नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात अनेक स्त्रियांना काहीही त्रास होत नाही. मात्र अनेकींना भरपूर रक्तस्राव, वेदना होतात. त्यामुळे या काळात त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या काळात काही जणांना मळमळ, अस्वस्थता, सूज येणे, पेटके येणे, चिडचिडेपणा असे त्रास होतात. ते कधी कधी असह्य होतात.

मासिक पाळीत होणारा शारीरिक त्रास थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आयुर्वेदिकतज्ज्ञ काही उपाय सांगतात. ते नियमितपणे केल्यास मासिक पाळीतील त्रास कायमचाही थांबू शकतो. ते उपाय पुढीलप्रमाणे : आपल्या शरीराचे वेळापत्रक पाळा. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी अथवा सूर्योदयानंतर लगेच उठण्याची सवय लावा. सूर्योदयानंतर नाश्ता करा अन् सूर्यास्तानंतर तासाभराने संध्याकाळचे भोजन करा. आपल्या निद्रा, जागृती, भोजनाच्या वेळा पाळा. त्याची शरीराला सवय झाल्याने विविध हार्मोनचे संतुलन राहते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी सर्वप्रथम चहा, कॉफी पिऊ नका. त्यातील कॅफेनने दुष्परिणाम होतात. त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी पाच भिजवलेले मनुके, चार भिजवलेले बदाम, दोन भिजवलेले अक्रोड आणि एक भिजवलेला खजूर किंवा अंजिर खावेत. ध्यानधारणा, प्राणायाम आणि योगासने नियमितपणे करावीत. त्यामुळे दीर्घकालीन फायदे होतात. यामुळे ओटीपोटातील भागात चांगले रक्ताभिसरण होते. ज्यामुळे मासिक पाळीच्या वेळी गर्भाशयाचे स्नायू व्यवस्थितरीत्या आकुंचन पावतात. अनुलोम-विलोम, भ्रामरी या प्राणायामांसह वज्रासन, बलासन, भद्रासन आणि शवासनासारख्या योगासनांमुळे मासिक पाळीच्या काळात शरीर तणावमुक्त होण्यास मदत होते. त्यामुळे कार्यक्षमता वाढते.  जिरे-धने-बडीशेपयुक्त आयुर्वेदिक चहा, ओव्याचा, पुदिन्याचा चहा मासिक पाळीच्या त्रासात गुणकारी ठरतो. यापैकी एखादा पसंतीच्या चवीचा चहा घ्यावा. तसेच या काळात पुरेसे पाणी पीत राहावे. त्यामुळे पेटके, सूज आदी त्रास दूर राहतात. वाळय़ाचे सुगंधी चांगल्या क्षारांनी युक्त पाणी प्या. पुदिन्याचे पाणी भरपूर प्रमाणात तयार करून दिवसभर ते गरजेनुसार पित राहावे. त्यामुळे मासिक पाळीतच नाही तर एकूण आरोग्यही चांगले राहते, असे तज्ज्ञ सांगतात.