How To Clean Stomach Naturally: सकाळी उठल्यानंतर पोट साफ न होणं, गॅस आणि बद्धकोष्ठतेमुळे त्रास होणं ही आजच्या काळात अनेकांची सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. अशा वेळी शरीरात अस्वस्थता, डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा जाणवतो, ज्याचा परिणाम दिवसभराच्या कामगिरीवर होतो. बद्धकोष्ठता म्हणजे जेव्हा तुम्हाला मळ त्याग करणे कठीण जातं. यामुळे तणाव वाढतो आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ शौचालयात जातो. पोट स्वच्छ ठेवणे केवळ तुमच्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. दिवसाची सुरुवातच झाली आहे जड शरीराने, सुस्तीने, आणि अधुऱ्या मलविसर्जनाच्या त्रासाने? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अनियमित जीवनशैली, चुकीचं खानपान, कमी पाणी पिणं आणि तणाव या सगळ्यांमुळे आजकाल अनेकांना पोट साफ न होण्याचा, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सतावत आहे. पण, आता सकाळच्या फक्त १० मिनिटांत तुम्ही ही समस्या कायमची दूर करू शकता, तेही कोणतीही गोळी औषध न घेता.
योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांच्यानुसार, रोज सकाळी घरातच केवळ काही योग क्रिया केल्याने पचनसंस्थेला चालना मिळते आणि आतड्यांतील साचलेला मल सहज बाहेर टाकता येतो. पाहूया कोणते आहेत हे १० मिनिटांचे कमाल उपाय…
१. मलासन
सकाळी उठून रिकाम्या पोटी मलासनात बसल्याने थेट पचनसंस्थेवर परिणाम होतो. या आसनामुळे आंतड्यांवर योग्य दाब निर्माण होतो आणि मलविसर्जन सहज होतं. तसेच शरीराच्या खालच्या भागाचे स्नायू मजबूत होतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
२. जागेवरच थोडं जॉगिंग
बेडवरून उठल्यावर लगेच योगा मॅटवर १-२ मिनिटं जागेवर चालणं (जॉगिंग) केल्याने शरीर जागं होतं आणि आतड्यांची हालचाल सुरू होते. यामुळे अन्न पुढे सरकण्यास मदत होते आणि पोट हलकं वाटतं.
३. ताडासन आणि त्रियाक ताडासन
हात वर करून ताणून ताडासन केल्याने पोटावर नियंत्रित दाब पडतो. यामुळे शरीरातील गॅस, अडकलेला मल सहज बाहेर पडतो. पुढचा टप्पा म्हणजे त्रियाक ताडासन, ज्यामध्ये शरीर डावीकडे आणि उजवीकडे वळवलं जातं. यामुळे दोन्ही बाजूंना योग्य ताण पडतो आणि मलविसर्जन अधिक सुलभ होतं.
जर तुम्हालाही दररोज सकाळी वॉशरूममध्ये जाऊनही समाधान वाटत नसेल, तर या १० मिनिटांच्या उपायांचा नक्की अवलंब करा. औषधांशिवाय, घरबसल्या आणि नैसर्गिक पद्धतीने तुमचं पोट पूर्णपणे साफ होईल आणि दिवसभर हलकं वाटेल…