तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या आरोग्यावर या ना त्या प्रकारे परिणाम हा होतच असतो. खाण्या-पिण्याबाबत जर तुम्ही काटेकोरपणे तुमचे डाएट फॉलो करत असाल, तर तुमचा चिट डेसुद्धा असेलच. मग या दिवशी तुम्ही जे खाता त्यामुळे काही तासांतच तुमच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात. काहीवेळा जास्त ऊर्जेसाठी किंवा जीभेच्या चवीसाठी मिल्कशेकसारख्या पेयाचे सेवन केले जाते. मात्र, या एका मिल्कशेकमुळे तुमच्या मेंदूला नुकसान पोहोचू शकतं.

एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, मिल्कशेकसारखे एकच जास्त चरबीयुक्त पदार्थ तुमच्या मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण करू शकतो. याव्यतिरिक्त स्ट्रोक आणि डिमेन्शियाचा धोका वाढवू शकतो. हा अभ्यास द जर्नल ऑफ न्यूट्रिशनल फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.

आहारातील फॅट म्हणजे चरबी वाढवणारे घटक हे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग असतात. साधारणपणे मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड म्हणजेच संतृप्त आणि असंतृप्त असे चरबीचे दोन प्रकार असतात. हे दोन्ही घटक त्यांच्या रासायनिक रचनेप्रमाणे वेगवेगळे कार्य करतात. शरीरावरही त्यांचे परिणाम भिन्न होतात. नवीन अभ्यासात असे आढळले की, मिल्कशेक किंवा तेलकट पदार्थ यांसारखे जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरावर त्वरित परिणाम होतो. ते रक्तवाहिन्यांच्या आकुंचन पावण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. जास्त प्रमाणात संतृप्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने केवळ ह्रदयावरच नाही, तर मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.

अभ्यास काय सांगतो?

मिल्कशेकसारख्या पदार्थाचं सेवन केल्यावर मेंदूत नेमके काय बदल होतात आणि त्याचा रक्तपुरवठा किती चांगल्या प्रकारे संरक्षित केला जातो हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी दोन गटांचा अभ्यास केला. १८ ते ३५ आणि ६० ते ८० वयोगटातील दोन गटांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या ह्रदय आणि मेंदूशी जोडलेल्या रक्तवहिन्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना उच्च संतृप्त चरबीयुक्त जेवण देण्यात आले आणि चार तासांनंतर त्यांची तपासणी केली गेली.

संशोधकांनी मिल्कशेक हा जास्त चरबीयुक्त पदार्थ निवडला आणि त्याला ब्रेन बॉम्ब असं नाव दिलं. कारण त्यात पचनास जड अशी व्हिपिंग क्रीम होती. या पेयात १,३६२ कॅलरीज आणि १३० ग्रॅम फॅट होते.

या अभ्यासात असे दिसून आले की, जास्त चरबीयुक्त जेवणामुळे तरूण आणि वृद्ध दोघांमध्येही ह्रदयाच्या आरोग्याशी जोडलेल्या रक्तवाहिन्यांची उघडण्याची क्षमता कमी होते. या विकारांमुळे मेंदूची रक्तातील आकुंचन-प्रसरणाची क्षमता कमी झाली. हे परिणाम वृद्धांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून आले.

केवळ ह्रदयाच्याच नाही तर मेंदूच्या आरोग्यासाठीदेखील संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. तसंच जास्त तेलकट आणि पचनास जड पदार्थांचे सेवन केल्यास त्याचा परिणाम मेंदूतील रक्तवाहिन्यांवरही होतो. ज्यांना आधीपासून स्ट्रोक आणि न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांचा धोका वाढतो त्यांना याचा अधिक प्रमाणात धोका आहे असे संशोधकांनी सांगितले आहे. तसंच संशोधकांनी असेही म्हटले की, “अधूनमधून चरबीयुक्त जेवणाचा अगदी गंभीर नुकसान पोहोवण्याइतका परिणाम होत नसला तरी मोजता येईल असा परिणाम नक्कीच होऊ शकतो. शिवाय एका चरबीयुक्त जेवणाचाही शरीरावर तात्काळ परिणाम होतो.”