मलईसारखा, नैसर्गिकरीत्या गोड व बनवायला अगदी सोपा असा बनाना शेक अनेकांसाठी एक आवडतं पेय बनलं आहे. नाश्ता असो किंवा जिमनंतर अनेक जण आरोग्यदायी पेय म्हणून बनाना शेकचं सेवन करतात. पण, वजन कमी करण्यासाठी बनाना शेकचं सेवन करावं की नाही? काही जण वजन कमी करण्यासाठी बनाना शेकचं सेवन करतात. तर काही जण म्हणतात की, जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल, तर बनाना शेकचं सेवन करा. चला तर मग जाणून घेऊ… वजन कमी करण्यासाठी बनाना शेकचं सेवन करावं की नाही?

केळी खरोखरच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत का?

पोषणतज्ज्ञ व आरोग्य अभ्यासक शिल्पा अरोरा म्हणतात की, केळीमध्ये असणारे फायबर केळीला खूप तृप्त करणारे अन्न बनवते. हे चयापचय सुधारून वजन कमी करण्यास मदत करते. त्याव्यतिरिक्त, ते एक उत्तम साखरेचा पर्याय म्हणून काम करते आणि गोड पदार्थांची इच्छा कमी करण्यास मदत करते.

बनाना शेक वजन कमी करण्यासाठी चांगले आहे की वाईट? बनाना शेक योग्यरीत्या बनविल्यास ते वजन कमी करण्यास मदत करू शकते. पोषणतज्ज्ञ डॉ. सोनाली शर्मा सांगतात की, मध्यम केळीमध्ये सुमारे १०५ कॅलरीज असतात आणि त्यात फायबर, पोटॅशियम व निरोगी कार्बोहायड्रेट्स असतात. “महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ते कधी आणि किती वेळा खाता हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

बनाना शेक वजन कमी करण्यासाठी कसा मदत करतो?

१. केळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे शरीराला जास्त सोडियम बाहेर काढण्यास मदत करते. कारण- शरीरात सोडियम कमी असेल, तर पोटफुगीही कमी होते.

२. केळ्यामधील प्रतिरोधक स्टार्चमुळे कार्बचे शोषण कमी होते आणि चरबी जाळण्यास मदत मिळते.

३. केळ्यामधील फायबर पचनास मदत करते आणि भूक नियंत्रित ठेवते. त्यामुळे तुम्हाला सारखं काहीतरी खावंसं वाटत नाही.

बनाना शेकमुळे तुमचे वजनदेखील वाढू शकते का? दुसरीकडे जर तुम्ही वजन वाढविण्याचा प्रयत्न करीत असाल, तर बनाना शेक फायदेशीर आहे. सल्लागार पोषणतज्ज्ञ रूपाली दत्ता म्हणतात, “केवळ कॅलरीज जास्त असलेले अन्न खाणे महत्त्वाचे नाही, तर आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेले अन्न खाणेही तितकेच महत्वाचे आहे. वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी १५० मिली बनाना शेक हा एक उत्तम नाश्ता किंवा जेवणादरम्यानचा पर्याय असू शकतो. त्यामुळे निरोगी तेल व चरबी मिळते आणि भरपूर कॅलरीज मिळतात.

वजन वाढविण्यासाठी बनाना शेक कसा बनवायचा?

दोन पिकलेली केळी, फूल-क्रीम दूध, एक चमचा पीनट बटर, ओट्स व थोडा मध मिसळा. तुम्हाला एक समृद्ध, पोट भरणारे व कॅलरीजने भरलेले पेय मिळेल, जे पौष्टिकतेनेही समृद्ध असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष : वजन वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल, तर बनाना शेकचं सेवन दोन्हींसाठी फायदेशीर ठरतं. फक्त तुम्ही कशा प्रकारे बनाना शेक बनवता? किती पिता आणि कधी पिता यावर सर्व अवलंबून असते.