Clean Intestine In 20 Minutes In Morning: तन व मनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही जीवनशैलीतील काही बदलांमुळे साध्य करता येऊ शकते. मात्र त्यातही आतड्याची हालचाल किंवा सोप्या भाषेत सांगायचे तर पोट साफ होण्यासाठी आवश्यक अशी प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी अनेकांना अडचणी येतात. अशा मंडळींसाठी सकाळी उठताच पहिल्या १०-१५ मिनिटांत काही साधी सोपी आसने करून बराच फायदा होऊ शकतो. @wellnesswithmanisha या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका रीलमध्ये सकाळी उठताच करायची काही आसने सांगण्यात आली आहेत. तसेच, या पेजवर चरकसूत्र आणि वाघभट यांनी आरोग्याची केलेली व्याख्या सांगितली आहे. सर्वात आधी ही व्याख्या व त्याचा अर्थ पाहूया व मग टप्प्या टप्प्याने आपण कोणती आसने करायची हे सुद्धा जाणून घेऊया ..

खरी निरोगी व्यक्ती कोण?

“समादोष, समग्निश्च समधातुमाला क्रियाहा प्रसन्न आत्मनिंद्रिय मानहा स्वास्थ्य इत्यभिधेयते”

याचा भावार्थ असा की, अशा व्यक्तीला निरोगी व्यक्ती किंवा स्वस्थ म्हणतात ज्यांचे दोष समतोल स्थितीत आहेत. पाचन अग्नी संतुलित स्थितीत आहे, ऊती (धातु) आणि मल (कचरा) सामान्य स्थितीत कार्य करत आहे. ज्ञानेंद्रिये, अवयव आणि मन, आत्मा देखील प्रसन्न आहे.

सकाळी उठताच करावी ही आसने

१) मलासनात बसून आपण कोमट पाणी प्यायचे आहे. काही वेळ याच स्थितीत राहून मग पुढच्या आसनांकडे वळायचे आहे.
२) दुसरं आसन म्हणजे ताडासन. आपल्याला दोन्ही हात कानापासून सरळ वरच्या दिशेने न्यायचे आहेत व पायाच्या टाचा उंचावायच्या आहेत. शरीर वरच्या बाजूने काही प्रमाणात ताणले जाईल असे पाहा.
३) तिसरं आसनं करण्यासाठी आधीच्या स्थितीतच हात ठेवून एक एक करून डाव्या व उजव्या बाजूला खाली वाकायचे आहे.
४) चौथ्या आसनासाठी हात खाली घेऊन आपल्याला कंबरेतून डाव्या व उजव्या बाजूला वळायचे आहे.
५) या आसनात आपल्याला पुन्हा मलासनात येऊन एक एक करून डावे व उजवे ढोपर विरुद्ध दिशेला जमिनीला टेकवायचे आहे.

हे ही वाचा<< तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र

दरम्यान, योग अभ्यासक मनीषा यादव यांनी याच पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे वरील आसने करण्याआधी साधारण २५० मिली कोमट पाणी प्यायचे आहे. तसेच प्रत्येक आसन हे किमान ५ ते ७ वेळा करायचे आहे. साधारण १०-१५ मिनिटात तुम्ही ही आसने करू शकता. लक्षात घ्या बद्धकोष्ठतेची समस्या दीर्घकाळ असल्यास, ती दूर होण्यास थोडा वेळ लागू शकतो. वरील आसनांचा रोज सराव करत राहिल्यास काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.