scorecardresearch

आरोग्यवार्ता : सांधेदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय

सध्याच्या व्यग्र जीवनशैलीत अनेकांचे नियमित व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या इतर प्रश्नांसह सांधेदुखी, पाठदुखीचा त्रासही वाढत आहे.

नवी दिल्ली : सध्याच्या व्यग्र जीवनशैलीत अनेकांचे नियमित व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या इतर प्रश्नांसह सांधेदुखी, पाठदुखीचा त्रासही वाढत आहे. बैठी जीवनशैली, तासन् तास बसून काम करणे, हालचालींचा अभाव, चौफेर आहाराअभावी जीवनसत्त्वांची कमतरता, वयानुरूप होणाऱ्या बदलांनी अनेक जणांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. कुठल्याही वयात कॅल्शियम व ड जीवनसत्त्वाअभावी तसेच अतिपरिश्रम, संधिवातामुळे सांधेदुखी होऊ शकते. वृद्धापकाळामुळे सांधेदुखीची शक्यता अधिक वाढते.

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मतानुसार वातप्रकोपामुळे शरीरातील विविध भागांत वेदना सुरू होतात. अतिविचार आणि ताणतणावानेही वातदोषात भर पडते. त्यामुळे तणावांचे योग्य व्यवस्थापन करावे. कफ (स्थूलपणा, मधुमेह, थॉयरॉइडचे विकार), पित्त (सूज-दाहक विकार, मसालेदार अन्नसेवन, आंबवून केलेले अन्नपदार्थ सेवन) यांनीही सांधेदुखी होते; परंतु वातदोष हे सांधेदुखीचे प्रमुख कारण असते. त्यामुळे वातशमन होईल असे घरगुती उपाय तज्ज्ञ सुचवतात. ते असे :

खारट, आंबट, खूप तेलकट व आंबवून केलेले पदार्थ खाणे टाळावे, वात वाढवणारे कोरडे व शिळे अन्न टाळावे. जागरण, अति व्यायाम व ताणतणावयुक्त जीवनशैलीपासून दूर राहावे. साजूक तूप, तीळ, ऑलिव्ह तेलाचा आहारात वापर करावा. अभ्यंग करावे. तिळाचे, मोहरीचे किंवा एरंडेल तेलाने सांध्यांना नियमित मालीश केल्याने सांधेदुखीला आराम मिळतो. अश्वगंधा, निर्गुडी, हळद, सुंठ हेही सांधेदुखीवर गुणकारी ठरतात. महानारायण तेल, निर्गुडी तेल, धन्वंतरम तेल, सहचरादी तेल किंवा कोत्तमचुक्कडी तेलाने केलेले मालीशही सांधेदुखीवर गुणकारी ठरते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arogyavarta home remedies arthritis lifestyle regular exercise ignore ysh

ताज्या बातम्या