शाओमी या चिनी कंपनीने अगदी कमी काळात भारतीय बाजारात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाओमीच्या एमआय नोट ४ च्या प्रचंड यशानंतर बहुप्रतिक्षीत शाओमी रेडमी नोट ५ हा फोनही लाँच केला. त्यानंतरही कंपनीने आपली अनेक आकर्षक मॉडेल बाजारात दाखल करत आपल्या ग्राहकांना खूश केले. आता कंपनीने आपले आणखी एक नवीन मॉडेल दाखल करत ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का देणार आहे. ३१ मे रोजी कंपनी आपला Xiaomi Mi 8 हा फोन बाजारात दाखल करणार असल्याची शक्यता आहे. ३१ मे रोजी कंपनीच्या चीनमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रसाठी माध्यमांना आमंत्रणे देण्यास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात कंपनी आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन Mi 8 लाँच करण्याची शक्यता आहे. शाओमीची भारतातील मागणी पाहता हा फोन चीननंतर लगेचच भारतातही लाँच होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनी आपला Mi 8 फोनची अॅनिव्हर्सरी एडिशन लाँच करणाऱ असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कंपनीला बाजारात दाखल होऊन ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनी Mi 8 दाखल करेल असे बोलले जात आहे. मात्र कंपनीने याच्या आधी Mi 6 फ्लॅगशीप लाँच केला, त्यानंतर Mi 7 लाँच केलेला नसल्याने आता थेट Mi 8 लाँच करणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. Mi 8 या फोनमध्ये असणाऱ्या फिचर्सबाबत आणि किंमतीबाबत बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे.

शिओमीने नुकताच आपला रेडमी एस 2 हा फोन लॉन्च केला होता. खास सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग करणाऱ्यांना लक्ष्य करुन या फोनची निर्मिती करण्यात आली आहे. हा आमचा आतापर्यंतचा ‘बेस्ट रेडमी सेल्फी स्मार्टफोन’ असल्याचा दावा कंपनीने केला आहे. चिनी मार्केटमध्ये हा फोन रोज गोल्ड, शॅम्पेन गोल्ड आणि प्लॅटिनम सिल्वर या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. चीनमध्ये वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कंपनी आपली इतर अनेक उत्पादने लाँच करेल असेही सांगण्यात आले आहे.