भारतीय घरांमध्ये भाकरी किंवा पोळीशिवाय जेवण पूर्ण होत नाही. गव्हाची पोळी, पराठा किंवा नान या पारंपरिक पदार्थांना आपली जुनी ओळख आहे. पण आता आरोग्याची काळजी घेणारे अनेकजण आपले धान्यामध्ये बदल करत आहेत आणि बाजरी, ज्वारी, नाचणीसारख्या पौष्टिक धान्याकडे वळत आहेत. यामध्ये ज्वारी विशेष लोकप्रिय ठरत आहे. एकेकाळी गावाकडची भाकरी म्हणून ओळखली जाणारी ज्वारीची भाकरी आता शहरी आहारातही वापरली जाते. त्यामागे आरोग्यासाठी असलेले अनेक फायदे कारणीभूत आहेत. चला तर पाहूया, ज्वारीची भाकरी गव्हापेक्षा का जास्त चांगला पर्याय ठरते.

१. ज्वारीची भाकरी नैसर्गिकरीत्या ग्लूटेन-फ्री आहे

ग्लूटेन अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी ज्वारी उत्तम धान्य आहे. गव्हामध्ये असलेल्या ग्लूटेनमुळे फुगणे, थकवा, डोकेदुखी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात. आहारतज्ज्ञ रुपाली दत्ता यांच्या मते, गव्हाऐवजी ज्वारी खाल्ल्यास पचन सुधारते आणि जेवण हलके वाटते.

२. जास्त वेळ पोट भरलेलं ठेवते

बंगलोरस्थित आहारतज्ज्ञ डॉ. अंजू सूद सांगतात की, ज्वारीमध्ये उच्च प्रतीचं फायबर असतं. एका सर्व्हिंगमध्ये १२ ग्रॅमपेक्षा अधिक फायबर मिळतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या लोकांसाठीही हे फायबर उपयुक्त ठरतं.

३. पचनासाठी गव्हापेक्षा हलकी

ज्वारीची भाकरी हलकी, सहज पचणारी आहे. वारंवार जेवणानंतर पोट फुगण्याची समस्या असणाऱ्यांना ती फायदेशीर ठरते. साध्या डाळी-भाजीसोबत खाल्ल्यास पोट स्वच्छ आणि आरामदायी वाटतं.

४. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते

ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स गव्हापेक्षा कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. २०१२ च्या एका प्राणी-अभ्यासात ज्वारीने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होत असल्याचं दिसून आलं. इन्सुलिन नियंत्रित ठेवणाऱ्यांसाठी हा मोठा फायदा आहे.

५. शरीराला नैसर्गिक ऊर्जा देते

ज्वारीत फायबरसह टॅनिन्स, फिनोलिक अॅसिड्स, अँथोसायनिन्स, फायटोस्टेरॉल्स आणि पॉलिकोसानॉल्स यांसारखे फाइटोकेमिकल्स असतात. हे शरीरातील सूज कमी करतात आणि हानिकारक फ्री-रॅडिकल्स काढून टाकतात. त्यामुळे ऊर्जा अधिक काळ टिकून राहते.

निष्कर्ष

ग्लूटेन-फ्री, फायबरयुक्त, पचनास मदत करणारी आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारी ज्वारीची भाकरी केवळ ट्रेंड नाही, तर आरोग्यासाठी आवश्यक बदल आहे. आहारात ज्वारीचा समावेश करून तुम्ही तुमचं जेवण अधिक पौष्टिक आणि पचायला सोपं करू शकता.