परदेशात जाणाऱ्यांना एक तर युरोप पाहायचा असतो किंवा मलेशिया- हाँगकाँग- थायलंड.. पण त्याहीपलीकडे कुठे तरी जायचं ठरवलं तर ऑस्ट्रेलियासारख्या देशातही पाहण्यासारखं खूप आहे.
‘‘तू जगातल्या मोस्ट लिव्हेबल शहरात येणारेस. सो गेट रेडी आणि तयारीला लाग..’’ असं बोलून ताईने फोन ठेवला आणि इथे माझ्या डोक्यात एक उलट आणि एक सुलट अशी दोन्ही चक्रं फिरायला लागली. एक तर मी मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला जाणार होते. कांगारूंच्या देशात.. संपूर्ण नवीन देश आणि नवीन लोक पाहायला मिळणार या कल्पनेनेच मी ऑस्ट्रेलियन स्वप्नांच्या फुग्यात अलगद तरंगत होते. पण तिकीट .. व्हिसा..? आणि एकटी इतका प्रवास करू शकेन? चिंतेच्या या सुया माझे स्वप्नांचे फुगे टचाटच फोडत होत्या. खरं तर मी काही फार प्रवास करणारी, यथेच्छ भटकंती करणाऱ्यांमधली नव्हते. नाहीच म्हणा. त्यामुळे प्रवास म्हटलं की तो कसा एन्जॉय करायचा यापेक्षा तो कसा करायचा याचाच विचार मी जास्त करते. आणि हा प्रवास तर हजारो मैलांचा समुद्रापारचा. अगदी वेगळ्या देशाचा नव्हे तर एकूण वेगळ्या खंडातला. अन् तोही एकटीने.. अचानक मला मी जत्रेत हरवलेल्या, भेदरलेल्या पाच वर्षांच्या मुलीसारखी भासायला लागले. अगदीच क्लूलेस.
‘‘तू एक काम कर. डिसेंबरमध्ये ये. म्हणजे मग ख्रिसमसची मजापण बघायला मिळेल तुला.’’
‘‘ताई, पण मी एकटीने कशी.. मला भीती वाटते. ऐक..’’
‘‘मूर्ख आहेस का तू? २५ वर्षांची झालीएस. आता नाही एकटी फिरणार तर काय म्हातारी झाल्यावर? आणि आम्ही आहोत ना इथे, तुला फक्त तेवढा प्रवासच एकटीने करायचा आहे. मी घ्यायला येईन एअरपोर्टला तुला. अन् अगं इथे खूप सोप्पं आहे. दुसऱ्यांदा येशील तेव्हा तू स्वत:च घरापर्यंत एकटी येशील..’’
‘‘अगं पण पहिल्यांदाचं काय?’’ माझा प्रश्न जणू तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही या आविर्भावात तिने वेगळ्याच विषयाला सुरुवात केली. जायचं होतं खरं डिसेंबर महिन्यात, पण मी तिकीट मात्र जुलैमध्ये बुक करायचं ठरवलं. कारण मुळात डिसेंबर म्हणजे ख्रिसमस आणि एकूणच उत्सवी महिना. त्यामुळे लोक आपापल्या गावी, आपल्या देशी जाणार. त्यामुळे अर्थातच तिकिटांचे दर अगदी गगनाला भिडलेले असतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर मेलबर्नचं तिकीट काढायचं मी ठरवलं. मुंबईहून ऑस्ट्रेलियाला थेट फ्लाइट नव्हती. त्यामुळे कनेक्टिंग फ्लाइटने जाणं भाग होतं. अशा फ्लाइट्स निवडताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. पहिली गोष्ट म्हणजे या दोन कनेक्टिंग फ्लाइट्समध्ये असलेलं वेळेचं अंतर. कारण आपल्याला एके ठिकाणी उतरून पुन्हा तिथून दुसरी फ्लाइट पकडायची असते, त्यासाठी आपल्या हाताशी बऱ्यापैकी वेळ असावा. साधारण दोन-अडीच तास. कारण उतरल्यावर आपल्याला पुन्हा दुसरी फ्लाइट पकडण्याआधी तिथल्या सिक्युरिटी चेकला सामोरं जायचं असतं. दुसरी गोष्ट तिकीट दरांची. ते नीट पडताळूनच तिकीट बुक केलं पाहिजे. अन् इथंच माझ्यासमोर एक पेचप्रसंग उभा राहिला. स्वस्तातल्या तिकिटांबाबत दोन फ्लाइट्सच्या मधला वेळ होता केवळ ५० मिनिटं. एवढय़ाशा वेळात मी कशी दुसरी फ्लाइट पकडणार या विवंचनेत मी होते, मात्र बाकीच्या फ्लाइट्स ज्यांच्या मधला वेळ तीन-चार तास होता त्यांचे दर मात्र स्वस्तातल्या फ्लाइट्पेक्षा थेट दहा-बारा हजारांनी जास्त होते. ‘‘कर गं तू बुक, थोडंसं धाव आणि पकड फ्लाइट. आणि त्यांनी अशा फ्लाइट्स ठेवल्या आहेत म्हणजे जाणारे लोक असतीलच ना..’’ ताई उवाच. मी करू की नको या शंकेची पट्टी डोळ्यांना बांधून तिकीट बुक केलं. बापरे तिकीट बुक केलं म्हणजे आता आपल्याला जावंच लागणार. डोक्यातलं चR उलट जोरजोरात फिरू लागलं.
