हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र अशी वनस्पती मानलं जातं. या रोपाचं धार्मिक महत्त्व तर जास्त आहेच, पण तुळस ही औषधीदेखील आहे. तुळस लावणं हे केवळ शुभ मानलं जातं असं नाही, तर तिची पूजाही केली जाते. तुळस योग्य पद्धतीने घरात लावल्यानंतर केवळ वास्तुदोष नाहीसा होत नाही, तर घरात सुख-समृद्धीही येते. तर तुम्हालाही जर घरात तुळस लावायची असेल त्याची योग्य पद्धती आहे. तुळशीच्या मंजुळा म्हणजेच रोपट्याच्या टोकाला येणाऱ्या बिया यापासूनही तुम्ही तुळस उगवू शकता.
अनेकदा तुळस लावण्याची पद्धत केवळ योग्य नसल्याने तुळस मरते, सुकून जाते किंवा बहरत नाही. अशावेळी योग्य पद्धत वापरल्याने अशी वेळ येत नाही.
तुळशीच्या मंजुळा
तुळशीच्या मंजुळा म्हणजे तुळशीचं फुल असतं. या फुलांमध्ये तुळशीच्या अगदी लहान लहान आकाराच्या बिया लपलेल्या असतात. त्या कोवळ्या असताना कधीही तोडू नये. ही फुलं व्यवस्थित सुकली आणि काढण्यायोग्य झाली की हातावर घेऊन ती हळूवारपणे चोळा आणि त्यानंतर त्याच्या बिया दिसतील. या बिया कुंडीच टाकल्याने तुळस उगवते.
पण हे काही नियमसुद्धा पाळा
धार्मिक कथांनुसार, तुळशीच्या मंजुळा तेव्हाच तोडाव्यात जेव्हा त्या भुऱ्या होतात. तसंच त्या रविवारी किंवा मंगळवारी तोडू नयेत. तसंच त्या तोडून केवळ अशाच टाकायच्या नाहीत. त्या लाल कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात. सोबतच या गोष्टीकडे लक्ष द्या की त्या पायाखाली येऊ नये.
तुळशीच्या मंजुळांचा वापर कसा करावा?
जेव्हा एखाद्या तुळशीच्या रोपावर मंजुळा आल्या तर तुम्ही त्यातून नवीन रोप उगवू शकता. त्यासाठी सर्वात आधी मंजुळा पूर्णपणे सुकून द्याव्यात. मग त्या हाताने तोडा. हलक्या हातांनी तळहातावर थोड्या चोळा आणि त्यातून बिया निघतील. एका कुंडीत थोडी माती टाका. थोडं ऊन आणि पाणी देता येईल अशा ठिकाणी कुंडी ठेवून त्या बिया त्यात टाका. काही दिवसांतच तुळशीचं रोप येईल.