Parenting Mistakes : आजकाल मुलं लहान वयातच मोठ्यांसारखी वागू लागली आहेत. केवळ बुद्धीनेच नाही तर शरीराने आणि विचारांनीही मोठी होताना दिसत आहेत. ज्या वयात त्यांनी खेळलं, बागडलं पाहिजे, त्या वयात त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होताना दिसतोय. यात विशेषत: मुलींमध्ये लवकर पौगंडावस्थेचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतेय. पूर्वी मुलींमध्ये ११ ते १३ वर्षांपर्यंत मासिक पाळी आणि शारीरिक बदल दिसून येते होते. पण, आता अगदी ७ ते ९ वर्षांच्या मुलींमध्ये हे बदल दिसून येत आहेत. ही केवळ वैद्यकीय समस्या नाही तर मुलींच्या बालपण, मानसिक स्थिती आणि भावनिक संतुलनासाठी एक गंभीर आव्हान बनत आहे. मुली लवकर पौगंडावस्थेत आल्याने त्यांना भविष्यात नैराश्य, चिंता आणि एडीएचडीसारख्या समस्या जाणवू शकतात. पण, मुलींमध्ये लवकर पौगंडावस्था दिसून येण्यामागे नेमकी काय कारणं आहेत जाणून घेऊ…
१) खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा मुलींच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. जंक फूडमुळे शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. शरीरातील अचानक हार्मोन्स बदलामुळे एकूण शरीरावर त्याचा परिणाम होतो. अशाने १९९० च्या दशकाच्या तुलनेत आजच्या मुलींमध्ये तारुण्य अवस्था सरासरी एक वर्ष आधीच सुरू होतेय.
२) बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींची अभाव
आजकाल सर्वचं मुलं आपला बहुतेक वेळ मोबाईल, टीव्ही किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्समध्ये घालवतात. बाहेर खेळणे, धावणे, उड्या मारणे आणि इतर शारीरिक हालचाली जवळपास करतचं नाहीत. जेव्हा शरीर सक्रिय नसते तेव्हा वजन नियंत्रणाबाहेर वाढते. यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडू शकते. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे शरीराच्या नैसर्गिक वाढीवरही परिणाम होतो, ज्यामुळे शरीरात लवकर बदल होऊ लागतात. विशेषत: यामुळे मुलींमध्ये अकाली मासिक पाळी आणि स्तनांचा विकास यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
३) झोपेचा अभाव
मुलांच्या विकासात झोप फार महत्त्वाची भूमिका बजावते. पण, आजकाल रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय मुलांचे हार्मोनल संतुलन बिघडवते. जर मुलं वेळेवर झोपली नाही तर त्यांच्या शरीरात मेलाटोनिनसारखे हार्मोन्स योग्य प्रमाणात तयार होत नाही, यामुळे शारीरिक वाढ आणि यौवन नियंत्रिण होते, म्हणून मुलांना रात्री ९ ते १० वाजेपर्यंत झोपणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे, यामुळे शरीराचे संतुलन राखता येते.
४) आहारात बदल
अकाली पौगंडावस्था टाळण्यासाठी मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. ० ते १० वर्ष वयाच्या मुलांना ताजी फळं, हिरव्या भाज्या, काजू आणि घरी बनवलेले पौष्टिक अन्न द्यावे. बाहेरील प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड खाणे टाळा. पौष्टिक अन्न मुलांचे शरीर आतून मजबूत करते आणि हार्मोनल संतुलन राखते.