बदलती जीवनशैली, चुकीच्या सवयी, जंक फूड, पाणी कमी पिणे आणि कमी हालचाल करणे; यामुळे शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढू लागते. सुरुवातीला ही समस्या किरकोळ वाटते, मात्र वेळेत लक्ष न दिल्यास ती क्रिस्टलच्या स्वरूपात सांध्यांमध्ये साचून गाठींसारखा (Gout) त्रास निर्माण करू शकते. विशेषतः पायाची बोटे, घोटे आणि गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना सुरू होतात. औषधांसोबतच जर तुम्ही नियमितपणे काही सोप्या योगासनांचा सराव केला तर ही समस्या नैसर्गिकरित्या नियंत्रित केली जाऊ शकते. चला तर जाणून घेऊया, कोणती आहेत ही ५ उपयुक्त योगासने, जी युरिक अॅसिड कमी करण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
१. अर्ध मत्स्येन्द्रासन
या आसनामुळे यकृत आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता वाढते. शरीरातून विषारी पदार्थ लवकर बाहेर पडतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि युरिक अॅसिड नियंत्रित होते.
कसे करावे?
- पाठ सरळ ठेवून जमिनीवर बसा.
- उजवा पाय दुमडून डाव्या मांडीखाली टाका.
- डावा पाय उजव्या गुडघ्याच्या बाहेर ठेवा.
- शरीर डावीकडे वळवा आणि काही क्षण स्थिर राहा.
२. पवनमुक्तासन
या आसनामुळे पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते, गॅसची समस्या कमी होते आणि चयापचय सुधारतो. यामुळे युरिक अॅसिड जमा होण्यास प्रतिबंध घालता येतो.
कसे करावे?
- सर्वप्रथम पाठीवर झोपा.
- एक किंवा दोन्ही गुडघे छातीशी खेचा.
- हातांनी गुडघे घट्ट पकडा आणि हनुवटी गुडघ्याजवळ आणा.
३. भुजंगासन
या आसनामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि मूत्रपिंडांवर सकारात्मक परिणाम होतो. सांध्यातील सूज आणि कडकपणा कमी करते.
कसे करावे?
- पोटावर झोपा.
- तळ हात छातीच्या बाजूला ठेवा.
- श्वास घ्या आणि शरीराच्या वरचा भाग वर उचला
४. उत्तानपादासन
हे आसन युरिक अॅसिड तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ते मूत्रमार्ग सक्रिय करते.
कसे करावे?
- पाठीवर झोपून दोन्ही पाय सरळ ३० ते ४५ अंश कोनात वर उचला.
५. शलभासन
या आसनामुळे शरीराचा खालचा भाग मजबूत होतो आणि यकृत डिटॉक्स होते. सांध्यांना लवचिकता मिळते.
कसे करावे?
- पोटावर झोपा.
- दोन्ही पाय एकत्र उचला आणि काही क्षणांसाठी धरून ठेवा.
नियमितपणे ही योगासने केल्यास युरिक अॅसिड कमी होऊन सांधे निरोगी राहतात. मात्र, कोणतेही आसन करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन नक्की घ्या आणि आपल्या क्षमतेनुसार हळूहळू सराव वाढवा. वेदनांना ‘नाही’ आणि योगाला ‘हो’ म्हणा ; आरोग्य तुमच्या हातात आहे…