तिकिटायन झाल्यावर आता वेळ आली व्हिसाची. ऑस्ट्रेलियन टुरिस्ट व्हिसाची सर्व माहिती त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. कागदपत्रं त्यांच्या ऑफिसमध्ये जमा केली की पंधरा दिवसांत तुम्हाला तुमच्या मेलवर व्हिसा येतो. पण पहिल्यांदाच परदेशवारी करीत असल्याने उगीच ही कागदपत्रं नाहीत, ती नाहीत म्हणून व्हिसा नाकारला जाईल, या भीतीने मी एका पर्यटन कंपनीकडून माझ्या व्हिसाची प्रक्रिया सुरू केली. हे सगळं होऊन व्हिसा येईपर्यंत नोव्हेंबर उजाडला. बघता बघता जायला केवळ एक महिना उरलेला. वस्तूंची जमवाजमव करणं गरजेचं होतं. मी तिथे ताईच्या घरीच राहणार होते, त्यामुळे भारंभार वस्तू नेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यात किती सामान न्यायचं या संदर्भातले एअरलाइन्सचे नियम बघून शक्य तेवढं कमी सामान घेऊन जाणं भाग होतं. ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात येत असल्याने तिथे आपल्या उलट चR असतं. म्हणजे आपल्याकडे जेव्हा उन्हाळा तेव्हा तिथे हिवाळा आणि आपल्याकडच्या हिवाळ्यात तिथे उन्हाळा. त्यामुळे तिथल्या ऋतूनुसार मला कपडे नेणं गरजेचं होतं.
अखेर जायचा दिवस आला. बॅगांचं वजन करून झालं. तिकीट- व्हिसा चेक केले. जायच्या आठवडाभर आधी ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि ऑस्ट्रेलियन डॉलर्स विकत घेतले. अगदी सगळी पक्की तयारी, फक्त मनाची तयारी सोडून.. हे म्हणजे कसं दोन गल्ल्या सोडून शाळेत जाणाऱ्या मुलाला अचानक बोरिवलीवरून कर्जतला पाठविण्यासारखं होतं माझ्यासाठी. नवीन काहीतरी करायला मिळतंय या उत्साहावर नवीन काहीतरी करावं लागतंय या भीतीने आपलं सावट पसरवायला सुरुवात केली होती. एक मोठ्ठी चेक इन बॅग, केबिन बॅग आणि हॅण्डबॅग अशा सरंजामासह मी एअरपोर्टवर पोहोचले खरी, पण तिथल्या दारातून आत जायची हिंमत होईना. १५ -१६ तासांचा प्रवास आणि विमान समुद्रावरून जाणार.. क्रॅश होऊन पाण्यात पडलं तर.. मला तर पोहताही नाही येत. त्यात पाण्याची भीती.. दरवाजातून आत जाईपर्यंत जगातले सगळे वाईट विचार करून झाले होते. आत शिरताच इतर विचार यायच्या आधीच माझ्या विमान कंपनीचा अधिकारी समोर उभा ठाकला आणि मला चेक इन काउंटरवर घेऊन गेला. पुढचे सगळे सोपस्कार अगदी पटापटा पार पडले. एअरपोर्टवर दिलेल्या सूचना आपण नीट पाळल्या तर चुकण्याचा प्रश्नच नसतो. मध्यरात्री दीडची फ्लाइट होती. सगळेच प्रवासी पेंगुळल्या डोळ्यांनी फ्लाइटची वाट पाहत होते. सकाळी साडेनऊला ती हाँगकाँगला उतरणार होती. तिथे बरोबर १०.