काळानुरूप सौंदर्याच्या संकल्पना बदलत असल्या तरी काही संकेत कायम असतात. त्याचे प्रमुख उदाहरण द्यायचे झाले तर महिलांच्या कपाळावरील टिकली. सौभाग्याचे लेणे मानले जाणाऱ्या कुंकवाचे   हे आधुनिक रूप आहे. आताच्या धावपळीच्या जीवनात कुंकवापेक्षा टिकली अधिक सोयीस्कर आहे. कुंकवाने पाळलेली लाल रंगाची लक्ष्मणरेषा ओलांडून टिकल्यांनी विविध रंगांचे अवतार धारण केले आहेत. मध्यंतरीच्या काळात छोटय़ा टिकल्यांचा जमाना होता. आता पुन्हा एकदा अगदी कुंकवासारख्या भल्यामोठय़ा टिकल्यांचा जमाना आला आहे..

आपल्या संस्कृतीत कुंकूदान महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्यामुळेच तर एरवी जीन्स घालणारी मुलगीही वर्षांतून एखाददुसरं हळदीकुंकू तरी हमखास करतेच. घरातील ज्येष्ठ महिलांचा कुंकू लावण्याचा आग्रह टाळणाऱ्या तरुणी आता चित्रपटातील स्टाईलच्या मोहात पडून टिकलीचा अट्टहास धरू लागल्या आहेत. भारतीय परंपरेत कुंकवाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या. कुंकू हे जसे साजशृंगाराचे साधन आहे, तसेच ते महिलांच्या सौभाग्याचेही प्रतीक आहे. त्या काळी स्त्रिया पिंजर लावायच्या. साधारणपणे लाल, चॉकलेटी किंवा मरून रंगाची पिंजर जास्त प्रमाणात वापरली जायची. काही स्त्रिया चंद्रकोरही लावायच्या. हल्लीच्या सगळ्याच गोष्टींवर चित्रपट आणि मालिकांचा प्रभाव दिसून येतो. मग त्यातून टिकल्या कशा काय सुटतील? त्यामुळेच आता अनेक प्रकारांच्या, आकाराच्या, रंगाच्या लेटेस्ट फॅशनच्या फॅन्सी टिकल्या आवडीने वापरल्या जातात.

अलीकडे फॅशनच्या युगात कपडय़ांच्या आधुनिक स्टाइलमुळे नवीन लग्न झालेल्या मुली टिकली लावत नाहीत, असा समज कालांतराने पुसट होत चालला आहे. आता मात्र कुर्ता, पलाझ्झोसारख्या इंडो-वेस्टर्न कपडय़ांची फॅशन असल्यामुळे मुली अशा कपडय़ांवर ठसठशीत टिकली लावणे पसंत करत आहेत. ‘पिकू’ चित्रपटातील दीपिकाची स्टाईल तरुणींना अधिक भावली. त्यामुळे अशा कपडय़ांवर टिकली लावणे मुली पसंत करू लागल्या आहेत. लग्न समारंभात साडीवर, शरारा अशा कपडय़ांवर टिकलीशिवाय स्त्रियांनी केलेल्या साजशृंगाराला उठाव येत नाही. हल्ली प्रत्येक गोष्टींमध्ये फॅशनचा शिरकाव झाल्यामुळे, त्याच्या नावाखाली अनेक नवीन-नवीन वस्तू बाजारात येत आहेत. अशाच या फॅशनच्या युगात ड्रेसवर किंवा साडीवर लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या, आकाराच्या आणि रंगाच्या अनेक टिकल्याही बाजारात आल्या आहेत. काही स्त्रिया अगदी छोटी टिकली लावतात, काही कपाळभर मोठ्ठं कुंकू लावतात.

२१ व्या शतकातील पहिल्या दशकात दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांच्या प्रभावामुळे बिंदीच्या क्षेत्रात मोठी क्रांती झालेली पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी सौभाग्यवती महिला कुंकवाचा वापर करत असत. त्यानंतर द्रव्यरूपातील कुंकू बाजारात आले. मग त्यात रंगसुद्धा आले. हल्ली त्याचा वापर कालबाह्य़ झाला आहे. त्यानंतर मरून, लाल, काळ्या रंगाच्या वेलवेटमधल्या टिकल्यांचा बाजारामध्ये शिरकाव झाला. चेहऱ्यावरून हात फिरवल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे कुंकू किंवा गंध पसरते. पण तीच टिकली पडली की दुसरी लगेचच लावता येते. त्यामुळे टिकली हा प्रकार कुंकवाऐवजी फारच सोयीस्कर झाला. मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांपासून टिकल्यांमध्ये वेगवेगळे प्रकार, डिझाइन्स, रंग, टिकल्यांची लांबी, उंची, तसेच वेगवेगळ्या रंगाचे गंध यात मोठा बदल झाला आहे.

खडय़ाची टिकली.

