Brain Tumor Symptoms: ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदू किंवा त्याच्या आसपासच्या पेशींची असामान्य वाढ होणे. या वाढलेल्या पेशी एक प्रकारची गाठ किंवा सूज तयार करतात, ज्याला ट्यूमर म्हणतात. ब्रेन ट्यूमर हा फक्त मेंदूमध्येच नाही, तर त्याच्या आसपासच्या भागांमध्येही होऊ शकतो, जसे की नर्व्हस, पिट्युटरी ग्रंथी (Pituitary gland), पाइनियल ग्रंथी (Pineal gland) किंवा मेंदूला झाकणाऱ्या पडद्यांमध्ये (Meninges) होऊ शकतो.

मायो क्लिनिकनुसार ब्रेन ट्यूमर दोन मुख्य प्रकारचे असतात…

१. सौम्य ट्यूमर (Benign Tumor) – हा कॅन्सर नसलेला असतो. तो हळूहळू वाढतो; पण जसजसा काळ पुढे पुढे जातो, तसतसा तो मेंदूच्या पेशींवर दाब निर्माण करू शकतो. मग त्याप्रमाणे त्याची लक्षणं दिसू शकतात.

२. घातक ट्यूमर (Malignant Tumor) – हा कॅन्सरयुक्त असतो. तो वेगाने वाढतो आणि आजूबाजूच्या पेशींना हानी पोहोचवू शकतो. काही वेळा ट्यूमर शरीराच्या दुसऱ्या भागातून मेंदूत पोहोचतो, जसे फुप्फुस किंवा स्तनातून, आणि अशा ट्यूमरला सेकंडरी ब्रेन ट्यूमर (Secondary Brain Tumor) म्हणतात.

ब्रेन ट्यूमर का होतो? (Brain Tumor Signs)

ब्रेन ट्यूमर होण्यामागे एखादे ठरावीक असे कारण नसते; पण त्यामागे काही संभाव्य कारणे असू शकतात:

  • जेनेटिक म्युटेशन (Genetic Mutation): पेशींच्या DNA मध्ये बदल झाल्यामुळे पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात.
  • कौटुंबिक इतिहास (Family History)
  • रेडिएशनचा संपर्क (Radiation Exposure)
  • रोगप्रतिकार शक्तीची समस्या (Immune System Disorder)
  • काही दुर्मीळ रोगप्रतिकार विकारां (Rare Immune Disorders)मुळेही ट्यूमर होण्याची शक्यता वाढू शकते.

ब्रेन ट्यूमर झाल्यास शरीरात कोणती लक्षणं दिसू शकतात? (Brain Tumor Symptoms on Body)

सकाळी उठल्यावर डोक्यात जोरात वेदना होणे

जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर वारंवार डोकेदुखी आणि उलटी किंवा मळमळही होत असेल, तर ते सामान्य लक्षण नाही. डोकेदुखीचं कारण मायग्रेनही असू शकतं; पण सतत सकाळी डोकेदुखी होणं हे मेंदूमध्ये ट्यूमरमुळे वाढणाऱ्या दाबाचे संकेत असू शकतात.

स्मरणशक्तीत घट किंवा गोंधळाची स्थिती

कधी कधी एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा तारीख विसरणे सामान्य आहे; पण जर तुम्ही वारंवार अलीकडील गोष्टी विसरू लागलात, वस्तू लक्षात ठेवणं कठीण झालं, तर हे मेंदूच्या कार्यावर परिणाम झाल्याचे संकेत असू शकतात. हे ब्रेन ट्यूमरची सुरुवातीचे लक्षणही असू शकते.

बोलण्यात अडचण येणे

जर तुम्हाला तुमची गोष्ट सांगायला त्रास होत असेल, शब्द तोंडापर्यंत येऊन थांबत असतील किंवा जे बोलत आहात, ते चुकीच्या प्रकारे बोलत असाल आणि लोकांना समजत नसेल की, तुम्ही काय बोलू इच्छिता, तर हे मेंदूच्या त्या भागावर परिणाम झाल्याचे संकेत असू शकतात, जो भाग भाषा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवतो.

अचानक झटके (Seizures) येणे

जर प्रौढ वयात पहिल्यांदा कोणत्याही कारणाशिवाय एखाद्याला झटका आला आणि तो बेशुद्ध पडला, तर ते एक गंभीर धोक्याचे लक्षण आहे. ब्रेन ट्यूमर कधी कधी मेंदूमधील इलेक्ट्रिकल क्रियेत गडबड करून, अचानक असे झटके निर्माण करू शकतो.

दृष्टीत बदल

ब्रेन ट्यूमर मेंदूमधील अशा भागांवर किंवा नसांवर दाब टाकतो, जे डोळ्यांशी संबंधित असतात. त्यामुळे तुम्हाल अस्पष्ट दिसू शकते. डोळ्यांना दुहेरी दिसणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे हे ब्रेन ट्यूमरसारख्या समस्यांचे लक्षण असू शकते. जर ही लक्षणे अचानक सुरू झाली किंवा वारंवार झाली, तर ती हलक्यात घेऊ नका.