Banana face mask: त्वचेचं सौंदर्य राखायचं, तर घरगुती उपाय हे नेहमीच सर्वांत सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय मानले गेले आहेत. आज बाजारात कित्येक स्किनकेअर उत्पादनं उपलब्ध असली तरी त्यामुळे नैसर्गिक गोष्टींचं महत्त्व कधी कमी झालेलं नाही. त्यातही केळ्यापासून बनणारा फेस मास्क हा अनेक वर्षांपासून त्वचेसाठी लाभदायक मानला गेला आहे. सुरकुत्या, कोरडेपणा व काळे डाग कमी करण्यासाठी हा उपाय आजही तितकाच प्रभावी ठरतो. पोषक तत्त्वांनी भरलेलं हे फळ घरच्या घरी त्वचेचं आरोग्य सुधारण्याचं काम करतं.
केळीचा फेस मास्क – त्वचेसाठी का उपयुक्त?
जेव्हा आपण त्वचेच्या काळजीबद्दल बोलतो, तेव्हा निसर्गातच तेजस्वी आणि निरोगी त्वचेचं गुपित दडलंय. केळीचा फेसमास्क हा तसाच एक घरगुती उपाय आहे ज्यानं त्वचेच्या आरोग्यासाठी दक्ष राहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, हा उपाय काही आजचा नाही, तर प्राचीन काळापासून त्याचा त्वचा उजळावी यासाठी वापर केला जातो?
केळीचा फेस मास्क त्वचेचा कोरडेपणा कमी करतो, सुरकुत्या कमी होण्यास मदत करतो आणि तो घरातल्या साध्या फळापासून तयार होतो. हा एक सर्वसमावेशक उपाय त्वचेचं आरोग्य सुधारतो. त्यात व्हिटॅमिन ए व सी मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि उजळ होतो. तसेच त्वचा दुरुस्त होऊन, मुरुमांवर नियंत्रण राहतं. पोटॅशियम त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराइझ करतं; तर अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या वृद्धत्वाचा वेग कमी करतात. म्हणूनच केळीचा फेस मास्क आपल्या दिनक्रमात समाविष्ट केल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि सुरकुत्या व काळे डाग दूर होण्यास मदत होते. कसं ते पाहूया.
१. त्वचा तरुण ठेवण्यासाठी उपाय
पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेली केळी त्वचेला तरुण दिसण्यासाठी मदत करतं. त्यात दही मिसळल्यास त्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचा हलक्या प्रकारे एक्सफोलिएट करून उजळते. केळी आणि दही यांचा फेस मास्क सूक्ष्म रेषा कमी करतो आणि चेहऱ्याची लवचिकता वाढवतो.
फेस मास्क कसा बनवायचा?
अर्ध केळं मॅश करा आणि त्यात २ टेबलस्पून साधं दही घालून छान मिसळा. हा लेप २० मिनिटे चेहऱ्यावर लावा (डोळ्यांजवळचा भाग टाळा) आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
२. काळे डाग आणि पिग्मेंटेशनसाठी
केळी आणि मध यांचा संगम त्वचेला ओलावा देतो, खाज-चिडचिड कमी करतो आणि चेहऱ्यावरील डाग व पिग्मेंटेशन हलके करतो. हा उपाय संवेदनशील आणि कोरड्या त्वचेसाठी खास उपयुक्त आहे.
फेस मास्क कसा बनवायचा?
अर्धं पिकलेलं केळं मॅश करा आणि त्यात १ टेबलस्पून मध मिसळा. मिश्रण गुळगुळीत झाल्यावर ते चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.