Warning Signs of Blocked Arteries: हृदयविकार हा आजच्या काळात जगभरातील सर्वाधिक मृत्यूंचं कारण ठरत आहे. अनेकदा या आजाराची लक्षणं सुरुवातीला इतकी सौम्य असतात की, लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि तेच पुढे जीवघेणं ठरू शकतं. थकवा, श्वास लागणं, पायांत गोळे येणं यांसारख्या साध्या वाटणाऱ्या त्रासामागे ‘ब्लॉकेड आर्टरी’ म्हणजे रक्तपुरवठा रोखले जाण्यास कारणीभूत असे धमन्यांमध्ये लपलेले अडथळे असू शकतात, असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. चला जाणून घेऊया कोणती आहेत ही ‘६ हाय अलर्ट’ लक्षणं, जी वेळेवर ओळखल्यास मोठं संकट टळू शकतं…

हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्यापूर्वी दिसतात ‘ही’ लक्षणं

१. छातीत दुखणं किंवा दडपण जाणवणं

धमनीतून प्रवाहित होणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा आल्याचं हे सर्वांत स्पष्ट आणि धोकादायक लक्षण मानलं जातं. चालताना किंवा जिना चढताना छातीत घट्टपणा, जडपणा किंवा दाब जाणवतो का? ही वेदना डाव्या हातात, खांद्यात, जबड्यात किंवा पाठीपर्यंत पसरते का? तर मग ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. विश्रांती घेतल्यावर वेदना कमी होते; पण विश्रांतीतही ती कायम राहिली, तर तो हार्ट अटॅकचा गंभीर इशारा असू शकतो.

२. श्वास लागणं किंवा अनपेक्षित थकवा

अचानक थकवा जाणवतोय का? अगदी साधं काम करतानाही दम लागतोय का? तसं असेल तर तोही हृदयाच्या दुर्बलतेचा संकेत असू शकतो. जेव्हा रक्तवाहिन्यांमधून ऑक्सिजनयुक्त रक्त पुरेशा प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा शरीराला अशक्तपणा आणि श्वास घेताना त्रास जाणवतो. या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

३. पायांत गोळे येणं आणि विश्रांतीनंतर कमी होणं

व्यायाम करताना किंवा चालताना पायांत गोळे येतात, पण थोडंसं थांबलं की, ते कमी होतात का? हे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD)चं लक्षण असू शकतं. पायांच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे स्नायूंना आवश्यक तितकं पोषण मिळत नाही. या त्रासावर वेळीच उपचार न घेतल्यास चालण्याची क्षमता कमी होऊ शकते.

४. हात किंवा पायांत सुन्नपणा, बधिरपणा

धमन्यांमधून पुढे पाठवल्या जाणाऱ्या रक्तपुरवठ्याचं प्रमाण कमी झाल्यानं मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे हात-पाय बधीर होणं, झिणझिण्या येणं किंवा स्नायू कमकुवत वाटणं ही लक्षणं दिसतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.

५. पाय किंवा बोटांवरील न बरी होणारी जखम

पायांवर झालेली जखम बरी होण्यास जास्त कालावधी लागतोय आहे का? तसं असेल तर ते रक्तपुरवठा कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. अशा जखमांबाबत वेळीच उपचार न घेतल्यास, त्यामध्ये इन्फेक्शन किंवा गँगरीन होऊ शकतं ,ज्यामुळे पाय कापण्याचीही वेळ येऊ शकते.

६. एका हातात किंवा पायात थंडी, रंगबदल

एका हातात किंवा पायात दुसऱ्यापेक्षा जास्त थंडी जाणवते का? त्वचेला फिकट किंवा निळसर रंग आला आहे का?
तसं असेल तर तेही धमन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा आल्याचं सूचक आहे. वेळेत तपासणी न केल्यास ऊतींना पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यानं नुकसान होऊ शकतं.

‘ब्लॉकेड आर्टरी’ म्हणजे रक्तपुरवठा रोखणारी धमनी नेहमीच अचानक त्रास देत नाही. अनेकदा शरीर आपल्याला याबाबत आधीच लहान स्वरूपात संकेत देत असतं; पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. थकवा, छातीत दडपण, पायांत गोळे किंवा सुन्नपणा ही ‘सामान्य गोष्ट’ नसते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)