मोबाइल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाइलच्या वापारामुळे आयुष्यातील अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी त्याचे दृष्परिणामही तितकेच आहे. ‘जर्मन फेडरल ऑफिस फॉर रेडिएशन प्रोटेक्शन’नं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात त्यांनी सर्वाधिक रेडिएशन करणाऱ्या मोबाइल्सची यादी जाहीर केली. या यादीत भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय अशा चार कंपनींचा समावेश आहे.

‘जर्मन फेडरल ऑफिस फॉर रेडिएशन प्रोटेक्शन’नं केलेल्या सर्वेक्षणानंतर ‘स्टॅटीस्टा’नं सर्वाधिक रेडिएशन करणाऱ्या फोन्सची यादी जाहीर केली आहे. यात ‘रेडमी’, ‘वनप्लस’, ‘गुगल पिक्सेल’, ‘अॅपल’ कंपनींचा समावेश आहे. ‘स्टॅटीस्टा’च्या आकडेवारीनुसार शिओमीच्या mi A1 मधून सर्वाधिक रेडिएशन होतं. दुसऱ्या क्रमांकावर वनप्लस ५ टी हा फोन आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शिओमी mi max 3 हा फोन आहे. या फोनमधून ‘स्पेसिफिक अॅब्जॉर्पशन रेट'(SAR) पेक्षाही अधिक प्रमाणात रेडिएशन होत असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. एकूण सोळा मोबाइल फोन्सचा या यादीत समावेश आहे.

यातले सर्वाधिक फोन हे शिओमी कंपनीचे आहेत. या यादीत ‘अॅपल ७’ आणि ‘अॅपल ८’ या फोन्सचाही समावेश आहे. भारतात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातून या यादीत समाविष्ट असलेले फोन हे भारतात सर्वाधिक लोकप्रिय फोन आहेत. त्यामुळे ही मोबाइल वापरणाऱ्यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे हे नक्की !