Brain Tumor Warning Signs: ब्रेन ट्यूमर हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात ब्रेन ट्यूमरच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः तरुण वयातही हा आजार डोके वर काढताना दिसतो, जे अधिक चिंताजनक आहे. आपल्याला डोकेदुखी झाली की, आपण ते फारसे गंभीरपणे घेत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, सतत डोकेदुखी, झोपेचा त्रास, स्मृती कमी होणे यांसारखी लक्षणे ब्रेन ट्यूमरचे संकेत असू शकतात? सध्या डॉक्टर आणि न्यूरोलॉजिस्ट्सचा इशारा सांगतोय की, ब्रेन ट्यूमरचे लवकरात लवकर निदान झाले, तर उपचारही यशस्वी ठरू शकतात. परंतु, अनेक वेळा याची लक्षणे इतकी साधी सरळ असतात की, त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यातूनच मोठा धोका निर्माण होतो. या आजाराबाबत भीती न बाळगता, माहिती व सजगतेच्या जोरावर आपण या धोक्याचा सामना करू शकतो. गरज आहे ती लक्षणे ओळखण्याची आणि उपचारांवर विश्वास ठेवण्याची.

ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूच्या सभोवतालच्या रक्तपेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. कधी कधी ते इतके पसरतात की, ते मेंदूपासून शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू लागतात. मेंदूच्या आजूबाजूच्या रक्तपेशी आणि डीएनएमध्ये अनेक धोकादायक बदलांमुळे ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो.

एचसीजी कॅन्सर सेंटर कुलाबा येथील कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. आदित्य गुढाटे सांगतात की, झोपेचा त्रास हा केवळ थकवा किंवा मानसिक तणावामुळे होत नाही. तो मेंदूतील वाढणाऱ्या ट्यूमरचा इशाराही असू शकतो. काही रुग्णांमध्ये झोप न लागणे, वारंवार रात्री जाग येणे, दिवसभर थकवा व नीट लक्ष केंद्रित न होणे ही लक्षणे दिसून येतात.

त्यासोबतच काही रुग्णांमध्ये अत्यधिक झोप येणे, दिवसभर सुस्ती, स्मरणशक्ती कमी होणे आणि चालताना चक्कर येऊन पडण्याचे प्रकारही घडतात. ही लक्षणे विशेषतः त्यांच्यात अधिक दिसून येतात ज्यांना आधीपासूनच कॅन्सर आहे. कारण- कधी कधी शरीरातील दुसऱ्या भागातील कॅन्सरही मेंदूपर्यंत पोहोचून ट्यूमर तयार करू शकतो.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

डॉ. गुढाटे यांच्यानुसार, झोपेची सततची समस्या, डोकेदुखी, मिरगीचे झटके, नजर कमकुवत होणे, वजनात अचानक घट, हे सर्व रेड फ्लॅग सिग्नल्स आहेत. ही लक्षणे दिसल्यास तत्काळ ब्रेन ट्यूमरची तपासणी करणे गरजेचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपचार काय आहेत?

ब्रेन ट्यूमरचे लवकर निदान झाल्यास न्यूरोसर्जरी, रेडिओथेरपी, केमोथेरपीसारखे पर्याय उपलब्ध आहेत. झोपेच्या तक्रारीसाठीही औषधोपचार असले तरी सर्वप्रथम ‘स्लीप हायजिन’ म्हणजे झोपेच्या सवयी सुधारण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये नियमित वेळेवर झोपणे, झोपण्याआधी मोबाईल, टीव्हीपासून दूर राहणे, कॅफिन टाळणे हे उपाय उपयुक्त ठरतात.