Alkaline water drinking habits: बाहेर पाणी विकत घेताना आपण मिनरल वॉटरची बाटली घेतो. काही जण अल्कलाईन वॉटरची घेण्याला प्राधान्य देतात. मिनरल वॉटर आणि अल्कलाईन वॉटर या खरं तर दोन वेगळ्या संकल्पना आहेत. १ लिटर मिनरल वॉटरसाठी जर आपण २० ते २५ रुपये देत असू, तर अल्कलाईन वॉटरसाठी १०० ते १५० रुपये मोजावे लागतात. अल्कलाईन म्हणजेच अल्कधर्मी पाणी हे वेगळे आहे. सध्या दुकानांमध्ये अल्कलाईन पाण्याचे वेगळे रॅक लावलेले असतात. विक्रेते हे पाणी स्वच्छ, आरोग्यदायी, पचनास उत्तम व हायड्रेटिंग म्हणून विकतात. या कारणास्तव तुम्ही हे पाणी घेता; मात्र ते खूपच महाग आहे हेही तुम्ही पाहिले असेल. तर मग यावर उपाय काय…
तर उपाय हा आहे की, तुम्ही घरच्या घरीदेखील अल्कलाईन पाणी तयार करू शकता तेही या सर्व गुणधर्मांसह ते कसे हे जाणून घेऊ…

अल्कलाईन पाणी तयार करण्यासाठी कुठल्याही फॅन्सी मशीनची गरज नाही किंवा ते फार खर्चीकही नाही. नियमित पिण्याच्या पाण्यात बदल करीत त्याचे अल्कधर्मी गुणधर्मांसह सेवन करण्यासाठी या सोप्या पद्धती आहेत.

बेकिंग सोडा

१. चिमूटभर बेकिंग सोडा

बहुतांश घरांमध्ये बेकिंग सोडा हा असतोच. पांढऱ्या रंगाचा आणि बाजारात सहज उपलब्ध असलेला बेकिंग सोडा नैसर्गिकरीत्या अल्कधर्मी आहे. साध्या पिण्याच्या पाण्यात चिमूटभर सोडा टाकल्यास त्याची पीएच पातळी बदलू शकते. एक ग्लास फिल्टर केलेले पाणी घ्या आणि त्यात १/८ चमचा बेकिंग सोडा टाका. त्यानंतर थांबण्याची अजिबात गरज नाही. चिमूटभर सोड्याने हे फिल्टर वॉटर अल्कलाईन वॉटरमध्ये रूपांतरित होते.

अल्कलाईन पाण्यासाठी लिंबाचा वाप

२. लिंबाचा वापर

लिंबू हे सर्वांत आधी आम्लयुक्त म्हणून ओळखले जाते. मात्र, लिंबाचे सेवन केल्यावर ते एकदा पचले की, त्याचा परिणाम अगदी उलट होतो. लिंबाचा रस आणि साल दोन्ही वापरणे उपयुक्त आहे. लिंबाच्या पातळ स्लाइस करून ते रात्रभर पाण्यात ठेवा. ते पाणी अल्कधर्मी होते. त्यामध्ये लिंबाची साल वापरल्याचा उपयोग म्हणजे साल मॅग्नेशियम व कॅल्शियम यांसारखी खनिजे सोडते आणि त्यामुळे पाण्याची अल्कधर्मी गुणवत्ता वाढते.

अल्कलाईन फिल्टर आणि पिचर्स

३. अल्कलाईन पिचर्स आणि फिल्टर्स

हा उपाय जीवनशैलीचा एक भाग म्हणायला हरकत नाही. अल्कलाईन वॉटर पिचर्स साध्या फिल्टर पिचर्ससारखेच दिसतात. मात्र, त्यामधील कार्ट्रिज वेगळे दिसते. हे फिल्टर्स केवळ पाणी शुद्ध करीत नाहीत, तर खनिजेही मिसळतात आणि त्यामुळे पाण्याची पीएच पातळी वाढते. घरातले साधे पाणी या फिल्टरमधून गाळून घ्यावे आणि कुठल्याही भांड्यात जमा करून ठेवावे. तसेच या फिल्टरमुळे क्लोरिनसारखे अशुद्ध घटकही काढून टाकले जातात. लिंबू आणि मिठाच्या तुलनेत या फिल्टरसाठी खर्च आहे; पण तो दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतो.

रॉक सॉल्ट

४. हिमालयन मिठाचा वापर

ही एक जुनी पद्धत आहे. हिमालयन मीठ म्हणजेच गुलाबी किंवा कोणतेही चांगल्या दर्जाचे खडे मीठ. त्यामध्ये फक्त सोडियम नाही, तर इतर मिनरल्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम व पोटॅशियम असते. एक ग्लास फिल्टर केलेल्या पाण्यात एक चिमूटभर किंवा १/८ हे मीठ टाका. हे पाणी अल्कधर्मी नाही, तर हायड्रेशनसाठीही उपयोगी आहे. कारण- मिठातील इलेक्ट्रोलाइट्स शरीराला पाणी अधिक कार्यक्षमतेने शोषून घेण्यास मदत करतात. ते व्यायामानंतर किंवा उष्ण हवामानामध्ये उपयुक्त ठरते.