homemade lip balm for soft pink lips: हिवाळ्याची चाहूल लागली की, शरीरात अनेक बदल दिसू लागतात. थंडीच्या वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्याचाच परिणाम ओठांवरही होतो. बदलत्या हवामानात ओठ फाटणे, कोरडे होणे व काळे पडणे ही समस्या जवळजवळ सर्वांनाच भेडसावते. बाजारात मिळणारे रसायनयुक्त लिप बाम्स काही काळापुरते आराम देतात; पण ते ओठांना आतून पोषण देत नाहीत. अशा वेळी घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरतात. अशा उपायांपैकी एक म्हणजे बीटाचा लिप बाम.

बीटमध्ये नैसर्गिक रंगद्रव्ये, अँटीऑक्सिडंट्स व पोषक घटक असतात; जे केवळ ओठांना गुलाबी बनवत नाहीत, तर त्यांना खोलवर मॉइश्चरायझ देखील करतात. बदलत्या हवामानात हा बीटाचा लिप बाम वापरणे हा एक सोपा आणि सुरक्षित उपाय ठरू शकतो.

घरी कसा बनवायचा बीटाचा लिप बाम?

सुरुवातीला एक बीट घ्या. नीट धुऊन त्याची साले काढा आणि लहान तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढा. हा रस स्वच्छ कापडाने किंवा चाळणीतून गाळून घ्या म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत.

आता एका छोट्या वाटीत एक चमचा नारळ तेल आणि थोडं मेण (beeswax) घाला. हे मिश्रण मंद आचेवर गरम करा, जोपर्यंत ते पूर्णपणे वितळत नाही. वितळल्यानंतर त्यात दोन चमचे बीटाचा रस घाला आणि नीट हलवा. हे मिश्रण एखाद्या छोट्या कंटेनरमध्ये ओता आणि काही तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. काही वेळातच हे मिश्रण सेट होईल आणि तुमचा नैसर्गिक बीटाचा लिप बाम तयार होईल.

बिटाच्या लिप बामचे फायदे…

हा लिप बाम पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्यात कोणतंही रसायन नसतो. त्यामुळे तो संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठीही सुरक्षित आहे. नारळ तेल ओठांना खोलवर मॉइश्चर देऊन त्यांना मऊ ठेवतो, तर बीटाचा नैसर्गिक गुलाबी रंग ओठांना आकर्षक बनवतो. त्याशिवाय बीटामधील अँटीऑक्सिडंट्स ओठांच्या त्वचेला पुनर्जीवित करतात आणि काळेपणा कमी करण्यास मदत करतात.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा बीटाचा लिप बाम लावल्याने तुमचे ओठ कोरडे होणार नाहीत आणि सकाळी ते नैसर्गिकरीत्या मऊ आणि गुलाबी दिसतील. हा घरगुती उपाय बाजारात उपलब्ध असलेल्या रसायन-आधारित उत्पादनांपेक्षा अधिक प्रभावी आणि फायदेशीर आहे.बदलत्या वातावरणामुळे ओठांची काळजी घ्यायची असेल, तर नैसर्गिक बीटाचा लिप बाम वापरण्याची सवय लावा सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही मिळवा!