Can’t Sleep at Night: आजकालच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत झोप न लागण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिवसभराचा थकवा, कामाचा ताण, मोबाईल-टीव्हीचा जास्त वापर आणि विस्कळीत दिनचर्या यामुळे अनेकांना वेळेवर झोप लागत नाही. वेळेवर पलंगावर गेलं तरी तासन्तास इकडून तिकडे वळत पडावं लागतं, पण डोळ्याला डोळा लागत नाही. अशा वेळी सकाळी उठल्यावर डोळे जड वाटतात, अंग थकल्यासारखं वाटतं आणि चिडचिडेपणा वाढतो.
सतत झोप पूर्ण न झाल्याने गंभीर आजार होण्याचा धोकादेखील वाढतो. पण या समस्येवर उपाय आहे. काही सोप्या सवयी केल्या आणि काही दिनचर्येत बदल केले तर रात्री गाढ आणि शांत झोप लागू शकते. तज्ज्ञांच्या मते, झोपेचं आरोग्य हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासारखंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच झोपेला शिस्त लावणं हे हल्लीच्या काळात अत्यंत गरजेचं ठरतं.
झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा
जर रात्री उशिरा झोप लागत नसेल, तर सगळ्यात आधी आपल्या रोजच्या दिनचर्येत बदल करावा लागेल. रोज ठराविक वेळेला झोपणं आणि उठणं ही सवय लावली, तर शरीर आपोआप त्या वेळेनुसार झोपायची-उठायची वेळ ठरवते. उदाहरणार्थ, तुम्ही रोज रात्री ११ वाजता झोपाल आणि सकाळी ७ वाजता उठाल, तर काही दिवसांतच शरीर त्या वेळेला जुळवून घेतं. जर वेळा बदलल्या, कधी उशिरा झोपलो किंवा कधी उशिरा उठलो, तर झोपेचं चक्र बिघडतं आणि झोप लागत नाही. त्यामुळे ठराविक वेळेवर झोपणं-उठणं खूप महत्त्वाचं आहे.
झोपण्यापूर्वी मोबाईलपासून दूर राहा
हल्ली अनेकांची सवय झाली आहे की ते रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरत बसतात. पण यातून निघणारी ब्लू लाईट मेंदूला सतत जागृत ठेवतात, ज्यामुळे झोप लागायला उशीर होतो. मेंदू शांत न झाल्यामुळे गाढ झोप येत नाही आणि थकवा वाढतो. चांगल्या झोपेसाठी किमान झोपायच्या एक तास आधीच मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपसारख्या उपकरणांचा वापर बंद करणं आवश्यक आहे. हा वेळ वाचनासाठी, शांत संगीत ऐकण्यासाठी किंवा ध्यानासाठी वापरला तर मन शांत होतं आणि झोप पटकन लागते.
हलके अन्न खाणे
रात्रीच्या वेळी शक्यतो हलके आणि पचायला सोपे असेल असे अन्न खाल्ले पाहिजे. यामुळे झोपताना त्रास होत नाही. अनेकदा तेलकट, मसालेदार किंवा जड अन्न खाल्ल्यामुळे पोट जड होतं आणि झोप उशिरा लागते. झोपण्याच्या किमान दोन तास आधी रात्रीचं जेवण करून घ्यावं. त्यामुळे पचन व्यवस्थित होतं आणि झोप सहज लागते.