Back Pain Relief Tips: हल्ली कामाच्या ठिकाणी ८-९ तास सलग एका जागी बसून राहिल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. एकाच खुर्चीवर कित्येक तास बसून काम करताना फक्त मानसिकच नव्हे तर शारीरिक ताणसुद्धा वाढत असतो. व्यायाम नसल्याने सहाजिकच शरीरातील काही भागांना विशेषतः सांध्यांना मुबलक प्रमाणात पोषक सत्वांचा पुरवठा होत नाही, त्यामुळे कंबरदुखी आणि पाठदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. मोठ्या संख्येने लोकांना पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. पाठदुखी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची शिफारस तज्ज्ञ करतात. यामुळे केवळ वेदना कमी होतीलच, शिवाय स्नायूंनाही बळकटी मिळेल. ते तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करण्याची शिफारसदेखील करतात, कारण त्यात आवश्यक पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.
कंबरदुखी आणि पाठदुखीवर ‘हे’ पदार्थ फायदेशीर
दूध
शरीराची बहुतांश दुखणी ही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवलेली असतात. दूध हे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत मानले जाते, त्यामुळे तुम्ही दिवसातून एकदा जरी दूध पिण्याची सवय लावली तरी तुम्हाला याचा प्रभाव तुमच्या शरीराच्या बांधणीवर व लवचिकतेवर पाहायला मिळू शकतो.
सुकामेवा
काजू, बदाम, अक्रोड यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिडमुळे सांधेदुखी कमी होण्यास व हाडे मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
फळं
सफरचंद, अननस, बेरी, चेरी, द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट असतात जे गुडघे आणि पाठदुखीमुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात.
संपूर्ण धान्य
गहू, तपकिरी तांदूळ, बाजरी, बार्ली, इत्यादी, पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतात. यामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे यांसह महत्त्वपूर्ण पोषक सत्व असतात. महत्त्वाचे म्हणजे, फायबरमुळे शरीरात शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड तयार होऊन जळजळ कमी करण्यास मदत होते.