How To Buy Pure Paneer: तेल, तूप, दुधाच्या पाठोपाठ आता शाकाहारी मंडळींच्या प्रिय पनीरमध्ये सुद्धा सर्रास भेसळ होत असल्याची माहिती समोर येत आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला, नोएडातील अहवालात असे आढळून आले की भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने तपासलेल्या १६८ खाद्यपदार्थांपैकी पनीर आणि खव्यापासून बनवण्यात आलेली ४७ उत्पादने भेसळयुक्त होती. तर याआधी फेब्रुवारीमध्ये, अधिकाऱ्यांनी तब्बल १३०० किलोग्रॅम बनावट पनीर जप्त केले होते. मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गावर सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्याहीआधी मे २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी दोन कारखान्यांवर छापे टाकून तब्बल २००० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले होते. या घटनांमुळे साहजिकच आवडीने पनीरचे सेवन करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आज हीच भीती दूर करण्यासाठी आपण योग्य व शुद्ध पनीर कसे ओळखावे हे जाणून घेणार आहोत.
दिल्लीच्या सीके बिर्ला हॉस्पिटलमधील पोषणतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ दीपाली शर्मा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही खालील गोष्टी तपासून पनीरच्या शुद्धतेची पडताळणी करू शकता.
- पोत: अस्सल पनीर मऊ असते आणि सहज तुटते. तर सिंथेटिक पनीर अनेकदा रबरी किंवा जास्त गुळगुळीत दिसते.
- वास: पनीरचा वास घ्या; अस्सल पनीरला सौम्य, दुधाळ सुगंध असतो, तर नकली पनीरमध्ये याची कमतरता असू शकते किंवा रासायनिक सुगंध येऊ शकतो.
- चव: चव देखील पनीरची शुद्धता दर्शवू शकते. वास्तविक पनीरला स्वच्छ, दुधाळ चव असते, तर सिंथेटिक पनीरमध्ये कृत्रिम चव येते. तपासणीसाठी सुद्धा कमीच प्रमाणात पनीर चाखून पाहावे.
- आर्द्रता: अस्सल पनीरमध्ये सामान्यत: जास्त आर्द्रता असते, दाबल्यावर मठ्ठा बाहेर पडतो, तर सिंथेटिक पनीर कोरडे होते.
- स्वयंपाक करण्याची प्रक्रिया: स्वयंपाक करताना, अस्सल पनीर तपकिरी रंगाचे होते. थोडा नरमपणा आला तरी पूर्णपणे आकार बदलत नाही. तर, बनावट पनीर रबरी असल्याने वितळू शकते.
दीपाली शर्मा असेही सुचवतात की, शक्य असल्यास पॅकेजिंग केलेले पनीर टाळाच पण घ्यायचे झाल्यास त्यावरील सुरक्षा चिन्हे तपासून घ्या. विश्वसनीय दुकानांमधून किंवा ब्रॅण्ड्सचे पनीरचे निवडा.
हे ही वाचा<< बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
बनावट पनीर कोणत्या अवयवांवर हल्ला करतं ?
सिंथेटिक पनीर खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या आणि मळमळ होऊ शकते. आणि दीर्घकाळापर्यंत अशा भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या यकृत आणि मूत्रपिंडांवरही परिणाम होऊ शकतो. कृत्रिम पनीरमध्ये हानिकारक रसायने आणि दुधाची पावडर असू शकते, ज्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो.