इतर मोबाइल कंपन्यांच्या तुलनेत कमी किंमतीत मिळणारे शाओमीचे मोबाइल अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. नवनवे मोबाइल आणि अन्य वस्तू बाजारात आणण्यात शाओमीचा हात कोणतीही कंपनी धरू शकत नाही. अशातच आता अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शाओमी इंडियाने एक भन्नाट कल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शाओमीच्या चाहत्यांना आता फोन वेंडिंग मशीनच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. यासाठी कंपनीने ‘मी एक्स्प्रेस कियोस्क’ची (Mi Express Kiosks) सुरूवात केली आहे. या वेंडिंग मशीनमधून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा कॅशच्या सहाय्याने मोबाइल फोन खरेदी करता येतील.

सध्या भारतात केवळ बंगळुरूमधील मान्यता टेक पार्कमध्ये अशा प्रकारचे मशीन कंपनीने उभारले आहे. या मशीनमधून रेडमी नोट 7, रेडमी नोट 7 प्रो, पोको एफ 1, व्हाय 3, रेडमी गो यासांरखे मोबाइल खरेदी करता येऊ शकतील. याव्यतिरिक्त मोबाइल फोनच्या बॅटली, ब्लूटूथ स्पीकर, कार चार्जरदेखील खरेदी करता येऊ शकतील.

शाओमी लवकरच देशातील अन्य शहरांमध्येही ‘मी एक्स्प्रेस कियोस्क’ सुरू करणार आहे. टेक पार्क, विमानतळ, मेट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल आदी ठिकाणी शाओमी ही मशीन उभारणार आहे. ग्राहकांना दुकानांमध्ये मिळणाऱ्याच किंमतीला या मशीनमधून मोबाइल आणि अन्य अॅक्सेसरीज विकत घेता येणार आहेत. शाओमीने सर्वप्रथम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनच आपल्या मोबाइलची विक्री करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर कंपनीने ऑफलाईन मार्केटमध्ये पाऊल ठेवले होते. सध्या शाओमी ऑफलाईन मार्केटवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत असून नुकतेच त्यांनी भारतात हजारावे एमआय स्टोअर सुरू केले आहे.