नवी दिल्ली : जगभरात दरवर्षी हजारो लोकांच्या मृत्यूला कारण ठरणारा कर्करोग आजही अतिशय धोकादायक आजार म्हणून गणला जातो. तंबाखू, धूम्रपान यामुळेच हा आजार होतो, अशी अनेकांची धारणा आहे. परंतु आता पोटाच्या कर्करोगापासून स्तन कर्करोगापर्यंतच्या अनेक प्रकारांमुळेही मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अधिक भीती निर्माण झाली.
काही वर्षांपासून कर्करोगावर चांगली औषधे आणि अधुनिक उपचार होऊ लागल्याने मोठा दिलासा मिळू लागला आहे. या स्थितीतही लोकांमध्ये जागरूकता नाही. त्याचेच गंभीर परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येते. या आजाराबाबत तज्ज्ञ म्हणून ओळख असणाऱ्या डॉ. मिनू वालीया यांच्या म्हणण्यानुसार २०१५ च्या तुलनेत २०२५ मध्ये रुग्ण संख्या ३४.४ टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता आहे. तर, ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘आयएआरसी’नुसार भारतात स्तन, मुख, गर्भाशय, फुप्फुस, पोट आणि कोरोरेक्टल कर्करोगाचे रुग्ण प्रामुख्याने आढळतात. धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता ही भारतात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढण्यास मुख्य कारण आहे. डॉ. वालीया यांच्या सल्ल्यानुसार वजन नियंत्रण, धूम्रपान, मद्यपानापासून दूर राहणे, वनस्पतीवर आधारित आहार, सक्रिय राहणे आणि स्तनपान याद्वारे कर्करोगापासून बचाव करता येतो.