कोणत्याही समारंभात किंवा पार्टीमध्ये पारंपरिक ड्रेसवर वेगवेगळया प्रकारच्या टिकल्या लावलेल्या अनेक मुली दिसतात. ‘ताल’सारख्या चित्रपटांमुळे एकच पांढरा खडा असलेल्या टिकल्यांची फॅशन आली.

फॅन्सी टिकली

अनेक छोटय़ा कंपन्या या उत्पादनात उतरल्याचे आढळते. आजकाल वेल्वेटशिवाय प्लॅस्टिक फॉर्ममध्ये कॉम्प्युटरवर टिकल्या तयार  होऊ  लागल्या आहेत. फॅन्सी टिकल्यांमध्ये सगळ्या रंगांबरोबर मणी, मोती, खडे, कुंदन हे प्रकार आहेत. यामध्ये सिंगल खडा, डबल खडे, गोल खडा लावलेला असतो. टिकल्यांच्या प्रकारांप्रमाणेच टिकल्यांचे अनेक आकारही आहेत. त्यामुळे कोणत्याही रंगाच्या ड्रेसवर किंवा साडीवर मॅचिंग टिकली लावू शकत

रंगबिरंगी टिकल्या

बॉलिवूडच्या नायिकांचे लग्नसोहळे मोठय़ा थाटात रंगताना पाहायला मिळतात. त्यामध्ये जर नायिका ‘बंगाली’ असेल तर तिची टिकली हाच तिचा दागिना मानला जातो. सिनेसृष्टीतील विद्या बालन, राणी मुखर्जी, बिपाशा बासू यांसारख्या नायिकांनी ठशठशीत मोठय़ा आकाराच्या टिकल्यांना चांगली प्रसिद्धी मिळवून दिली आहे. एकच मोठी टिकली लावली तर सर्व दागिने त्यापुढे फिके पडतात. अशी या टिकलीची तऱ्हा आहे. सध्या महाविद्यालयीन तरुणी टिकल्यांमध्ये निळा, जांभळा, हिरव्या रंगांच्या टिकल्या पसंत करतात. प्लेन साडीवर टिकली लावण्याची फॅशन आहे. तरुणी विविध रंगाच्या गोलाकार लहान-मोठय़ा टिकल्या लावताना आढळतात.

वेल्वेट टिकली

काळानुरूप टिकल्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये आणि त्याच्या मटेरियलमध्येही खूप फरक पडू लागला आहे. विविध रंगांच्या, विविध आकारांच्या, विविध पद्धतींच्या वेल्वेटच्या टिकल्या सध्या येऊ  लागल्या आहेत. त्यातील गोंदामुळे त्वचेला काही अपाय होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाते.

नववधूसाठी खास टिकली

नववधूसाठीच्या खास प्रकारच्या फॅन्सी टिकल्या बाजारांमध्ये असून, त्याची किंमत २०० ते २५० रुपयांपर्यंत आहे. नववधूप्रमाणेच नवरदेवासाठी अक्षता, खडे यांनी तयार केलेला टिळाही याच किंमतीमध्ये आहे. पूर्वी लग्नामध्ये कुंकवाने किंवा गंधाने मळवट भरण्याची पद्धत होती; पण हल्ली मळवट टिकली मिळते आणि तीही आपल्याला हव्या त्या आकारांमध्ये.

सोन्याची टिकली

टिकल्यांच्या फॅशनमधलं शेवटचं टोक म्हणजे सोन्याची टिकली. बहुतेक सगळ्या मोठय़ा पेढय़ांमध्ये सोन्याची टिकली मिळते. ही टिकली साधारणपणे चंद्रकोरीच्या आकाराचीच असते. गोल टिकलीवर ही चंद्रकोर चिकटवून टिकली लावली जाते. या चंद्रकोरीवर नाजूक जाळीचं कोरीव काम असतं किंवा खाली एखादा छोटासा मोती वा सोन्याचा मणी असतो. या टिकल्या इतक्या देखण्या दिसतात की थेट पेशवाईची आठवण व्हावी.

कुठे मिळतील.

बाजारातील कोणत्याही सांैंदर्य प्रसाधनांच्या दुकानांमध्ये तुम्हाला नवनवीन टिकल्यांचे अनेक प्रकार मिळतील. या टिकल्या १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.

वाचकांचे अंतरंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या परिसरातील समस्या, घडामोडी याविषयी आम्हाला जरूर कळवा. वाचकांचे अंतरंग आमच्या ‘तगादा’ आणि ‘लोकमानस’ या वाचकांच्या पत्रव्यवहारविषयीच्या सदरांमध्ये नक्कीच उमटतील. आपली पत्रे पुढील पत्त्यावर पाठवावीत. लोकसत्ता कार्यालय, पहिला मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.

दूरध्वनी – २२०२२६२७, ६७४४००००. फॅक्स – २२८२२१८७.

ई-मेल – mumbailoksatta@gmail.com