सिंगापूरमध्ये लूटा नाताळचा आनंद!

सर्वत्र झगमगाट आणि शॉपिंगचा मूड अनुभवायला मिळतो.

ख्रिसमसच्या काळात अमेरिका अथवा युरोपमध्ये बर्फाच्छादित वातावरणात उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. ख्रिसमस म्हटला की रेनडिअर, ख्रिसमस ट्री, सर्वत्र बर्फाची चादर असे काहीसे रूप डोळ्यासमोर येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून अशियातील देशांमध्येदेखील ख्रिसमसचा उत्साह जाणवत असून, देशविदेशातील लोक ख्रिसमस साजरा करण्यासाठी सिंगापूर आणि बँकॉकसारख्या ठिकाणांना प्राधान्य देताना दिसतात. ख्रिसमस काळात येथे रेनडिअर किंवा बर्फ इत्यादीची कमतरता असली, तरी सर्वत्र झगमगाट आणि शॉपिंगचा मूड अनुभवायला मिळतो. जोडीला खवय्यांसाठी उत्तमोत्तम खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असते.

छायाचित्रणाची आवड असणारे, खरेदीसाठी उत्सुक असलेले, पार्टी करणारे आणि आपल्या चिमुकल्यांसह ख्रिसमसची मजा लुटणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी साधारण महिनाभर अगोदरपासूनच सिंगापूरमध्ये ख्रिसमसची तयारी सुरू होते. सिगापूरमधील ‘ऑर्चर्ड रोड’ झगमगाटी लाईटिंगने ११ नोव्हेंबरपासूनच उजळून निघाला आहे. १ जानेवारीपर्यंत हा झगमगाट असाच राहाणार असून, महिनाभरापेक्षा अधिक काळ ख्रिसमसचा आनंद लूटता येणार आहे.

सिगापूरमधील ख्रिसमस सेलिब्रेशन खव्वये आणि शॉपिंगची मजा लुटणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. येथे तुम्हाला रेनडिअर अथवा बर्फ अनुभवायला मिळणार नाही. परंतु दिव्यांच्या रोषणाईने सजवलेले रस्ते आणि इमारती, झाडांवर सोडलेल्या दिव्यांच्या माळा, मोठ-मोठ्या शॉपिंग मॉलमधील खरेदीदारांची धावपळ मनात उत्साह निर्माण करते. ख्रिसमस काळातील हे उत्साही वातावरण आणि झगमगाट भारावून टाकणारा असतो. दरवर्षी डिसेंबर महिन्यात शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ऑर्चर्ड रोड’वर दिव्यांची रोषणाई करून सणासुदीचे वातावरण निर्माण केले जाते. सिंगापूरमधील ख्रिश्चन लोकांसाठी तर ख्रिसमसे खास महत्व. ते धार्मिक कार्यक्रमासोबतच कृत्रिम बर्फातील धमाल-मस्ती, सांताक्लॉज आणि ख्रिसमस गिफ्टची मजा लुटतात. अन्य लोकंदेखील तितक्याच ऊत्साहाने यात सहभागी होतात.

सिंगापूरमधील उच्च जीवनशैली आणि शॉपिंगसाठी प्रसिध्द असलेला ‘ऑर्चर्ड रोड’ या काळात ख्रिसमसच्या रंगात रंगून जातो. ‘ऑर्चर्ड रोड’वरील मोठ-मोठे मॉल्स आणि रस्त्याच्या कडेला असलेले वृक्ष डोळे दिपवणाऱ्या रोषणाईने सजवलेले असतात. संपूर्ण ‘ऑर्चर्ड रोड’वर सर्वत्र झगमगाट पाहायला मिळतो. या आनंदाच्या वातावरणात भर घालण्यासाठी अनेक कलाकार ‘ऑर्चर्ड रोड’वर आपली कला सादर करताना पाहायला मिळतात. १९८४ पासू सुरू झालेला ‘ऑर्चर्ड रोड’वरील ख्रिसमस वर्षागणिक अधिकच खुलत आहे.

पर्यटकांचा हॉलिडे मूड द्विगुणित करण्यासाठी ‘एण्डलेस वंडर ख्रिसमस व्हिलेज’ची निर्मिती करण्यात आली आहे. तर ‘सिव्हिक प्लाझा’मध्ये चिमुकल्यांसाठी एक राजवाडा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल आणि रस्त्यावरील कलाकारांच्या अदाकारीचा आनंद लुटता येणार आहे. ‘ख्रिसमस व्हिलेज’मध्ये खाद्यपदार्थ आणि फॅशन क्षेत्रातील २५ नामवंत ब्रॅण्डनी आपले तंबू थाटले आहे.

ख्रिसमसनिमित्त स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कला, संगीत, नृत्य, रोषणाई, शॉपिंग, कृत्रिम बर्फातील खेळ, मनोरंजन, करमणूक आणि उत्साहाने भरलेल्या या दिवसांची मजा लुटण्यासाठी सिंगापूरला भेट द्यावी लागेल. सिंगापूरमधील अन्य भागातदेखील काहीसे असेच वातावरण अनुभवायला मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Christmas 2017 celebrate christmas in singapore

ताज्या बातम्या