Natural Remedy for Liver Problems: आपल्या शरीरात यकृत (लिव्हर) हा असा एक अवयव आहे, जो शांतपणे आपलं काम करीत राहतो. पण तोच जर आजारी पडला, तर सगळं शरीर कोलमडून जातं. रक्त शुद्ध करणं, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकणं आणि अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करणं ही सर्व कामं हा अवयव एकट्यानंच करतो. पण, आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित जीवनशैलीमुळे या यकृताच्या कार्याचं ओझं प्रचंड वाढलं आहे.
तळलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, थंड पेय व मद्यपान या सगळ्यांचा विपरीत परिणाम थेट यकृतावर होत असतो. त्यामुळे यकृतात अनारोग्यकारी चरबी (फॅट) साचू लागते आणि त्याचं कामकाज बिघडतं. परिणामस्वरूप होणारा ‘फॅटी लिव्हर’चा नवा आजार आज जवळजवळ प्रत्येक घरात आपलं डोकं वर काढू लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी देशभरात लाखो लोक यकृताशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत.
सुरुवातीला थकवा, पोट फुगल्यासारखं वाटणं, अन्न न पचणं व डोळ्यांभोवती काळी वर्तुळं ही काही लक्षणं दुर्लक्षित केली जातात; पण हीच यकृताच्या बिघाडाची पहिली घंटा असते. शरीरातील घाण, टॉक्सिन्स आणि अति तेलकट पदार्थांमुळे यकृताला सूज येते आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. डॉक्टरांच्या मते, जर वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही, तर ही सूज पुढे यकृत निकामी होण्याचं कारण ठरते.
पण, दिलासा देणारी बाब म्हणजे यावर उपाय आहे आणि तोही तुम्हाला सहजपणे उपलब्ध होणारे एक भारतीय फळ. आयुर्वेदात त्या फळाला यकृताचा ‘सर्वोत्तम रक्षक’, असं म्हटलं गेलं आहे. या फळात इतकी ताकद आहे की, ते यकृतातील चरबी ‘कापून’ टाकतं, सूज कमी करतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढतं.
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुभाष गोयल यांच्या मते, आज जवळपास ९० टक्के लोकांमध्ये फॅटी लिव्हरची लक्षणं आढळतात. अशा स्थितीत हे फळ म्हणजे देवदत्त उपायच आहे. त्यात विटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स व पॉलीफेनॉल्स मुबलक प्रमाणात असतात, जे यकृताच्या पेशींना पुन्हा सक्रिय करतात आणि त्याचं नुकसान टाळतात.
याच फळाच्या नियमित सेवनामुळे केवळ यकृताचं आरोग्य सुधारत नाही, तर शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, सूज कमी होते आणि त्वचा तजेलदार राहते. आपल्या आरोग्याला संजीवनी देणारे हे जादुई फळ कोणते असेल, तर त्याचे नाव आवळा असे आहे.
आवळा : यकृताचा खरा मित्र
आवळा हा यकृताचा खरा मित्र मानला जातो. त्यात असलेलं व्हिटॅमिन सी व अँटिऑक्सिडंट्स यकृतातील चरबी विरघळवतात आणि त्याला पुन्हा ताजेतवाने करतात. रोज एक आवळा खाल्ल्यानं यकृताची कार्यक्षमता वाढते, अनारोग्यकारक चरबी जमा होत नाही आणि शरीरातली घाण स्वच्छ होते.
तज्ज्ञ सांगतात, की आवळा खाल्ल्यानं केवळ यकृतच नाही, तर संपूर्ण शरीर तरुण, तंदुरुस्त व ऊर्जावान राहतं. मग फॅटी लिव्हरचा धोका टाळण्यासाठी तुमच्या आहारात आजपासूनच आवळा जरूर समाविष्ट करा. कारण- तुमच्या यकृताचा खराखुरा ‘संरक्षक’ तोच आहे.
