मासिक पाळीच्या दिवसांत सॅनिटरी नॅपकिन्स वापरायचे की पूर्वीच्या स्त्रिया वापरत तसा सुती  कपडा वापरायचा, स्वच्छता कशी पाळायची यावर तज्ज्ञ मंडळींनी केलेलं मार्गदर्शन-

भाग – १
तीन आठवडय़ांपूर्वी ‘पॅडमॅन’ या हिंदी सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. तामिळनाडूच्या अरुणाचलम मुरुगनंथम या सामाजिक कार्यकर्त्यांच्या आयुष्यावर ‘पॅडमॅन’ हा सिनेमा आहे. ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्स बनवून मोठय़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याचं महत्त्वपूर्ण काम या माणसाने केलं. सिनेमाच्या ट्रेलरने सॅनिटरी नॅपकिन्स या महत्त्वपूर्ण विषयाचा विचार करायला भाग पाडलं. या निमित्ताने नवीन वर्षांतील पहिल्याच महिन्याचा ‘लोकजागर’ या मालिकेचा विषय आहे सॅनिटरी नॅपकिन्स. सॅनिटरी नॅपकिन्स वापरताना स्वच्छता टिकवून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मालिकेचा पहिला लेख त्याविषयीच्या स्वच्छता आणि काळजी घेण्याबद्दल; तसंच काही गैरसमजांबद्दलही.

Low back pain: How to fix your posture and straighten your spine
Low back pain: पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन

मासिक पाळी हा विषय मुळातच गोपनीय ठेवला जातो. याविषयी कोणाला काही सांगायचं नाही, कुठे काही बोलायचं नाही, पाळी सुरू झाली आहे हेही सांगायचं नाही अशा गोष्टी घडतात. त्यामुळे त्यासंबंधीच्या स्वच्छतेबद्दल तर बोलणं दूरच राहिलं. पाळी सुरू असताना सॅनिटरी पॅड बदलणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पॅड बदलणं हे संकोचल्यासारखं वाटतं. मग अशा वेळी एखादी स्त्री तो पॅड तासन्तास तसाच ठेवते आणि घरी जाऊन बदलते. पण त्यावर ‘असं करू नये. पॅड वेळच्या वेळी बदलायलाच हवं’ असे सल्ले दिले जातात. पॅड कधी आणि का बदलणं याबद्दल काही गैरसमज आहेत. सॅनिटरी पॅड्स बदलणं हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. खूप रक्तस्राव झालेला सॅनिटरी पॅड बराच वेळ तसाच ठेवला तर त्या स्त्रीला त्याचा त्रास होऊ शकतो. पण ते सतत बदलत राहिलं पाहिजे हा समज चुकीचा आहे. याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार सांगतात, ‘मासिक पाळीतील रक्तस्राव हा लघवी, संडास, घाम यांसारखाच नैसर्गिक स्राव आहे. त्यामुळे सॅनिटरी पॅड किती वेळाने बदलावा याचं कोणतंच शास्त्रीय परिमाण नाही. कारण वेगवेगळ्या सॅनिटरी पॅड्सच्या रक्तस्त्रावशोषून घेण्याच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. प्रत्येक स्रीला होणाऱ्या रक्तस्रावाचं प्रमाणही कमी-जास्त होत असतं. त्यामुळे त्या स्रीने वापरलेलं पॅड कधी आणि किती भरेल हे तिच्या रक्तस्रावावर अवलंबून असतं. त्यानुसार तिने पॅड बदलायला हवा’ सॅनिटरी पॅड्समध्ये केमिकल्सचा वापर केलेला असतो हा गैरसमजही डॉ. निखिल खोडून काढतात. अशा प्रकारचं कोणतंही केमिकल त्यात नसतं हे ते स्पष्ट करतात.

