संपृक्त मेद असलेल्या अन्नपदार्थावर अतिरिक्त कर लादण्याची शिफारस सचिवांच्या गटाने केली आहे. संपृक्त मेद असलेल्या पदार्थामुळे आपल्या देशात लठ्ठपणा वाढत आहे. आरोग्य सचिव सी. के. मिश्रा यांनी सांगितले की, यापूर्वी वेळोवेळी मंत्रालयानेही असा कर लादण्याची शिफारस केली होती. या प्रश्नावर काही प्रमाणात काम अन्न नियंत्रक संस्थेने केले आहे. फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) या संस्थेने यात अशा अन्नपदार्थाचे धोके उलगडले आहेत, त्यामुळे आता ही शिफारस करण्यात आली आहे. सचिवांच्या गटाने संपृक्त मेद असलेल्या अन्नपदार्थावर अतिरिक्त कर लादण्याची शिफारस केली आहे. असे अन्नपदार्थ व पेयांवर कर लादण्याचा सरकार गांभीर्याने विचार करीत आहे काय, असे विचारले असता त्यांनी ती केवळ शिफारस असल्याचे सांगितले. साखर व संपृक्त मेद असलेल्या अन्नपदार्थावर हा कर शिफारस मान्य झाल्यास लावला जाऊ शकतो. जंक फूड व साखरयुक्त बीव्हरेज पेये यावर जास्त कर लागू शकतो, कारण या पदार्थाचा खप जास्त असून त्यामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यात लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यांसारखे रोग जडतात. साखरेच्या पेयांवर कर लादल्यास त्यांचा खप कमी होऊन लठ्ठपणा, टाइप दोन मधुमेह, दाताचे विकार याला आळा बसू शकेल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात म्हटले होते.