कोबी ही पालेभाजी आपल्याकडे जेवणात सर्रास वापरली जाते. पांढरट-हिरवा व लाल जांभळा अशा दोन प्रकारच्या कोबीच्या जाती आहेत. त्यातला पांढरट हिरवा कोबी भारतातील स्वयंपाकघरात जास्त वापरला जातो. कोबीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘क’ जीवनसत्त्व हे घटक जास्त प्रमाणात आहेत म्हणून इतर भाज्यांप्रमाणे कोबीचाही आवर्जून आहारात समावेश करावा. पण, बाजारातून कोबी निवडताना गृहीणींनी एक काळजी मात्र जरूर घ्यावी. कोबी निवडताना नेहमी पोकळ गड्ड्यांपेक्षा कठीण, घट्ट गड्डा निवडावा. कारण, घट्ट गड्ड्यांचा कोबी उत्कृष्ट प्रतीचा मानला जातो. तसेच कोबीची भाजी करण्यापूर्वी तो दोन-तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा कारण, कोबीवर मोठ्या प्रमाणात किटकनाशकांचा वापर केला जातो म्हणूनच कोबी पाण्यानं दोन ते तीन वेळा धुवून घ्यावा.
कोबीचे फायदे
– त्वचेवर जखमा, पुरळ, इसब, अॅलर्जी झाली असेल तर कोबी बारीक वाटून लावल्यास हे आजार लवकर आटोक्यात येतात.
– त्वचा भाजून जखम झाली असल्यास कोबीच्या गड्ड्यांची बाहेरील मोठी पाने गरम पाण्याने स्वच्छ धुवून त्वचेवर मऊ कापडाने बांधावीत. यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते.
– कोबीचे सूप रोज रात्री प्यायल्यास त्वचा कांतिमय होते.
– कोबीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीरातील रक्तपेशीचे आरोग्य सुधारून रोग प्रतिकारशक्ती वाढते.
– वाढत्या वयातील मुलांच्या आहारात कोबीचा समावेश जरूर करावा, यामुळे शक्ती वाढते.