Colorectal cancer early sign and symptoms: कर्करोग हा एक असा आजार आहे, जो शरीराच्या कोणत्याही भागात विकसित होऊ शकतो. वाईट जीवनशैली, बिघडलेला आहार आणि अनुवांशिक कारणे या आजारासाठी जबाबदार आहेत. भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, २०२० मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कर्करोगाचे अंदाजे रुग्ण सुमारे १४ लाख होते, जे २०२१ मध्ये वाढून १४.२६ लाख झाले आणि २०२२ मध्ये ते १४.६१ लाख झाले. भारतात सहा प्रकारचे कर्करोग जास्त प्रमाणात आढळतात, ज्यामध्ये फुफ्फुसांचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग यांचा समावेश आहे.
कोलोरेक्टल कर्करोग हा मोठ्या आतड्याचा कर्करोग आहे. कोलोरेक्टल कर्करोग मोठ्या आतड्याच्या भिंतीच्या सर्वात आतल्या थरात सुरू होतो. बहुतेक कोलोरेक्टल कर्करोग लहान पॉलीप्सपासून सुरू होतात. हे पॉलीप्स पेशींचा समूह असतात. कालांतराने यातील काही पॉलीप्स कर्करोगात रूपांतरित होतात. हा कर्करोग प्रथम मोठ्या आतड्याच्या भिंतीमध्ये आणि नंतर आजूबाजूच्या लिम्फ नोड्समध्ये आणि नंतर संपूर्ण शरीरात पसरतो.
आतड्यांचा कर्करोग आणि रेक्टल (मलाशय) कर्करोग खूप समान आहेत आणि बहुतेकदा त्यांना कोलोरेक्टल कर्करोग म्हणून एकत्रितपणे संबोधले जाते. कर्करोग सर्जन डॉ. निखिल अग्रवाल यांच्या मते, या आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे शरीरात दिसू लागतात आणि जर ती सुरुवातीच्या टप्प्यात आढळली तर या आजारावर सहज उपचार करता येतात. कोलोरेक्टल कर्करोगाची लक्षणे काय आहेत, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
कोलोरेक्टल कर्करोग कशामुळे होतो?
रोगप्रतिकारक शक्ती कमी करणाऱ्या औषधांचा वापर, लाल मांसाचे सेवन, जास्त मद्यपान आणि लठ्ठपणा यामुळे हा आजार होण्याचा धोका वाढतो. मधुमेह, धूम्रपान आणि जास्त मद्यपान यामुळेदेखील या आजाराचा धोका वाढतो. WHO च्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे.
कोलोरेक्टल कर्करोगाची १० लक्षणे:
आतड्यांसंबंधी सवयींमध्ये बदल
सतत अतिसार
बद्धकोष्ठता किंवा अपूर्ण आतड्याची हालचाल
सतत अशक्तपणा किंवा थकवा
भूक न लागणे
वजन कमी होणे
हिमोग्लोबिन कमी होणे
अशक्तपणा
पोटात दुखणे
मलमध्ये लाल किंवा काळे रक्ताचे डाग
कोलन कर्करोगाचा उपचार:
सुरुवातीच्या टप्प्यातील कोलन कर्करोगाचा प्राथमिक उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. वरील कोणतीही लक्षणं आढळली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मोठया आतडयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी?
योग्य आहार घ्यावा, ज्यात पालेभाज्या, सलाड, तंतुमय पदार्थ म्हणजे कोंडा न काढता केलेल्या चपात्या, पॉलिश न केलेले तांदूळ वगैरे अन्न घ्यावे, चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी करावे; तेल, अंडी, मटण, चीज, बटर. कॅन्सर रुग्णाच्या फॅमिलीमध्ये कुणी संशयास्पद असेल तर त्याच्या रक्त, लघवी, संडासचा तपास करून घ्यावा. सोनोग्राफी, एन्डोस्कोपी, तपास इ. जरुरीप्रमाणे करून घ्यावे.
उपाययोजना
योग्य उपाययोजना जर योग्य वेळेत झाल्या तर मोठया आतड्याच्या कर्करोगाचे रुग्ण अनेक वर्षे चांगले राहू शकतात, म्हणूनच कर्करोगाचे लवकर निदान हे महत्त्वाचे ठरते.
शस्त्रक्रिया : मोठया आतड्याचा खराब झालेला भाग काढून टाकणे हीच सर्वात चांगली उपाययोजना. कर्करोगाच्या दोन्ही बाजूंचा ५-१० सेमी भाग काढून ते पुन्हा जोडले जाते. मोठ्या आतडयाच्या आजूबाजूचा भागही काढला जातो. जर आजूबाजूचे अवयव या कर्करोगाला अडकलेले असतील तर तेही शक्य असल्यास काढले जातात. सर्वसाधारणतः मोठ्या आतड्यांच्या कर्करोगाचे उपाय केल्यानंतर रुग्ण जगण्याची शक्यता चांगली असल्यामुळे मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. जर यकृत/फुप्फुस हे ही कर्करोगामुळे ग्रस्त झाले असल्यास त्याचा भाग काढून रुग्णास वाचवता येते. अगदी पुढे गेलेल्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करता येत नाही.
केमोथेरपी : (Chemotherapy) आज अनेक नवीन औषधे बाजारात उपलब्ध आहेत. ही औषधे वापरून कर्करोगाच्या गाठी कमी करता येतात. यामुळे मोठ्या गाठी काढणे सुकर होते. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर थोडासा आजार बरा करता येतो. ही औषधे जरी महाग असली तरी त्याचा चांगला परिणाम होतो. परंतु, कुठल्याही कर्करोगाच्या औषधांप्रमाणे याचेही शरीरावर अनावश्यक परिणाम होतात, त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक असते. गेल्या दशकात monoclonal antibodies म्हणजेच कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी औषधे आली आहेत, त्यामुळे रुग्णाला फायदा तर होतोच, परंतु शरीरातील इतर भागांवर परिणाम होत नाही.