Rare Cancer: कॅन्सर हा एक धोकादायक आजार आहे, पण तो जर दुर्मिळ प्रकारचा असेल, एखाद्या ८ वर्षांच्या मुलाला झाला असेल आणि रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया असे सगळे उपचार करूनही एक वर्षानंतर परत अधिक गंभीर स्वरूपात आला असेल, तर अशा आजारातून वाचवणे हे फक्त देवाच्याच हातात असते असे म्हणायला हरकत नाही. अशा वेळी ज्यांनी त्या मुलाला इतक्या त्रासानंतर नवीन आयुष्य दिलं, ते डॉक्टरही देवासारखेच आहेत.

अलीकडेच दिल्लीतील मधुकर रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये अशाच एका मुलाच्या दुर्मिळ कॅन्सरचा यशस्वी उपचार करण्यात आला आहे. रुग्णालयात आलेल्या ८ वर्षांच्या एका मुलाला इविंग्ज सारकोमा (Ewing’s Sarcoma) नावाचा दुर्मिळ आणि आक्रमक कॅन्सर झाला होता. हा कॅन्सर हाडे आणि शरीरातील मऊ ऊतींवर परिणाम करतो. या मुलाच्या शरीरात हा ट्युमर छातीच्या भिंतीपर्यंत आणि मेडियास्टिनम (छातीतील तो मधला भाग जिथे हृदय आणि मोठ्या रक्तवाहिन्या असतात) पर्यंत पसरला होता. ट्युमरची ही जागा खूप संवेदनशील होती कारण ती हृदय आणि मोठ्या रक्तवाहिन्यांच्या अगदी जवळ होती, त्यामुळे उपचार करणे खूप कठीण होते.

मेडिकल तपासणीत समजले की पहिल्यांदा त्या मुलाच्या छातीच्या भिंतीवर ट्युमर आढळला होता आणि त्याने दुसऱ्या रुग्णालयात केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपी असे कॅन्सरचे उपचार घेतले होते. पण एक वर्षानंतर कॅन्सर पुन्हा परत आला, जो खूपच गंभीर आणि वाईट होता. तीन वर्षांनी, जेव्हा तो मधुकर रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये आला, तेव्हा त्याच्या छातीत मोठं मेडियास्टिनल मास (mediastinal mass) होतं, ज्यामुळे शस्त्रक्रिया करणे अतिशय अवघड झाले होते.

तपासणीनंतर डॉक्टरांच्या टीमने एक नवा उपचार प्लॅन तयार केला, ज्यात सेल्वेज केमोथेरपी, नंतर हेमॅटोपोइएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन (HSCT) आणि टार्गेटेड रेडिएशन थेरपीचा समावेश होता. ट्रान्सप्लांट करण्यापूर्वीही थोडा ट्युमर शिल्लक होता, पण टीमने मुलगा १० वर्षांचा झाल्यावर HSCT करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ट्युमर खूपच लहान झाला आणि शेवटी पूर्णपणे गायब झाला. ट्रान्सप्लांट, रेडिएशन आणि नंतरच्या ओरल मेंटेनन्स थेरपीनंतर त्या मुलाचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. आज तो पूर्णपणे निरोगी आहे आणि त्याच्या शरीरावर कोणत्याही आजाराचे चिन्ह उरलेले नाहीत.

न्यूज १८च्या वृत्तानुसार याबाबत डॉ. नंदिनी चौधरी हजारिका, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजी, बीएमटी, मधुकर रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटल यांनी सांगितले “ही आमच्यासाठी सर्वात गुंतागुंतीची आणि उच्च जोखमीची केस होती. इविंग्ज सारकोमा पुन्हा परत येणे ही खूप कठीण परिस्थिती असते, आणि जेव्हा ट्युमर हृदय व मोठ्या रक्तवाहिन्यांच्या जवळ असतो, तेव्हा धोका आणखी वाढतो. पण आम्ही खूप काळजीपूर्वक योजना केली आणि कुटुंबानेही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. आम्ही आक्रमक पण संतुलित असा उपचार पद्धतीचा अवलंब केला. मुलाची हिम्मत आणि जिद्द खरोखर प्रशंसनीय होती. आज त्याला निरोगी आणि कॅन्सरमुक्त पाहणे आमच्यासाठी फक्त वैद्यकीय यश नाही, तर एक भावनिक विजय आहे. हे आम्हाला आठवण करून देते की विश्वास, कौशल्य आणि धैर्य यांच्या बळावर कोणतीही कठीण लढाई जिंकता येते.”

हा कॅन्सर किती धोकादायक आहे?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की इविंग्ज सारकोमा हा एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे, जो प्रामुख्याने १० ते २० वर्ष वयोगटातील मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये आढळतो. भारतात हा कॅन्सर फक्त १ ते २ टक्के मुलांच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये दिसतो. जेव्हा हा कॅन्सर पुन्हा परत येतो, तेव्हा त्यावर उपचार करणे आणखी कठीण होतं.सही यशोगाथा दाखवते की वेळेवर योग्य उपचार, डॉक्टरांची कौशल्यपूर्ण कामगिरी आणि आशेची शक्ती- हे सगळं एकत्र आलं, तर चमत्कार घडू शकतो. आणि हाच मुलांच्या कॅन्सरविरुद्धच्या लढाईतील सर्वात मोठा विजय आहे.