How to Lower Risk of Cancer: कॅन्सर हा एक असा आजार आहे, जो कुणालाही होऊ शकतो. या आजारामुळे शरीरात अनेक धोके निर्माण होतात आणि हा आजार जीवघेणा ठरू शकतो. आज कॅन्सर जगात मृत्यूचे एक मोठे कारण बनले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), २०२० मध्ये सुमारे एक कोटी लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला, म्हणजे दर सहा मृत्यूंपैकी एक मृत्यू कॅन्सरमुळे झाला. अहवालानुसार, वर्ष २०५० पर्यंत नवीन कॅन्सर रुग्णांची संख्या ३.५ कोटींपर्यंत पोहोचू शकते, जी २०२२ च्या आकडेवारीपेक्षा सुमारे ७७% जास्त आहे.

AIIMS, हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी म्हणतात की, कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे; पण असं नाही की या आजारावर उपचार करता येत नाही. कॅन्सर लवकर ओळखला गेला तर त्यावर उपचार करता येतो. शिवाय, कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींचा विचार केला तर या आजारापासून वाचता येऊ शकते.

अति प्रक्रिया केलेल्या अन्नापासून दूर राहा (How to Avoid Cancer)

२०२४ मध्ये The BMJ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक सर्वाधिक अति प्रक्रिया केलेले अन्न जसे की पॅक केलेले स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स, इन्स्टंट नूडल्स खातात, त्यांच्यात कॅन्सरचा धोका २०–३०% जास्त आढळला आहे, त्यामुळे अति प्रक्रिया केलेले अन्न खाण्याचे टाळावे.

फायबरचे सेवन वाढवा (Food to Avoid Cancer)

अमेरिकन इंन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चनुसार, दररोज फक्त १० ग्रॅम फायबर खाल्ल्याने कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका १०% ने कमी होतो. फळे, भाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्य फायबरचे उत्तम स्रोत आहेत. नियमितपणे फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने पचन व्यवस्थाही चांगली राहते.

प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळा

WHO नुसार, दररोज फक्त ५० ग्रॅम प्रक्रिया केलेले मांस, जसे की बेकन किंवा सॉसेज खाल्ल्याने कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका १८% ने वाढतो, त्यामुळे नॉन-व्हेज खाल्ल्यास ताजे, प्रक्रिया न केलेले पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा.

चांगल्या तेलाचा वापर करा

मेडिटेरेनियन डाएटमध्ये जास्त ऑलिव्ह ऑईल वापरले जाते. जे लोक हे तेल वापरतात, त्यांच्यात एकूण कॅन्सरचा धोका सुमारे ३०% ने कमी आढळला आहे. स्वयंपाकासाठी मोहरी तेल, तीळाचं तेल आणि ऑलिव्ह ऑईल हे चांगले पर्याय आहेत.

दारूपासून दूर राहा

अभ्यासानुसार, दारू ७ प्रकारच्या कॅन्सरशी संबंधित आहे. National Institutes of Health (NIH) म्हणते की, दररोज फक्त एक पेग पिण्याने महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका ७–१०% ने वाढतो.

संतुलित वजन ठेवावे

Centers for Disease Control and Prevention (CDC) नुसार, जास्त वजन किंवा लठ्ठपणा किमान १३ प्रकारच्या कॅन्सरशी संबंधित आहे आणि अमेरिकेत एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी ४०% साठी जबाबदार आहे, त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करून वजन नियंत्रित ठेवणे खूप आवश्यक आहे.

दररोज सक्रिय राहा

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार (National Cancer Institute – NCI) नियमित शारीरिक हालचाल केल्याने कोलन, स्तन आणि एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका २०–४०% ने कमी होतो. त्यामुळे दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योग किंवा कोणताही व्यायाम करावा.

झोप आणि तणाव यांचं संतुलन राखा

सततचा तणाव आणि खराब झोप इम्यून सिस्टमला कमजोर करतात आणि ट्यूमर वाढीस मदत करू शकतात. एका अभ्यासानुसार झोप ६ तासांपेक्षा कमी असल्यास कॅन्सरमुळे मृत्यूचा धोका २४% ने वाढतो.