Brain Stroke Symptoms: ब्रेन स्ट्रोक… ऐकायला साधं वाटतं; पण हा आजार किती घातक ठरू शकतो हे ऐकल्यावर अंगावर काटा येईल. कारण- स्ट्रोक हा अचानक बसणारा झटका आहे, जो क्षणार्धात व्यक्तीचं आयुष्य उलथून टाकू शकतो. जगभरात लाखो लोकांचा जीव घेणारा हा आजार मृत्यूचं दुसरं सर्वांत मोठं कारण ठरतोय. पण याहून भयानक गोष्ट म्हणजे ब्रेन स्ट्रोक आधी कोणतीही स्पष्ट लक्षणं न देता, अचानकपणे तो आपले रूप दाखवतो आणि त्यामुळे सेकंदा-सेकंदाला मेंदूच्या पेशी मरू लागतात. डॉक्टरांच्या मते, योग्य वेळेत उपचार न मिळाल्यास व्यक्ती कायमची बोलण्याची ताकद, चालण्याची क्षमता किंवा स्मरणशक्ती गमावू शकते. एवढेच नाही, तर अनेकदा मृत्यूही ओढवतो. आता प्रश्न असा आहे की, हा ब्रेन स्ट्रोक नेमका का होतो? कसा ओळखावा? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जीव वाचवण्यासाठी कोणते नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे?

तज्ज्ञ सांगतात की, ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे किंवा कमी होणे. या रक्तपुरवठ्यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन व पोषण द्रव्ये मिळतात. पण, हा पुरवठा थांबल्यावर फक्त काही मिनिटांतच मेंदूच्या पेशी मरायला सुरुवात होते आणि हाच क्षण एखाद्या जीवासाठी सर्वांत धोकादायक असतो.

स्ट्रोक किती घातक असतो?

स्ट्रोकचे दोन प्रकार असतात :

इस्केमिक स्ट्रोक : रक्ताची गुठळी होऊन, त्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह अडतो.

हेमरेजिक स्ट्रोक : मेंदूतील रक्तवाहिनी फुटून आत रक्तस्राव होतो.

दोन्ही प्रकारांत मेंदूच्या पेशी झपाट्याने मरतात. म्हणूनच ही स्थिती एक मेडिकल इमर्जन्सी मानली जाते. त्या क्षणी प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनीट महत्त्वाचं ठरतं. डॉक्टर विपुल गुप्ता यांच्या मते, पहिल्या तीन ते ४.५ तासांत योग्य उपचार झाले, तर रुग्णाला गंभीर अपंगत्व किंवा मृत्यूपासून वाचवता येतं.

या संकेतांकडे कधीही करू नका दुर्लक्ष!

स्ट्रोकची लक्षणे अचानक व झपाट्याने दिसतात. त्यासाठी FAST नियम लक्षात ठेवा :

F – Face Drooping: चेहऱ्याचा एक भाग सैल होणे किंवा सुन्न होणे.

A – Arm Weakness: हात उचलताना त्रास होणे किंवा हातात कमजोरी जाणवणे.

S – Speech Difficulty: बोलताना अडखळणे किंवा नीट बोलता न येणे.

T – Time to Act: त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्या! प्रत्येक सेकंद अनमोल आहे.

स्ट्रोकपासून कसे वाचाल?

विशेषज्ञ सांगतात की, ८०% स्ट्रोक टाळता येऊ शकतात, फक्त जीवनशैलीत बदल केल्यास.

  • रक्तदाब नियंत्रणात ठेवा – कारण- उच्च रक्तदाब हा सर्वांत मोठा धोका आहे.
  • डायबेटीस व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा.
  • धूम्रपान व मद्यपान टाळा.
  • आठवड्यात किमान पाच दिवस, रोज ३० मिनिटे व्यायाम करा.
  • फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, सुका मेवा खा आणि मिठाचं सेवन कमी करा.