मासिक पाळीत गर्भाशय, अंडाशय हे जसं महत्त्वाचं असतं; तसंच योनिमार्गाच्या भोवतालची जागाही महत्त्वाची ठरते. ती स्वच्छच असायला हवी. पाळीत सतत रक्तस्राव होत असल्याने तेथील जागा ओलसर असणं स्वाभाविक आहे. पण तरी ती जागा शक्य तितकी कोरडी ठेवणं गरजेचं असतं. कारण सतत ओलसर राहून त्या त्वचेवर पुरळ (रॅशेस) उमटण्याची शक्यता असते. तसंच कधी कधी जंतुसंसर्ग (फंगल इन्फेक्शन) होण्याचाही संभव असतो. या जंतुसंसर्गामुळे आणखी काही आजार होऊ शकतात. त्यामुळे पॅड्स बदलण्याचा ठरावीक कालावधी नसला तरी त्यामुळे योनिमार्गाभोवतीची त्वचा ओलसर राहतेय का, याचा विचार व्हायला हवा.

आजही काही भागांमध्ये काही स्त्रिया पॅड्सऐवजी सुती कपडा वापरतात. सॅनिटरी पॅड्सची जास्त किंमत काही भागांमधल्या स्त्रियांना परवडत नाही. आता खरं तर कमी किमतीचे पॅड्स सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण तरीसुद्धा अजूनही अशीही काही ठिकाणं आहेत; जिथे मासिक पाळीत आजही सुती कपडाच वापरला जातो. सुती कपडय़ापेक्षा सॅनिटरी पॅड्स चांगले असंही सांगितलं जातं. असं सांगण्याचं एक कारण आहे. पाळीत वापरला गेलेला कपडा स्वच्छ धुवून कोरडा केला नाही तर त्याचा त्रास होतो. डॉ. निखिल दातार याबद्दल सविस्तर सांगतात, ‘सॅनिटरी पॅड्सचं काम साधारण डायपरसारखंच असतं. डायपर लघवी शोषून घेतो तर सॅनिटरी पॅड रक्तस्त्राव शोषून घेतो. त्यामुळे जसं डायपर अमुक तासांनी बदलायला हवं असं म्हटलं जात नाही तसंच सॅनिटरी पॅड्सचंही आहे. लहान मुलांचे लंगोट स्वच्छ धुऊन कोरडे केले जातात. स्त्रियांच्या बाबतीत असं होत नाही. त्या पाळीच्या काळात वापरत असलेला  सुती कपडा नीट न धुतल्यामुळे अस्वच्छ राहणं, तो कपडा इतर लोकांना दिसू नये म्हणून तो आडोशाला वाळवला जाणं, त्यामुळे तो कोरडा न होणं; या कारणांमुळे जंतूससंर्ग होऊन रोगराई पसरते. लहान मुलांच्या डायपरमध्ये लघवी शोषून घेण्याची क्षमता लंगोटपेक्षा जास्त असते. तेच गणित सुती कपडा आणि पॅड्स यांना लागू होतं. सॅनिटरी पॅड्स परवडू शकत नसतील किंवा अन्य काही कारणांमुळे ते वापरायचे नसतील तर जास्तीत जास्त रक्तस्त्राव शोषणारा कपडा वापरावा. त्याच्या घडय़ा करून त्याची रक्तस्त्राव शोषून घेण्याची क्षमता वाढतेय का ते बघावं. योनिमार्गाभोवतीची जागा जास्तीत जास्त कोरडी ठेवण्यासाठी कपडय़ाची रक्तस्त्राव शोषून घेण्याची क्षमता वाढवावी. योनिमार्गाभोवतीची जागा ओलसर राहिली तर जंतुसंसर्ग होऊ शकतो. तो टाळण्यासाठी तिथे ओलसरपणा येऊ देता कामा नये.’