२० ला माझी मेलबर्नसाठीची फ्लाइट होती. फ्लाइटमध्ये बसल्या बसल्या सगळेजण झोपी गेले. सकाळी एअरहोस्टेसच्या स्मितहास्याने डोळे उघडले, मात्र नऊ वाजले तरी फ्लाइट लॅण्ड होण्याचं नाव घेत नव्हती. अखेर पावणेदहाला विमान हाँगकाँगला उतरलं. ते उतरताना आपलं विमान समुद्रात उतरतंय की काय असाच भास होत होता. कारण हाँगकाँगचा एअरपोर्टच समुद्रात बांधलेला आहे. इथे मात्र माझी पुरती भंबेरी उडाली होती, कारण ९.५० झाले होते आणि माझी पुढची फ्लाइट तर १०.२० ची होती. आता मात्र मला काही पुढची फ्लाइट मिळत नाही यावर मी ठाम होते. पुढे काय करायचे याचा विचार करत मी फ्लाइटमधून उतरले तर मला माझ्यासमोर विमान कंपनीचे कर्मचारी हातात पुढच्या फ्लाइटचा क्रमांक लिहिलेला बोर्ड घेऊन उभे दिसले. मी त्यांना जवळपास मिठीच मारायची बाकी होते. त्यांनी त्या फ्लाइटने जाणाऱ्या आम्हा सर्वाना गोळा करून जवळपास धावतच सिक्युरिटी चेक आणि इतर सोपस्कार पूर्ण केले. हुश्श करत मी एकदाची माझ्या सीटवर बसले. माझ्या एकूण अवताराकडे पाहून बाजूला बसलेल्या प्रवाशाने कुतूहलाने विचारले ‘लाँग फ्लाइट, हां?’ मी कसंनुसं हसत त्याला माझं फ्लाइट पुराण सांगितलं आणि पुढच्या पाचच मिनिटांत आम्ही चक्क गप्पा मारायला लागलो. तो मूळचा मेलबर्नचा रहिवासी, पण आता कामानिमित्त अॅमस्टरडॅमला राहत होता. ख्रिसमसमध्ये घरी चालला म्हणून खूप खूश होता. सव्विशीतला तो मला सांगत होता की आता चालू नोकरी सोडून त्याला आइस स्केटिंगचा ट्रेनर बनायचं आहे. त्याच्या या निवडीपेक्षा मला त्याच्या धाडसी निर्णयाचंच फार अप्रूप वाटलं. विमान मेलबर्नला उतरत होतं तेव्हा त्याचे डोळे बाहेर त्याचं घर शोधत होते. माणूस अगदी दुनिया फिरला तरी मायभूमीची ओढ वेगळीच असते. विमानातून उतरून सिक्युरिटीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर मी एकदाची ताईला भेटले, तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले असतील. गळाभेटी झाल्यावर मी तिला म्हटलं, ‘टॅक्सीने जाऊयात ना आता?’ ‘छे बसने जायचं. टॅक्सी काय’ असं म्हणत तिने बसची तिकिटं काढलीसुद्धा. मेलबर्नचे हे विमानतळ शहराच्या बाहेर असल्याने एअरपोर्ट ते मध्यवर्ती स्टेशन, ‘सदर्न क्रॉस’पर्यंत या खास बसेस ठेवल्या आहेत. प्रवासाच्या थकव्याने डोळे अक्षरश: जड झाले होते. त्यामुळे अंथरुणात पडल्या पडल्या लगेच झोपले. उठले ती दुसऱ्या दिवशी दहा वाजता. सकाळी गाडय़ांच्या हॉर्नने, कोणाच्या तरी आरडाओरडय़ाने उठणाऱ्या मला इतक्या नीरव शांततेची सवयच नव्हती. आपल्या मुंबईतल्या शांततेतही गजबज असते आणि इथे तर गोंधळातही शांतता होती.
