Pregnancy after menopause or tubectomy: संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या २०२५च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन अहवालानुसार, जगभरात १९० दशलक्षांहून अधिक महिला गर्भनिरोधक म्हणून ट्युबेक्टॉमी किंवा ट्यूबल लिगेशन या कायमस्वरूपी पद्धतीवर अवलंबून आहेत. या शस्त्रक्रियेमध्ये फलनलांबिका म्हणजेच फॅलोपिअन ट्यूब कायमस्वरूपी बंद, कापून किंवा सील करून टाकल्या जातात. या ट्यूब अंडाशयातून गर्भाशयाकडे जाणाऱ्या अंड्याच्या मार्गावर असतात.

ही पद्धत अत्यंत परिणामकारक मानली जाते. मात्र, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये ट्युबेक्टॉमी झाल्यानंतरही गर्भधारणा झाल्याचे आढळले आहे. WebMDच्या २०२५च्या माहितीनुसार, या शस्त्रक्रियेचा एकूण अपयश दर १० वर्षांमध्ये सुमारे १.८५ टक्के इतका आहे आणि वय वाढल्यास ही शक्यता आणखी कमी होते.

याबाबतचा अनुभव एका महिलेने Quoraवर शेअर केला आहे. २० वर्षांपूर्वी ट्युबेक्टॉमी केल्यानंतर आणि ५ वर्षे पाळी न आल्यावरही तिची प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. या प्रकरणाबद्दल अधिक जाणून घएण्यासाठी डॉ. शायली शर्मा, सीनियर कन्सल्टंट गायनॅकॉलॉजिस्ट यांच्याशी दि इंडियन एक्सप्रेसने संवाद साधला.

ट्युबेक्टॉमी केल्यानंतर गर्भधारणा होऊ शकते का?

यासंदर्भात डॉ. शर्मा यांनी सांगितले की, “ट्युबेक्टॉमीनंतर गर्भधारणा होणे अत्यंत दुर्मिळ आहे, मात्र अशक्य नाही. ही प्रक्रिया कायमस्वरूपी असते. मात्र काही प्रकरणांमध्ये फलनलांबिका नैसर्गिकरित्या पुन्हा जोडल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडे आणि शुक्राणू पुन्हा भेटू शकतात.
अशावेळी गर्भधारणा झाली तर ती गर्भाशयाबाहेरील गर्भधारणा असण्याची शक्यता जास्त असते आणि ती वैद्यकीयदृष्ट्या धोकादायक असते आणि त्वरित तपासणी गरजेची असते.”

५ वर्षे पाळी आली नाही तरी गर्भधारणा शक्य आहे का?

याबाबत डॉ. शर्मा सांगतात की, “जर एखाद्या महिलेचा वयाच्या उशिरा चाळीशीत पाळीचा बंद कालावधी १२ महिने किंवा त्याहून अधिक असेल, तर ते रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज मानले जाते. रजोनिवृत्तीनंतर अंडोत्सर्जन थांबते, त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा होणे शक्य नसते. तरीदेखील जर प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण ते इतर वैद्यकीय कारणांमुळेही होऊ शकते, काहीवेळा प्रत्यक्ष गर्भधारणा नसते.”

अशावेळी प्रेगनन्सी टेस्ट चुकीची असते का आणि असे नेमके कोणत्या आजारामुळे होते?

“अशा प्रकरणांमध्ये प्रेगनन्सी टेस्ट चुकीची येण्याची शक्यता असते”, असे डॉ. शर्मा यांनी म्हटले. “रजोनिवृत्तीनंतर काही महिलांमध्ये पिट्यूटरी ग्रंथीमधून थोड्या प्रमाणात एचसीजी (human chorionic gonadotropin) हा हार्मोन तयार होतो. त्यामुळे टेस्ट चुकीची येऊ शकते”, असे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.

“शिवाय, अंडाशयातील गाठी (ovarian cysts), trophoblastic disease किंवा क्वचित कॅन्सरही या हार्मोनची पातळी वाढवू शकतात. तसंच HCG असलेली औषधे घेतल्यास ही चुकीची टेस्ट येऊ शकते. म्हणूनच पुढील तपासणी करणे आवश्यक आहे. त्यात रकतातील HCG चाचणी आणि पेल्विक अल्ट्रासाउंड समाविष्ट असतो. त्यामुळे खरे कारण स्पष्ट होऊ शकते”, अशी माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.