चीनची स्मार्टफोन कंपनी असलेल्या शिओमी कंपनीने अगदी कमी वेळात भारतात आपले स्थान निर्माण केले आहे. भारतात सध्या शिओमी कंपनीचे दोन प्लांट असून यामध्ये आणखी एका प्लांटची भर पडली आहे. कंपनीने आपला पॉवर बँक तयार करण्याचा आणखी एक प्लांट सुरु केला असून यामध्ये तयार करण्यात आलेल्या पॉवरबँक लाँचही करण्यात आल्या आहेत. हा प्लांट नोएडामध्ये सुरु करण्यात आला असून यासाठी कंपनीने आणखी एका टेक्नॉलॉजी कंपनीशी टायअप केले आहे. या प्लांटमध्ये प्रत्येक सात मिनिटाला एक पॉवरबँक तयार केली जात आहे. त्यामुळे अतिशय उत्तम तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात येत आहे.

Mi Power Bank 2i असे या पॉवरबँकचे नाव आहे. त्याचे २ व्हेरियंट लाँच करण्यात आले असून एक १० हजार मिलिअॅम्पियर्सचा तर दुसरा २० हजार क्षमतेचा आहे. १० हजार मिलिअॅम्पियर्सच्या पॉवरबँकची किंमत ७९९ रुपये आहे. तर २० हजार क्षमतेची पॉवरबॅंक १४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. शिओमीच्या वेबसाईटवर २३ नोव्हेंबरपासून दुपारी १२ वाजता या पॉवरबँकची विक्री सुरु होईल.