‘पीरिएड्स आर नॅचरल.. डोंट फील बॅड’ असं सांगणारा एक व्हिडीओ फेसबुकवर फिरत होता. त्यात गावात राहणारी एक शाळेत जाणारी मुलगी पाळी आली म्हणून शाळेत जात नाही. पॅड्सऐवजी सुती कपडा वापरते. त्यातून रक्तस्त्राव नीट शोषला जात नाही. त्यामुळे ती शाळेत जात नाही. तिच्या वडिलांना तिची पॅड्स वापरण्याची गरज कळते आणि ते तिला पॅड्स आणून देतात, अशा आशयाचा तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. विचार करायला लावणाऱ्या या व्हिडीओमधल्या मुलींसारख्या कित्येक मुली राज्यभर, देशभर असतील. त्यांच्यापैकी अनेकांना सॅनिटरी पॅड्स परवडणारे नसतात तर काहींपर्यंत सॅनिटरी पॅड्सबद्दलची पुरेशी माहिती पोहोचतही नाही. काहींना ते कसे वापरायचे ते नीट माहीत नसतं. काही गावांमध्ये आधीच्या पिढीतील स्रियांनी सुती कपडाच वापरलेला असतो. त्यांच्या पुढच्या पिढीनेही तसंच करावं ही मानसिकता प्रवाहात तशीच पुढे पुढे जात राहते आणि तरुण मुली सॅनिटरी नॅपकिन्सपासून फार दूर राहतात. पण त्यावरही मात करता येते. सॅनिटरी पॅड्स विकत घेणं परवडणारं नसेल त्यांनी जास्तीत जास्त रक्तस्त्राव शोषून घेईल अशा प्रकारचा कपडा वापरावा.  जेणेकरून योनिमार्गाभोवतीचा भाग ओलसर न राहता कोरडाच राहील.

बाळाचं डायपर आणि स्त्रियांचं सॅनिटरी पॅड यांचं काम एकच आहे. द्रवपदार्थ शोषून घेणे. बाळाचं डायपर खूप ओलसर असेल आणि बराच वेळ बदललं नाही तर त्या बाळाच्या त्वचेवर पुरळ येतं. असंच पुरळ स्त्रियांची योनिमार्गाभोवतीची जागा ओली राहिली की तिथे येतं. असं पुरळ येण्याचं प्रमाण बाळांपेक्षा स्रियांमध्ये जास्त आहे. कारण स्रियांना त्या भागातील त्वचेवर केस असतात. तेथील त्वचेला हवा आणि सूर्यप्रकाश कमी मिळतो. बाळांना त्वचा कोरडी राहण्यासाठी लंगोट, डायपर असं न घालता काहीही न घालता काही वेळ तसंच ठेवता येतं. स्त्रियांच्या बाबतीत तसं होऊ शकत नाही. या सगळ्यामागे एक विशिष्ट मानसिकता दडली आहे. मासिक पाळीबद्दल कोणाशी काहीच बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचंही नाही, असा बहुतांशी महिलांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे त्यांना होत असलेला त्रासही दुर्लक्षितच होतो. एखादी स्त्री तिच्या लहान मुलाला झालेल्या जंतुसंसर्गाबद्दल दहा जणांशी मोकळेपणाने चर्चा करेल; पण स्वत:च्या जंतुसंसर्गाबद्दल चकार शब्द काढणार नाही; हा विरोधाभास आजही ठिकठिकाणी जाणवतो.

