COVID-19 आयुर्वेदीय दृष्टिकोन भाग १ : व्याधी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिनचर्या

कोणत्याही संसर्गजन्य व्याधींमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे देहातील जठराग्नी परिपूर्ण सक्षम बनवणे हीच सर्वांगीण महत्त्वाची चिकित्सा असते.

– वैद्य सौ. शुभदा अरविंद पटवर्धन

“करोना व्याधी-साथीच्या“ संसर्गजन्य काळात मानवी देहाची व्याधी प्रतिकारशक्ती सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्वांगीण उपचार म्हणजे देहातील जठराग्नी सक्षम करणे ही सर्वाधिक महत्त्वाची चिकित्सा आहे. कारण जठराग्नी हा ग्रहण केलेल्या आहारद्रव्यांचे सम्यक प्रभावी पचन करतो व त्या आहार घटकांचे देह गुणांमध्ये रुपांतर करण्याचे सामर्थ्य ही “जठराग्नीमध्ये” असते, त्यामुळे देहाचे जे “मूळघटक” वातादि दोष, रसरक्तादि धातू, पुरीषादि मल साम्यावस्थेत निर्माण होतात व देहधारणेचे व देहपोषणाचे कार्य सिध्द करतात.

“आयुर्वेद्शास्त्र” हे इसवी सन पूर्व सुमारे ५०० वर्षांपूर्वीच्या काळात उदय पावलेले आहे. त्या काळच्या मान्यवर सर्वोच्च ऋषीमुनींनी स्वतःच्या चिंतन, मनन, अनुभव अनुभूतीमधून निर्माण केलेले हे आयुर्वेदशास्त्र आहे. व गेली शेकडो वर्षे तदनंतरच्या अनेकानेक ऋषीमुनींच्या पिढ्यांनी ते अगदी आजपर्यंतच्या अनेकानेक सद्यकालीन आयुर्वेद तज्ञांनी भोवतालच्या आघाडीच्या इतर आरोग्यपॅथींच्या तज्ञांच्या शास्त्रीय चौकस प्रश्नांना योग्य सर्वांगीण निःसंशय उत्तरे देऊन समाजात स्वतःचे निर्विवाद स्थान प्रस्थापित केलेले आहे. या सर्व मुदद्यांच्या सर्वांगीण सखोल संदर्भ पाहिजे असल्यास महाराष्ट्र राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला एकूण १८ खंडांचा विश्वकोशसंच त्यामधील मराठी विश्वकोशाच्या आयुर्वेद आनुषंगिक विभागामध्ये अभ्यासण्यास प्राप्त होईल.

कोणत्याही संसर्गजन्य व्याधीमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याधी परतवून लावण्यासाठी प्रत्येकाने स्वतःमधील “व्याधीप्र तिकारक्षमता” वाढवणे अत्यंत आवश्यक असते तसेच कोणत्याही संसर्गजन्य व्याधींमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे देहातील जठराग्नी परिपूर्ण सक्षम बनवणे हीच सर्वांगीण महत्त्वाची चिकित्सा असते. त्यामुळे देहाच्या “व्याधीप्रतिकार निसर्ग शक्तीला सहाय्य करण्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेल्या दिनचर्येचे व ऋतूचर्येचे पालन करणे अनिवार्य असते.

१. सर्वसामान्यपणे रात्री दहाच्या सुमारास निद्राधीन व्हावे. सुमारे सात ते आठ तासांची निद्रा देहाची “सर्वांगीण-रोगप्रतिकारशक्ती” वाढवते.
२. देहाच्या रोगप्रतिकारक निसर्गशक्तीला साहाय्य करण्याच्या दॄष्टीने प्रत्येक निरोगी व्यक्तीने दररोज सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान झोप पूर्ण झाल्यावर उठावे. ह्या काळात वातावरणामध्ये प्राणवायूची अधिकता असते. त्यामुळे हया वेळी उठल्यावर सर्व इंद्रिये प्रसन्न राहतात आणि मनही प्रसन्न राहते परिणामी संपूर्ण दिवसभर देह व मन उत्साही राहते. त्यामुळे मुक्त चिंतन, मनन, अध्ययन, लेखन, स्मरण इत्यादि सर्व कार्ये चांगल्या तऱ्हेने संपन्न होतात.