स्टाइल डायरी : ट्रेण्ड कम्फर्ट शूजचा…
आता मेलबर्न फिरायचं म्हटलं तर फिरणार कसं? त्यावर ताईने माझ्या हातात तोडगा म्हणून ‘मायकी’ सोपवलं. मेलबर्नची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अगदी उत्तम, त्यामुळे तिथले लोक वैयक्तिक गाडय़ांपेक्षा तिथल्या ट्राम्स आणि ट्रेनने जाणं पसंत करतात. ट्राम किंवा ट्रेनमध्ये बसविलेल्या मशीनवर मायकी ठेवलं की आपोआप पैसे कापले जातात, त्यामुळे तिकीट काढायचा व्यापच उरत नाही. मेलबर्नमधला उन्हाळा खरं तर मनमौजी. आज १६ डिग्री तापमान असलं तर उद्या ३० डिग्री. त्यामुळे घरून सकाळी निघताना प्रत्येक जण त्या दिवसाचं तापमान पाहूनच घरून निघतो. बाहेर पडल्या पडल्या रस्त्यावर प्रकर्षांने जाणवणारी गोष्ट म्हणजे सिग्नल. जो पादचाऱ्यांसाठीही असतो. भारतात समोरचा सिग्नल लाल किंवा हिरवा झाला तरी आपलं त्याच्याशी फार देणं-घेणं नसतंच, पण इथे तर सर्वजण तो हिरवा व्हायची वाट पाहत थांबायचे. भले रस्त्यावरून गाडी जात नसली तरीही. अचानक एका वेगळ्याच जगात आल्याची जाणीव मनाला खोलवर होत होती. ट्रामचा प्रवासही तितकाच मजेशीर. मुंबईत कधी काळी ट्राम्स चालायच्या, पण त्यात बसण्याचा योग आला नव्हता. मेलबर्नला मात्र तो आला. संपूर्ण शहरभर फिरणाऱ्या या ट्राम्स ना फार वेगात, ना फार हळू अशा आपल्या गतीने चालायच्या. मेलबर्न सेंट्रल या शहराच्या मध्यवर्ती भागात ख्रिसमस शॉपिंगची जत्राच भरली होती. मॉल्समध्ये, दुकानांत भरगच्च डिस्काउंट्स ओसंडून वाहत होती. उन्हाळा असला तरी हवा मात्र फारच आल्हाददायक होती. त्यामुळे शॉपिंग करताना थकायला होत नव्हतं. माझ्या आजूबाजूला वेगवेगळ्या शहरांतील नव्हे तर वेगवेगळ्या देशांतील लोक वावरत होते. तिथल्या रस्त्यावरचा अजून एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार म्हणजे स्ट्रीट आर्टिस्ट. फुटपाथवर काही कलाकार आपली कला सादर करीत होते. काही जण गाणी म्हणत होते. काही जण नृत्य करीत होते. लोक मध्येच थांबून ते पाहत होते. त्यांना आवडलं तर पैसे देत होते. संपूर्ण शहर ख्रिसमससाठी सजलं होतं. शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या यारा नदीच्या पुलावरही मेरी ख्रिसमसचा मोठा फलक लावलेला होता. मेलबर्न सेंटरच्या जवळच होतं व्हिक्टोरिया मार्केट. म्हणायला मंडई, पण कित्येक एकरांत पसरलेली. तो बाजार फिरायला एक दिवस अपुरा पडेल. तिथे मिळणारे विविध प्रकारचे चीझ, पावाचे पदार्थ, मांसांचे, माश्यांचे विविध प्रकार, ताज्या भाज्या, काय पाहू अन् काय नको. अन् दमल्यावर फूड मॉल आहेच. मात्र लोकांची गर्दी होती ती तिथल्या एका फूड व्हॅनमध्ये मिळणाऱ्या अमेरिकन डोनट्ससाठी. तीन डॉलर्सना पिठीसाखरेत घोळवलेली गरमगरम, लुसलुशीत पाच डोनट्स. ती तोंडात टाकताच विरघळूनही जायची. व्हिक्टोरिया मार्केटवरून नजर हटते ना हटते तोच मी पोहोचले तिथल्या स्टेट लायब्ररीमध्ये. ही वास्तू बाहेरून दिसायलाही अगदी देखणी. समोर पसरलेलं हिरवंगार लॉन आणि काहीशी ब्रिटिशकालीन इमारत. तिथला षटकोनी आकाराचा रचनेचा रीडिंग हॉल पाहणंही सुखावह. तिथे असलेली ग्रंथसंपदा, मेलबर्नचा छोटेखानी इतिहास हे सारं काळजीपूर्वक जतन केलं गेलेलं आहे. तीच कथा तिथल्या पार्लमेंटची. मुळात पार्लमेंटची टूर असते हेच मला गमतीदार वाटलं. त्या विनामूल्य टूरमध्ये तिथल्या विधानसभा आणि विधान परिषदेचं कामकाज, त्यांची बसण्याची जागा यापासून सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती दिली गेली. मेलबर्नला गेल्यावर त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी पाहणंही ओघानं आलंच. त्यातही अगदी भारंभार न पाहता मी भेट दिली ती सोन्याच्या खाणींच्या परिसरात वसलेल्या बल्लारात येथील सोवरीन हिल संग्रहालयाला. जिथे अठराव्या शतकातील काळ अगदी जिवंत केला आहे. त्यानंतर पाळी होती ती ट्वेल्व्ह अपुस्टल्स’ची. समुद्रकिनाऱ्यावर चुनखडीच्या आठच शिळा. (मूळ बारा होत्या. पण आता आठच उरल्या आहेत.) त्यांना वरून पाहणं म्हणजे नेत्रसुख. निळ्याशार समुद्रकिनारी पांढऱ्या शुभ्र शिळा सूर्याची सोनेरी किरणे पडली की उजळून निघतात. तिथेच जवळ असलेल्या बीचवर जाताना संध्याकाळ झाली आणि तापमान सात अंशांवर घसरलं. समोर भलामोठा समुद्र आणि काकडती थंडी. आधी छान हिरवळ. तिला लागून दुधाळ वाळू आणि निळाकंच समुद्र. ऑस्ट्रेलिअन्स त्या पाण्याचा आस्वाद घेण्यात पुरेपूर गुंतले होते. सर्फिग हा त्यांचा अत्यंत आवडीचा खेळ.
