Ageing in women: तरूण राहण्यासाठी अनेक जण महागड्या क्रीम वापरतात आणि अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी अनेक घरगुती उपाय करून पाहतात. अशं असताना काही महिला अकाली वृद्ध होतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की त्यांच्या स्वत:च्या काही सवयी महिलांना त्यांच्या नकळतपणे वृद्धत्वाकडे ढकलत आहेत. या सवयी टाळून, तुम्ही तरूण राहू शकता.
महिला त्यांच्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करतात, ज्या त्यांच्या त्वचेवर परिणाम करतात. निरोगी त्वचा राखण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनातून या सवयी ताबडतोब काढून टाकाव्या लागतील.
कोणत्या सवयी तुम्हाला वृद्धत्वाकडे घेऊन जातात?
झोपेचा अभाव
रात्री पुरेशी झोप न घेतल्याने तुमच्या त्वचेवरील तेज कमी होऊ शकते आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू शकतात. म्हणऊनच दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे केवळ तुमच्या शरीरासाठीच नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील आवश्यक आहे.
सनस्क्रीनशिवाय सूर्यप्रकाशात जाणे
सर्वांना माहीत आहे की, सूर्याची अतिनील किरणे त्वचेला नुकसान करतात. त्यामुळे रंग बदलणे, सुरकुत्या आणि निस्तेजपणा येतो. घरातही आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे आणि सूर्यप्रकाशात जाण्याआधी सनस्क्रीन वापरले पाहिजे.
धूम्रपान आणि मद्यपान
महिलादेखील धूम्रपान करतात आणि मद्यपानही करतात. या सवयी शरीराच्या पेशींना नुकसान करतात. अल्कोहोल आणि धूम्रपानामुळे कोलेजनचे विघटन होते, त्यामुळे त्वचेचे वृद्धत्व वाढते.
अयोग्य आहार
आजकाल लोक जंक फूड, साखर आणि तेलकट पदार्थ जास्त खातात. जीभेचे चोचले पुरवण्यामागे नको ते पदार्थ पोटात ढकलले जातात. या प्रकारच्या आहारामुळे शरीरात जळजळ वाढते आणि लवकर सुरकुत्या येऊ शकतात.
डिहायड्रेशन
धावपळीच्या जीवनात महिला अनेकदा कमी पाणी पितात. कामात कितीतरी तास पाणी पिल्याशिवाय जातात. हीच सर्वात मोठी चूक ठरते. कमी पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी होते आणि अकाली वृद्धत्व येते.
ताण
आजच्या जगात घर, काम आणि नातेसंबंधांमधील ताणतणावांमुळे लोक लवकर वृद्ध होतात. ताणतणावामुळे हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे हळूहळू त्वचेचा रंग खराब होतो आणि केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच प्रामुख्याने महिलांनी ताणतणावापासून दूर रहावे आणि ताण कमी करण्यासाठी दैनंदिन आयुष्यात योगाचा समावेश करावा.
