हवामान बदलत असताना आपल्या आहारात हलक्या व पचायला सोप्या भाज्यांचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अशा भाज्यांमध्ये दुधीभोपळ्याला विशेष स्थान आहे. दुधीभोपळा म्हणजे पाण्याचा साठा असलेली, जीवनसत्त्वे व खनिजांनी भरलेली एक उपयुक्त भाजी. वजन कमी करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे, हृदय व त्वचेचे आरोग्य सांभाळणे यांसारखे अनेक फायदे दुधीभोपळ्यामुळे होतात. यामध्ये ९० टक्के पाणी, भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, आयर्न, मॅग्नेशियम असते. म्हणूनच पोषणतज्ज्ञदेखील दुधीभोपळा आहारात नियमित ठेवण्याचा सल्ला देतात. मात्र, तिच्या इतक्या गुणांमुळे सर्वांनाच फायदा होईल असे नाही. काही ठराविक पदार्थांसोबत दुधीभोपळ्याचे सेवन केल्यास उलट शरीरात त्रास निर्माण होऊ शकतो. विशेषतः हवामान बदलाच्या काळात याचा अधिक परिणाम जाणवतो.
दुधीभोपळ्यासोबत खालील चार गोष्टी टाळल्या पाहिजेत:
१. दुग्धजन्य पदार्थ
दुधीभोपळ्यासोबत दूध, ताक किंवा दहीसारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे, कारण यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. काही लोकांना अपचन, गॅस, पोटात दुखणे अशा समस्या जाणवतात.
२. खमंग किंवा आंबट पदार्थ
दुधीभोपळ्याच्या भाजीवर लिंबाचा रस पिळण्याची सवय अनेकांना असते. पण, आंबट पदार्थांमुळे दुधीभोपळ्याचे गुण कमी होतात आणि त्याचा परिणाम म्हणून पोटात मुरडा, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
३. कारले
कधीही एका जेवणात कारले आणि दुधीभोपळ्याची भाजी एकत्र खाऊ नये. हे दोन्ही पदार्थ शरीरात अतिप्रमाणात थंडावा निर्माण करतात. त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा येणे अशा समस्या वाढू शकतात.
४. मुळा
मुळा आणि भोपळा खाणेदेखील योग्य नाही. दोन्ही थंड असल्यामुळे दुधीभोपळ्यासोबत तिचे सेवन केल्यास ते धोकादायक ठरू शकते. यामुळे थंडी-उष्णतेचा त्रास, बद्धकोष्ठता किंवा पचनाविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता असते.
दुधीभोपळा ही आरोग्यदायी भाजी असली तरी योग्य पद्धतीने व योग्य पदार्थांसोबतच तिचा वापर करणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानात चुकीच्या संयोजनाने खाल्ल्यास शरीरात असंतुलन निर्माण होऊन आरोग्याला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे आहार घेताना या छोट्या पण महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.