आता सॅनिटरी नॅपकिन्सना टॅम्पून्स, कप्स असे पर्याय आले आहेत. या सगळ्याचंच काम रक्तस्राव शोषून घेणं हेच आहे. पण प्रत्येक स्त्री तिच्या सोयीनुसार आणि तिला होत असलेल्या रक्तस्रावानुसार पर्यायाची निवड करते. एखाद्या स्त्रीला खूप जास्त रक्तस्राव होत असेल आणि तो नेमका किती जास्त होतोय हे जाणून घ्यायचं असेल तर ते मोजण्यासाठी कप्स जास्त उपयोगी ठरत असतील. पण कप्स वापरण्याबद्दल काही गैरसमज आहेत. त्यामुळेच ते वापरण्याचं प्रमाण आजही फारसं नाही. मुंबईतील सायन हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागातील असिस्टंट प्रोफेसर डॉ. प्रज्ञा सुपे याबद्दल सांगतात, ‘मेन्स्ट्रअल कप्स वापरणाऱ्या स्त्रियांची संख्या अजून तरी म्हणावी तितकी जास्त नाही. हे कप्स वापरण्याबद्दल काही गैरसमज आहेत. ते आधी दूर करायला हवेत. कप्स वापरले तर फारशी स्वच्छता राहणार नाही, कप्समुळे गळती होऊ शकते असे काही गैरसमज आहेत. पण योग्य त्या साइजचा कप घेतला की गळती होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. असं केल्याने कप्सचादेखील योग्य प्रकारे वापर करता येतो.’ आणखी एक गैरसमज डॉ. सुपे दूर करतात. सॅनिटरी पॅडचे ब्रॅण्ड बदलणं, हे चांगलं नाही; या गैरसमजाविषयी डॉ. सुपे सांगतात, ‘एखाद्या मुलीला अचानक पाळी आली आणि तिच्याकडे पॅड नसेल तर ती साहजिकच तिच्या सोबत असणाऱ्या मुलीकडून पॅड घेणार. तिला तिच्या नेहमीच्याच ब्रॅण्डचाच पॅड मिळेल याची शाश्वती नाही. पण म्हणून तिला त्या वेगळ्या ब्रॅण्डच्या पॅडचा त्रास होईल, असं नाही.’

मासिक पाळीत अनेक गोष्टींवर र्निबध लागू असतात. ‘हे करू नये आणि ते टाळावं’ याची मोठी यादी असते. त्यापैकीच एक म्हणजे ‘घट्ट कपडे घालू नये’. आपल्याकडे घट्ट कपडे म्हणजे साधारणपणे जीन्स. पण अनेक तरुण मुली मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जीन्स घालण्याला प्राधान्य देतात तर काही पाळीच्या दिवसांमध्ये जीन्सवर फुली मारतात. पण यातलं काय चूक आणि काय बरोबर याचा खुलासा डॉक्टर करतात. डॉ. दातार सांगतात, ‘पाळीच्या दिवसांमध्ये घट्ट कपडय़ांचा  त्रास होत नाही. शरीराच्या ज्या भागात हवा, सूर्यप्रकाश मिळत नाही, सतत घाम येतो, पुष्कळ केस असतात त्या जागेत ओलसरपणा राहिला तर अ‍ॅलर्जी, जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून घट्ट कपडे आणि मासिक पाळी याचा संबंध लावला जातो. पण एखादी स्त्री २४ तास एसीमध्ये बसत असेल किंवा तिला फारसा घाम येत नसेल तर तिने घट्ट कपडे घातले किंवा सैल कपडे घातले याचा काहीच फरक पडत नाही.’ याबद्दलच डॉ. सुपेही सांगतात, ‘मासिक पाळीत घट्ट कपडे घालावे की सैल कपडे हा प्रत्येकीच्या सोयीचा भाग आहे. जास्त घट्ट कपडय़ांमध्ये पॅड मांडीला घासून त्वचेला त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतो सैल कपडे घालावेत. असा त्रास सगळ्यांनाच होतो असंही नाही. त्यामुळे सरसकट घट्ट कपडे आणि त्रास असं समीकरण लावू नये.’

