How Much Protein Body Needs In A Day: आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे आवश्यक असतात. सध्या फिटनेस अधिक ट्रेंड होतो. म्हणूनच प्रत्येक जण जिम करतो, प्रोटीन शेक पितात किंवा प्रथिनेयुक्त आहार घेतात. मात्र, प्रथिनांच्या सेवनासोबतच आपण खरंच आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात प्रथिने देत आहोत का हा प्रश्नसुद्धा आहे. शिवाय दुसरी समस्या म्हणजे केवळ प्रथिनेयुक्त आहार खायचा म्हणून खाल्ला आणि युरिक अ‍ॅसिडमध्ये तर वाढ होत नाही ना…

जनरल फिजिशियन डॉ. पियुष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, स्नायूंच्या कार्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. मात्र जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात विविध समस्या उद्भवू शकतात. आपल्या शरीराला विशिष्ट प्रमाणात प्रथिने आवश्यक असतात. मात्र त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीर ते योग्यरित्या ब्रेक करू शकत नाही आणि परिणामी शरीरात युरिक अ‍ॅसिडच्या पातळीत वाढ होते.

अति प्रमाणात प्रथिनांचा परिणाम

प्रथिने हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व आङे. मात्र त्याचा अतिरेक अनेकदा फायद्यांऐवजी नुकसानच देतो. जेव्हा प्रथिनांचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते, तेव्हा शरीर प्रथम त्याचे प्युरीनमध्ये रूपांतर करते. जेणेकरून ते विघटित होईल आणि हे प्युरीन नंतर युरिक अ‍ॅसिड बनते. सामान्य प्रमाणात युरिक अ‍ॅसिड शरीरातून लघवीद्वारे बाहेर टाकले जाते. मात्र, जेव्हा आपण जास्त प्रथिने वापरतो तेव्हा युरिक अ‍ॅसिड आपल्या शरीरातून सामान्य स्थितीपेक्षा वेगाने बाहेर पडत नाही आणि ते हळूहळू आपल्या शरीरात जमा होऊ लागते. जेव्हा लोक गरज नसताना प्रोटीन पावडर किंवा जड मांसाहारी पदार्थ खातात तेव्हा या समस्येत वाढ होते.

युरिक अ‍ॅसिड वाढले हे कसे ओळखावे?

जेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते तेव्हा आपले शरीर काही संकेत देऊ लागतं. त्यातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सकाळी उठल्यावर पाय आणि गुडघ्यांमध्ये हलक्या वेदना, सांध्यामध्ये वेदना आणि कडकपणा. कधीकधी घोटे आणि बोटांमध्येही सूज येऊ लागते. वारंवार थकवा जाणवणे हेदेखील एक प्रमुख लक्षण आहे. नेहमीच कमकुवतपणा किंवा जड वाटणे अशी अनेकांची वारंवार तक्रार असते. जर तुम्ही उच्च प्रथिनेयुक्त आहार घेत असाल तर या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

प्रथिनांचे योग्य प्रमाण

प्रत्येक व्यक्तीच्या प्रथिनांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. प्रथिनांचे सेवन तुमचे वय, वजन आणि हालचालींवर अवलंबून असते. ६० किलो वजनाच्या सामान्य व्यक्तीसाठी ५० ग्रॅम प्रथिने पुरेसे असतात. तरीही जर कोणी जिममध्ये जातो किंवा बॉडी बिल्डिंग करतो, तर त्याने प्रति किलो वजनासाठी १.२ ते १.६ ग्रॅम खावे. जास्त प्रथिनांचं सेवन म्हणजे स्नायू अधिक ताकदवान असा समज अनेकांचा आहे. मात्र, स्नायू फक्त तेवढ्या प्रमाणात तयार होतात जितक्या प्रमाणात तुमचे शरीर प्रथिने वापरू शकेल. जास्त प्रथिने शरीरावर ओझे ठरू शकतात.

कोणत्या पदार्थांमुळे युरिक अ‍ॅसिड वाढू शकते?

काही पदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते आणि जर ते जास्त प्रमाणात सेवने केले गेले तर ते युरिक अ‍ॅसिडच्या पातळीचा धोका वाढवू शकतात. लाल मांस, लीन मीट, सीफूड, मशरूम आणि फुलकोबी तसंच काही प्रोटीन पावडर ज्यामध्ये जास्त प्रमाणात अमिनो अ‍ॅसिड असतात, ते देखील युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवू शकतात. जास्त प्रमाणात दही आणि चीजदेखील युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवू शकतात. त्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, मात्र त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे.

प्रथिनांचे सेवन करण्याची योग्य पद्धत

जर प्रथिने योग्य पद्धतीने घेतली तर ती आपल्या शरीरासाठी सर्वात फायदेशीर ठरू शकतात. एकाच वेळी जास्त प्रथिनांचे सेवन करू नका. दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात ते घेत रहा आणि नेहमी पाणी प्या. जास्त प्रथिने खाल्ल्याने पण कमी पाणी प्यायले गेले तर युरिक अ‍ॅसिडचा धोका वाढतो. तुमच्या आहारात मसूर, अंडी, चीज, दूध, दही यासारखे नैसर्गिक प्रथिने समाविष्ट करा. जेव्हा तुमच्या शरीराच्या गरजा आहाराद्वारे पूर्ण होत नसतील तेव्हाच पूरक आहाराचा समावेश करा.

प्रथिने घेताना कोणती काळजी घ्याल?

काही लोकांनी प्रथिनांचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ज्यांना आधीच युरिक अ‍ॅसिडच्या वाढत्या पातळीचा त्रास आहे, किडनी स्टोन आहे, किडनीत संसर्ग आहे किंवा किडनी कमकुवत आहे, शिवाय ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी उच्च प्रथिनांचा समावेश असलेला आहार टाळावा. उच्च रक्तदाब असलेल्या किंवा खूप कमी पाणी पिणाऱ्यांनी देखील त्यांच्या प्रथिनेयुक्त आहाराचे प्रमाण मर्यादित करावे. ४५ किंवा ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सांधेदुखीची तक्रार असेल त्यांनी उच्च प्रथिनेयुक्त आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.