हा पहाटेचा काळ “ प्रभात-वात धातू” असल्यामुळे देह-निगडीत “वातकार्याला” अनुकूल असतो. त्यामुळे ह्या काळात सकाळी उठल्यानंतर मल-मूत्र-वाताचे प्राकॄत अनुलोमन उत्सर्जन होते. परिणामतः मलप्रवृत्ती (शौचास) व मूत्रप्रवृती (लघवीस साफ होते) व वातदोषाचे उत्सर्जन प्राकॄत होते. व त्यामुळे नैसर्गिकरित्याच जठराग्नी प्रदिप्त होण्याची प्रक्रिया सुरु होते. भूक लागते. पचनशक्ती वाढते व ग्रहण केलेले अन्न सम्यकरितीने पचते. त्यामुळे ते अन्न अंगी लागते. व देहाची व्याधीप्रतिकारशक्ती सक्षम होते. आपला महत्त्वाचा उद्देश असा आहे की, हल्लीच्या २०व्या शतकातील कोरोना संसर्गजन्य काळात आपण स्वास्थ्याच्या दॄष्टीने आपल्या देहाची रोगप्रतिकारशक्ती सक्षम राखणे अत्यंत आवश्यक असते.

सकाळी उठल्यावर प्रथम गरम पाणी+ चिमूटभर हळद (जंतूघ्न आहे) समाविष्ट करुन अशा पाण्याने खळखळून गुळण्या कराव्यात व तदनंतर दंतधावन करावे. त्यामुळे दंतरोग व मुख्ननिगडीत कोणताही अनुषंगिक व्याधी होणे टळते. दैनिक दंतधावनाची सवय ही मनुष्याकरिता स्वास्थ्यसंरक्षक व व्याधी प्रतिबंधक आहे. म्हणून हे नित्य कार्य करणे अनिवार्य असते.

दंतधावनानंतर जलप्राशनाची इच्छा झाल्यास तहान लागली असता तहानेचे शमन होण्यापुरतेच कोमट पाणी + चिमूटभर हळद + तुळशीची पाने घालून स्वाद घेत-घेत हळूहळू असे जलप्राशन करावे. पाणीसुध्दा लाळेतील कफाग्नीने (बोधकाग्निने) पचून उदरात प्रविष्ट होणे आवश्यक असते व हाच जलप्राशन करण्याचा नियम निरंतर लागू होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शास्त्रोक्त जलपानाचे निर्धोक लाभ प्राप्त होतात.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सूर्योदयादरम्यान, म्हणजेच “कफधातू” काळात आपल्या “देह-प्रकृतीला” सुयोग्य असा व्यायाम करावा. देहाच्या स्वास्थ्याच्या दॄष्टीने “कफधातू” निर्माण होण्याच्या दृष्टीने व रोगप्रतिकारक शक्ती सक्षम होण्याच्या दृष्टीने नित्य नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रत्येकानेच आपल्या प्रकृतीप्रमाणे झेपेल तसा, आवडेल तसा व्यायाम करणे गरजेचे आहे. उदा. चालणे-धावणे, सूर्यनमस्कार करणे, योगा करणे, घर्षण करणे इत्यादी.

देह-स्थैर्यकर सर्व हालचालींमध्ये व्यायाम करणे हा सर्वश्रेष्ठ उपाय मानला आहे. देहिक व्यायामामुळे जठराग्नि प्रदिप्त होतो आम व कफदोषाचे पचन होऊन मल-मूत्र-वातदोषांचे अनुलोमन होते. त्यामुळे शरीर हलके होते. स्वाभाविकपणे देहामध्ये “आरोग्यदायी–भावना” उत्पन्न होऊन परिणामतः देहाच्या सर्व तदअनुषंगिक प्रासंगिक कार्यांना दिवसभर जोम येतो. स्वाभाविकपणेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. मानसिक दुर्बलताही जाते. मन प्रसन्न होते. प्रत्येक मानवी जीवनाचा व्यायाम हा अविभाज्य भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला “दीर्घ आयुरारोग्य व स्वास्थ्य” प्राप्त होऊ शकते.

