतिभा”वंत असते विश्वाच्या नेत्रात स्त्री
उम”लता”ना दिसते प्रत्येक क्षेत्रात स्त्री
“कल्पनां”च्या सोबत गेली आकाशात स्त्री
अंधारलेल्या घराला आणते प्रकाशात स्त्री

जिजाऊंच्या प्रेरणेने जागृत झाली स्त्री
सावित्रीमुळे शिक्षणात प्रगत झाली स्त्री
राणी लक्ष्मीच्या शौर्यातून खंबीर होते स्त्री
अहिल्येच्या न्यायप्रविष्ठेतून धीर देते स्त्री

– योगेश्वर पी. मिरकुटे , नांदेड

First Published on March 8, 2018 12:36 pm

Web Title: womens day 2018 special poem on women