सॅनिटरी पॅड्स सगळ्यांनाच परवडतात असं नाही. पण आता ग्रामीण भागांमध्येही बचत गट, स्वयंसेवी संस्था कमी दरातले सॅनिटरी पॅड्स बनवतात. हे पॅड्स फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही विक्रीस येतात. पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मोठय़ा ब्रॅण्डचे पॅड म्हणजे गुणवत्तेने चांगले आणि कमी दराचे पॅड्स म्हणजे कमी गुणवत्तेचे ही मानसिकता आजही स्त्रियांमध्ये काही प्रमाणात दिसून येते. डॉ. प्रज्ञा सुपे हेच पटवून देतात, ‘ब्रॅण्डेड पॅड्सच्या किमती जास्त म्हणजे ते पॅड्स उत्तम दर्जाचे आणि बचत गट आणि स्वयंसेवी संस्था यांनी तयार केलेले पॅड्स स्वस्तात म्हणून कमी दर्जाचे ही मानसिकता खोडून काढली पाहिजे. मुळात हे समीकरणच चुकीचं आहे. बचत गट किंवा स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेले पॅड्स स्वस्त असले तरी तेही उत्तम दर्जाचे असू शकतात.’ याबद्दलच डॉ. निखिल दातार महत्त्वपूर्ण मुद्दा सविस्तर मांडतात, ‘सातत्याने दिलेली ठरावीक गुणवत्ता म्हणजे ब्रॅण्ड. बचत गट किंवा दुसरी एखादी संस्था ठरावीक गुणवत्तेचे पॅड्स सातत्याने बनवत असेल तर तोही एक ब्रॅण्ड होऊ शकतो. या ब्रॅण्डचे पॅड्स घ्यायचे की नाहीत हे त्या-त्या स्त्रीने ठरवायचं असतं. त्या पॅडमध्ये वापरलेल्या घटकांचा तिला त्रास तर होत नाहीये ना, त्यात कापसाचं प्रमाण किती आहे, रक्तस्त्राव शोषून घेण्याची क्षमता किती आहे, ते वापरल्यामुळे घाम येतो की नाही, त्यामुळे इतर कपडे खराब झाले आहेत का, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत विचार करून नंतरच त्या ब्रॅण्डचे पॅड्स घ्यायचे की नाही हे ती स्त्री ठरवते. स्वयंसेवी संस्था किंवा बचत गट उतम गुणवत्तेत सातत्य टिकवत पॅड्स तयार करत असेल तर तो एक चांगला ब्रॅण्ड होऊ शकतो. पण हे तुलनेने कमी होताना दिसतं. त्यामुळे ते घेताना ग्राहक विचार करतो.’

मासिक पाळीबद्दल ज्याप्रमाणे जागरूकता होत आहे तशीच पाळीच्या दिवसांमधील स्वच्छतेबद्दलही व्हायला हवी. कपडे वापरावेत की सॅनिटरी पॅड्स हा प्रत्येक स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जे वापरलं जाईल त्यात स्वच्छता कशी टिकून राहील याचा विचार करणं खूप महत्त्वाचं ठरतं. सॅनिटरी पॅड्स वापरले तर त्याबद्दलचे गैरसमज दूर करायला हवेत. तसंच कापड वापरलं तर ते स्वच्छ धुवून सूर्यप्रकाशात पूर्णपणे कोरडं व्हायला हवं. मासिक पाळी, सॅनिटरी पॅड्स, सुती कपडा, कप्स, टॅम्पून या साऱ्याबद्दल चार जणी सांगतात म्हणून त्याकडे लक्ष न देता सत्य पडताळून त्याबद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे. मुळात या सगळ्यासाठी त्याबद्दल जवळच्या व्यक्तीशी बोलणं अत्यंत गरजेचं असतं. ‘पॅडमॅन’च्या ट्रेलरमधले दोन संवाद अगदी अर्थपूर्ण आहेत. सिनेमाचा नायक त्याच्या बहिणींना सॅनिटरी पॅड्स देतो. तेव्हा त्याची बहीण म्हणते, ‘बहन को कोई ऐसी चीज देता है क्या? ’ त्यावर सिनेमाचा नायक, ‘नहीं, पर देनी चाहिए. राखी बांधी थी ना तो रक्षा का वचन निभा रहा था.’ हा संवाद महत्त्वपूर्ण वाटतो. काही स्त्रियांची मानसिकता त्याच ट्रेलरच्या आणखी एका संवादातून दिसते. ‘हम औरतों के लिए बीमारी से मरना शरम के साथ जीने से बहतर है’ ही मानसिकता पूर्णपणे बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थाने पाळीच्या दिवसांच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता होईल.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com / @chaijoshi11
सौजन्य – लोकप्रभा