अभ्यंग:
व्यायामानंतर नित्य नियमाने अभ्यंग करावा. अभ्यंग म्हणजे तीळाचे तेल किंवा चंदनबलालाक्षादि इत्यादी तेलाने सर्वांगाला केलेला “मसाज”.
तेल हे वातदोषनाशक द्रव्यांत श्रेष्ठ द्रव्य आहे. तेलाच्या अभ्यंगामुळे त्वचास्थित भ्राजकाग्नि प्रज्वलित होऊन ते तेल त्वचेत शोषले जाते व वातदोषाचे शमन होते व वातधातूचे कार्य प्राकृत होऊन कांती “स्पर्शज्ञान सक्षम” होते. व सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यंगामुळे देहाची होणारी झीज रोखली जाते. तसेच देहाची व्याधी प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे देहावर कोणताही “शत्रूरुप-विषाणूंचे” अतिक्रमण करणे अशक्यप्राय होते.

उद्वर्तन:
अभ्यंगानंतर नियमितपणे दररोज त्रिफळा+ मंजिष्ठा + अनंतमूळ+ चंदन + लाल मसूरीच्या डाळीचे पीठ इत्यादी द्रव्यांचे “उटणे” त्वचेवर योग्य प्रकारे चोळून स्नान करावे. या द्रव्यांच्या कटू व तुरट रसांमुळे त्वचेतील रस-रक्त प्रवाह पुनश्च पूर्ववत आरोग्यपूर्ण होणे, वातदोषाचे शमन होऊन त्वचास्थित भ्राजकाग्नि प्रदिप्त होतो व त्वचेतील कफदोष व मेदाचे पचन होऊन हे मलस्वरुप घटक देहाबाहेर उत्सर्जित होतात. त्वचेचे परिणमन सुधारते व “त्वचा बाह्य वातवरणातील जीवजंतूंचा प्रतिकार करु शकते.”
देह व त्वचा आरोग्यसंपन्न व सतेज राखण्यामध्ये व विशेषतः “व्याधी प्रतिकारशक्ती सक्षम करण्यामध्ये “अभ्यंग” व “उद्वर्तन” ह्या आयुर्वेदिय उपचार पध्दतीचे फार मोठे “योगदान” आहे.

स्नान:
स्नान प्रक्रिया म्हणजे “सुयोग्य-जलोपचार”. स्नान केल्यानंतर “देह” पुनश्च आगामी दिवसाचे स्वागत करण्यास सिध्द होतो. स्नान हा श्रमहरण करण्याचा श्रेष्ठ व ओजस उपाय आहे. “दैनिक स्नान” हे मानवी आरोग्य संपन्न जीवनाची गुरुकिल्ली आहे. स्नान सिध्द झाल्यानंतर त्वचा अधिक निर्मळ होते, थकवा नाहीसा होतो, स्वाभाविकपणे उत्साह वाढतो, ताजेतवाने वाटते, स्नानामुळे त्वचेतील भ्राजकाग्नि प्रदिप्त होतो. देहातील रस-रक्ताभिसरण प्राकृत होते. व ह्यांचा सुपरिणाम असा होतो की, जठराग्नि ही प्रदिप्त होऊन भूक लागते. परिपोषक अन्नाचे सम्यक पचन होते व देहाची पुष्टी होऊन “व्याधी प्रतिकारशक्ती” सक्षम होते. तदनंतर बाह्य जीवाणूंना प्रतिबंध करण्याच्या दॄष्टीने आयुर्वेदात सांगितलेल्या नस्य चिकित्सेचा अवलंब करावा. नस्य म्हणजे नाकपुड्यामध्ये क्रमाक्रमाने औषधी तेलाचे २-२ थेंब प्रविष्ट करणे. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान १ चमचा रिकामी घेऊन तो प्रथम कोमट करावा व त्यांत “अणूतेल” किंवा “साजूक तूप” घ्यावे व त्यांचे २-२ थेंब योग्य प्रकारे दोन्ही नाकपुडीत उशी न घेता उताण्या अवस्थेत प्रविष्ट करावे. अशा नियमित नस्य प्रक्रियेमुळे बाह्य जीवाणूंना नासिकेमध्ये प्रवेश मिळण्यास प्रतिबंध होतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ayurveda part 1 routine for boost immunity during corona virus out break nck