How to clean Stomach: आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्यापिण्यापासून ते जगण्याच्या पद्धतीपर्यंत सगळं बदललं आहे. आता जवळजवळ सगळ्यांनाच बाहेर जाऊन जेवणं, रात्री उशिरा फास्ट फूड मागवणं किंवा पटकन पोट भरण्यासाठी बर्गर, पिझ्झा, तळलेलं खाणं ही जणू रोजची सवय झाली आहे. हे सर्व पदार्थ खायला छान चवदार लागतातच; पण त्यामुळे शरीर हळूहळू कमकुवत होत जातं.

जंक फूडमध्ये तेल, मीठ आणि बाहेरून छान दिसण्यासाठी त्यावर बरेच पदार्थ घातलेले असतात. त्यामुळे शरीरात हानिकारक द्रव्यं (टॉक्सिन्स) जमा होतात. त्यामुळे सुरुवातीला फक्त थकवा, चेहऱ्यावर मुरमे किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवतात; पण हीच सवय पुढे जाऊन हृदयाचे आजार, लठ्ठपणा आणि डायबेटीससारख्या आजारांचं कारण होऊ शकते.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांच्या मते, रोजच्या सवयी बदलणं जितकं गरजेचं आहे, तितकंच शरीराला नियमितपणे डिटॉक्स करणंही महत्त्वाचं आहे. डिटॉक्स केल्यानं शरीरात साचलेली घातक द्रव्यं (टॉक्सिन्स) बाहेर पडतात, पचन नीट होतं आणि मेटाबॉलिझम सुधारतं. अशा वेळी रोजच्या आहारात काही नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक घेतल्यानं शरीर आतून स्वच्छ होतं आणि ऊर्जादेखील वाढतं.

लिंबू, काकडी, पुदीना ड्रिंक

लिंबूमध्ये असलेलं व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी) वाढवतात. काकडी शरीराला हायड्रेट ठेवते आणि त्यातलं पाणी शरीरातली घातक द्रव्यं (टॉक्सिन्स) बाहेर काढायला मदत करतं. पुदिन्याची थंड चव केवळ ताजेपणाच प्रदान करते, असं नाही, तर त्यामुळे पचन सुधारायलाही मदत करते. एका बाटलीत पाणी घेऊन, त्यात लिंबाचे तुकडे, काकडीचे तुकडे व पुदिन्याची पानं टाका आणि काही तास तसेच ठेवा. हे ड्रिंक प्यायल्यानं पचन सुधारतं, त्वचा मऊ होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी

लिंबूपाणी हे तयार करण्यास सर्वांत सोपं आणि परिणामकारक डिटॉक्स ड्रिंक आहे. शरीरात साचलेली घातक द्रव्यं बाहेर काढण्यासाठी सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या. त्यात थोडासा मध घातला, तर त्याचा आणखी चांगला फायदा होतो. हे ड्रिंक पचन सुधारतं आणि मेटाबॉलिझम वाढवून, वजन कमी करायलाही मदत करतं.

आलं आणि मधाचं डिटॉक्स ड्रिंक्स

आलं हे एक नैसर्गिक औषध आहे, ज्यामुळे शरीराला उष्णता मिळते. ते घातक द्रव्यं बाहेर काढतं. त्यातला जिंजेरॉल हा घटक सूज कमी करतो आणि पचन सुधारतो. आलं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करतं आणि ऊर्जादेखील वाढवतं.

दालचिनी आणि मधाचे पाणी

दालचिनी हा मसाला असूनही त्याचे अनेक औषधी गुण आहेत. ती रक्तातील साखर नियंत्रित करते, चरबी कमी करायला मदत करते आणि शरीरातली घातक द्रव्यं (टॉक्सिन्स) बाहेर काढते.

ग्रीन टी किंवा हर्बल टी

ग्रीन टीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक द्रव्यं बाहेर काढतात आणि हृदयाच्या समस्या टाळतात. नियमित ग्रीन टी प्यायल्यानं वजन नियंत्रित राहतं, त्वचेचा रंग उजळतो आणि मेंदू तल्लख राहतो. त्यामुळे शरीर नैसर्गिकरीत्या डिटॉक्स होतं.