मेलबर्नमध्ये फिरण्यासारख्या प्रचंड जागा आहेत, अनेक प्रेक्षणीय स्थळंही आहेत, तिथली माणसंही अत्यंत हसतमुख, उत्स्फूर्त आणि उत्साही. मुंबईला निघायच्या आदल्या दिवशी मी शहराच्या मध्यभागी असलेल्या ‘श्राइन ऑफ रिमेम्बरन्स’ला भेट द्यायचं ठरवलं. फार वेळ न घालवता असंच वरवर भेट देऊ असं ठरवून गेले. तो दिवस होता बॉक्सिंग डेचा. ख्रिसमसनंतर येणारा बॉक्सिंग डे म्हणजे शॉपोहोलिक लोकांसाठी दिवाळीच. या दिवशी सर्वचजण एकतर एमसीजीवर मॅच पाहायला जातात किंवा शॉपिंग करायला. कारण या दिवशी मोठमोठय़ा ब्रॅण्ड्सवर ७० ते ८० टक्के सेल असतो. लोक अक्षरश: दुकानाबाहेर रांगा लावून असतात. अशा दिवशी मी त्या वास्तूला भेट देण्याचं ठरविलं. तिथे चौकशी केल्यावर मला कळलं की तिथली फ्री टूर पाच मिनिटांत सुरू होणार होती. बरोबर पाच मिनिटांनी साधारण साठीची जेनेट माझ्यापाशी आली आणि हसत म्हणाली ‘शाल वि स्टार्ट द टूर.?’ आणि मला जाणवलं बॉक्सिंग डे असल्याने फारसे लोक आलेले नव्हते आणि टूरमध्ये मी एकटीच होते. तरीही जेनेटने टूर सुरू केली. ही वास्तू शहराच्या मध्यभागी सुमारे ३५ ते ३० एकरांत वसलेली आहे. दोन महायुद्धांत शहीद झालेल्या ऑस्ट्रेलियन आणि इतर सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे ‘श्राइन ऑफ रिमेम्बरन्स’ बांधण्यात आलं आहे. जेनेटने तिथल्या प्रत्येक गोष्टीचे बारकावे मला समजावून सांगितले. तिला या वास्तूबद्दल अधिक ओढ होती, कदाचित तिचे वडील, आजोबा आणि काका हे तिघेही या दोन्ही महायुद्धांत सहभागी झाले असतील म्हणून असेल. काही मिनिटांत परत यायच्या इराद्याने गेलेले मी चार तास झाले तरी जेनेटशी गप्पा मारत त्या वास्तूमध्ये रममाण झाले होते. आमच्या सैनिकांचा शंभर टक्के इतिहास आमच्याकडे आहे असं अभिमानाने जेनेटने मला सांगितलं तेव्हा त्या अभिमानाची झाक नकळत माझ्याही डोळ्यात उतरली.
कोणत्याही देशात जाताना खरंतर पाटी कोरी घेऊन जाता येत नाही. त्या देशाबद्दल, समाजाबद्दल आपल्या मनातले पूर्वग्रह समूळ काढताही येत नाहीत आपल्याला, मात्र काढता नाही आले तरी काही काळ त्यांना बाजूला ठेवून त्यांच्या रंगात रंगण्यात काय हरकत आहे. भटकंती आपल्याला हेच तर शिकवते, दहा जुन्या गोष्टी सोबत घेऊन जा मात्र चार नव्या गोष्टी घेऊन परत या.
response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा